हे काही हृदयविकाराचा झटका येण्याचं वय नव्हतं. के वीरमणी गेला तेव्हा त्यानं वयाची पस्तिशीही ओलांडली नव्हती.
“आम्ही रानात होतो, आणि तो अचानक कोसळला...” वीरमणीची बायको आपल्या कडमनकुडी गावातल्या घरी आमच्याशी बोलत होती. आपला नवरा इतक्या कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने कसा काय गेला हेच तिला उमगत नाहीये. त्याची तब्येत उत्तम होती, पण खूप ताण-तणाव होते.
३० डिसेंबर २०१६ रोजी दोघं जण त्यांच्या रानात गेले. सव्वा एकराचा तुकडा गावातल्या एकाकडून पहिल्यांदाच या दलित कुटुंबाने पट्ट्याने कसायला घेतला होता. रानात भात आणि इतर काही पिकं होती ते पहायला दोघं गेले होते.
४ वाजायच्या सुमारास तो अचानक खाली कोसळल्याचं तिनं पाहिलं. “काय झालंय ते पहायला मी धावत गेले, तर तो कसलीच हालचाल करत नव्हता, प्रतिसाद देत नव्हता.” ती सांगते. कविताने इतरांच्या मदतीने त्याला अॅम्ब्युलन्सने नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तिला सांगितलं. त्यांच्या मते हा कसला तरी धक्का बसल्याने झालेला मृत्यू होता.
आता सगळी जबाबदारी कवितावर येऊन पडलीये. पाच वर्षांची दिव्यदर्शिनी आणि अडीच वर्षांची नित्यश्री या दोघी मुलींचं तिलाच करायचंय. काय घडलं हे अजूनही तिला समजू शकलेलं नाही. “(२०१६ साली) पाऊस पडला नाही हे आमचं कमनशीब.” ती म्हणते. “घर चालवण्यासाठी स्वतः शेती करावी या इराद्याने आम्ही पहिल्यांदाच जमीन भाडेपट्ट्यावर घेतली आणि नेमकं तेच शेतीसाठी सगळ्यात वाईट वर्ष ठरावं...”







