केरळच्या पारप्पा गावात १५ जणांचा एक गट गवताचं वाद्य वाजवतो – मूलम चेंडा, एक बांबूचा ड्रम. ते सगळे मालिवन आदिवासी या पारंपारिक कलाकार समुदायाचे असून मुख्यतः कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यांचे रहिवासी आहेत.
“फार पूर्वी आमच्या पूर्वजांनी संगीत तयार करण्यासाठी बांबूचा वापर केला,” के. पी. भास्करन सांगतात. पुढील व्हिडिओमध्ये त्यांच्या बँडचं संगीत ऐकायला मिळेल. हे सगळे कासारगोडच्या वेल्लरीकुंड तालुक्यातल्या पारप्पा गावचे आहेत. आजही [केरळमध्ये इतरत्र] गुराच्या कातड्यापासून ढोलाची पानं बनवतात. पूर्वापारपासून, आम्ही रोजच्या जगण्यात कधीच गायीचं मांस किंवा कातडं वापरलेलं नाही. त्यामुळेच आमच्या पूर्वजांनी थेय्यमसारख्या काही धार्मिक विधींवेळी आवश्यक संगीत तयार करण्यासाठी बांबूची वाद्यं तयार केली.
अगदी काही दशकांपर्यंत, या समुदायाला जंगलातून आवश्यक गोष्टी सहज मिळत असत. मात्र सरकारने त्यावर निर्बंध आणल्यापासून बांबूचं वाद्य तयार करणं महाग झालं आहे. माविलन आता ५० किलोमीटरवरच्या बडियाडका शहरातून बांबू विकत आणतात. एकेक बांबू रु. २५०० ते रु. ३००० पर्यंत मिळतो आणि एकातून तीन ते चार वाद्यं तयार होतात. एक वाद्य जास्तीत जास्त दोन कार्यक्रमांसाठी वाजवता येतं, त्यानंतर त्याला बहुतेक वेळा चिरा जातात. वादकांना एक वाद्य तयार करण्यासाठी ३-४ दिवस लागतात – आधी तो कोरून काढायचा, उन्हात वाळवायचा. “बांबूचं एक वाद्य तयार करायचं म्हणजे भरपूर मेहनत लागते,” वादकांपैकी एक, सुनील वीतियोडी सांगतात
पूर्वी माविलन (स्थानिक माविलार म्हणतात) जमीनदारांच्या शेतांवर काम करायचे. आता काही कुटुंबांकडे त्यांची स्वतःची थोडी फार शेती आहे. हे वादक प्रामुख्याने रोजंदारीवर किंवा बांधकामावर आणि सुतारकाम किंवा घरं रंगवण्याचं काम करतात.
या समुदायातले आता केवळ ३०-३५ जणच बांबूची वाद्यं वाजवू शकतात. पूर्वापार पद्धत अशी की मंदिरांमधल्या उत्सव-यात्रांमध्ये मालिवन पुरुष वाद्यं वाजवतात आणि गातात तर स्त्रिया नाचतात. एक वादक, के. पी. भास्करन सांगतात की वर्षाला त्यांना साधारणपणे १० च्या आसपास आमंत्रणं येतात. त्यांचं वादन १० ते ३० मिनिटं चालतं आणि प्रत्येक वादकाला रु. १५०० बिदागी मिळते. प्रवास ते त्यांच्याच खर्चाने करतात आणि दिवसाचा रोजगारही बुडतो.
“आम्हाला संघर्ष करावा लागेल, पण आम्ही आमच्या घरातल्या लहानग्यांना ही आमची कला देणार हे नक्की,” भास्करन म्हणतात. “आमची कला आणि संस्कृती, आमच्यासाठी हा ठेवा आहे. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की हे दुसरीकडे कुठेही सापडणार नाही आणि पुढच्या पिढ्यांना हा ठेवा द्यायलाच पाहिजे. आमची ओळख आहे ही.”
अनुवादः मेधा काळे