रंग उडालेल्या दोन मजली घराच्या वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीच्या एका कोपऱ्यात अझलन अहमद फोनशी खेळत बसलाय. त्याच्या हाताला कंप सुटलाय आणि तो त्याच्या आईला काश्मिरी भाषेत ओरडून सांगतोय, “माई, गो खबर क्या [मला काय होतंय तेच कळत नाहीये].” त्याचं डोकं दुखतंय आणि अंग ठणकतंय. त्याची आई, सकिना बेगम धावत स्वयंपाकघरातून पेलाभर पाणी घेऊन येते. अझलनच्या हाका ऐकून त्याचे वडील बशीर अहमददेखील त्याच्या खोलीत येतात आणि त्याची समजूत घालू पाहतात. अंमली पदार्थ घेणं थांबवल्यानंतर अशी काही लक्षणं दिसू शकतात असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
काही काळापासून सकिना बेगम आणि बशीर (ओळख उघड होऊ नये म्हणून सगळी नावं बदलण्यात आली आहेत) अझलनच्या खोलीला कडी लावू लागलेत. त्यांच्या घराच्या १० खिडक्या देखील नेहमी बंद असतात. त्याची खोली स्वयंपाकघराच्या जवळ आहे आणि तिथून सकिना त्याच्यावर लक्ष ठेऊ शकतात. “आपल्याच लेकराला असं कोंडून ठेवायचं म्हणजे किती त्रास होतो. पण दुसरा काहीच इलाज नाहीये,” ५२ वर्षीय सकिना बेगम सांगतात. बाहेर सोडलं तर आपला मुलगा परत अंमली पदार्थाच्या मागे लागेल अशी त्यांना भीती वाटते.
दोन वर्षं झाली, शाळा सोडलेला, बेरोजगार असणारा अझलन हेरॉइनच्या व्यसनात अडकलाय. या व्यसनाला चार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. आधी नशेसाठी बुटाचं पॉलिश, त्यानंतर वैद्यकीय वापरातले अफूवर्गीय पदार्थ आणि चरस (गांजापासून तयार केलेला घटक) आणि मग हेरॉइन.
काश्मीरच्या दक्षिणेकडच्या अनंतनागमधील चुरसू प्रदेशात राहणाऱ्या अझलनच्या कुटुंबासाठी हे व्यसन म्हणजे एक मोठा धक्का होता. “त्याने गर्द विकत घेण्यासाठी जे मिळेल ते विकलं असावं – त्याच्या आईची कानातली काय, बहिणीची अंगठी काय,” भातशेती करणारे ५५ वर्षीय बशीर सांगतात. आपल्या मुलाचं हे व्यसन बशीर यांच्या लक्षात येईपर्यंत त्याने त्यांचं एटीएम कार्ड चोरून त्यांच्या खात्यातून ५०,००० रुपये काढले देखील होते. “आमच्या घरी राहणाऱ्या पाहुण्यांनी पण अनेकदा तक्रार केली होती की त्यांचे पैसे चोरीला जातायत म्हणून,” ते सांगतात.
पण जेव्हा हेरॉइन विकत घेण्यासाठी आपल्या ३२ वर्षीय बहिणीच्या बोटातली अंगठी काढून घेताना त्यांनी अझलनला पाहिलं तेव्हा समस्या खरंच किती गंभीर आहे हे त्यांच्या लक्षात आलं. “त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी त्याला श्रीनगरच्या व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी घेऊन गेलो. माझी माझ्या मुलावर आंधळी माया होती आणि त्याला कुणी व्यसनी, ड्रग ॲडिक्ट म्हणेल असं कधी मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं,” ते म्हणतात.




