या लेखातल्या सरकारी अधिकारी वगळता, सगळ्या व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत, जेणेकरून त्यांची ओळख उघड होणार नाही. म्हणूनच गावांची नावंही दिलेली नाहीत. दोन लेखांच्या मालिकेतला हा पहिला लेख आहे.
संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आकाशात अजूनही थोडी लाली आहे. १६ वर्षीय विवेक सिंग बिश्त आणि अजूनही काही जण सातपेरच्या त्यांच्या मुक्कामावर चाललेत. “आम्ही अजून १० दिवस इथे थांबू आणि आणखी कीडा जडी मिळतीये का ते पाहू. हा हंगाम काही आमच्यासाठी फार खास नव्हता,” त्या दिवशी गोळा केलेल्या २६ कीडा जडी दाखवत तो मला सांगत होता.
आम्ही सातपेरच्या कुरणांमध्ये होतो, समुद्रसपाटीपासून ४,५०० मीटर उंचीवर. आजूबाजूला सगळ्या बर्फाच्छादित रांगा, आणि तिथेच पस्तीस एक तंबूंच्या निळ्या ताडपत्री बर्फाळ वाऱ्यांनी उडत होत्या. मेच्या मध्यापासून आजूबाजूच्या गावातून येणारे विवेक सिंग बिश्तसारखे कीडा जडी गोळा करणारे इतर सगळे या मुक्कामी येतात. सातपेर पिथोरागढ जिल्ह्याच्या धारचुला तालुक्यात आहे, भारत नेपाळ सीमेच्या काही किलोमीटर डावीकडे.
नशीब चांगलं असेल तर हे बुरशी गोळा करणारे एका दिवशी ४० नग गोळा करू शकतात आणि नाही तर एका दिवसात १० नगही मिळत नाहीत. उत्तराखंडमध्ये जूनच्या मध्यावर मोसमी पाऊस सुरू होण्याआधी कीडा जडी गोळा करण्याचा हंगाम जवळपास संपलेला असतो. गेल्या वर्षी जूनपर्यंत विवेकचे आई-वडील, आजी-आजोबा आणि ८ वर्षांची बहीण असे सगळे त्यांच्या गावी ९०० नग घेऊन परतले होते. प्रत्येक कीडा जडीचं वजन अर्धा ग्रामहून कमी असतं आणि प्रत्येक नग १५०-२०० रुपयापर्यंत विकला जातो.









