“केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, अथवा केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा कुणी कर्मचारी अथवा कशाशीही संबंधित कुणीही या कायद्याअंतर्गत किंवा त्याच्या नियमांतर्गत भल्यासाठी किंवा भल्या हेतूने काहीही केले तरी त्यांच्या विरोधात कोणताही खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई करता येणार नाही.”
हे आहे शेतमाल व्यापार आणि वाणिज्य (प्रसार आणि समन्वय) कायदा, २०२० चे कलम १३ (हाच कायदा जो कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मुळावर उठला आहे).
आणि तुम्हाला वाटत होतं की हे कायदे फक्त शेतकऱ्यांबद्दल आहेत, हो ना? अर्थात, शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणारे अन्य कायदेही आहेत. पण याने मात्र जरा जास्तच मजल मारलीये. कुणालाही, कशाही बाबतीत, सद्हेतूने, भल्यासाठी केलेल्या कशासाठीही असं संरक्षण हे जरा जास्तच नाही का? अशा भल्या हेतूने केलेल्या गुन्ह्यासाठी तर त्यांना कोर्टात खेचता येणार नाहीच पण ते करु पाहत असलेल्या (अर्थातच, भल्या हेतूनेच) गुन्ह्यांसाठीही त्यांना कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.
तुम्हाला चुकून काही कारणाने हे काय चाललंय – म्हणजेच कोर्टात कायदेशीर मार्गच उपलब्ध नसणे – हे लक्षात आलं नसेल तर हे घ्या – कलम १५ नीट उकलून सांगेलः
“या कायद्यामध्ये किंवा नियमांमध्ये उल्लेखित कोणत्याही अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या, असे अधिकारी निवाडा करू शकतील अशा कोणत्याही बाबीसंबंधीचा कुठलाही खटला दाखल करून घेण्याचा अधिकार कोणत्याही दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत येणार नाही.”
तर, असे ‘भल्या हेतूने’ काम करणारे ‘कुणीही’ ज्यांना कायदेशीर रित्या आव्हान देता येणार नाही, ते नक्की आहेत तरी कोण? एक सुचवू? हे आंदोलनकर्ते शेतकरी ज्या कॉर्पोरेट धनदांडग्यांची नावं सतत घेतायत ना, ती जरा ऐकून पहा. हे सगळं व्यापार सुलभ होण्यासाठी सुरू आहे. व्यापारही साधासुधा नाही – चांगला भव्य दिव्य.
“कोणताही खटला, कायदेशीर कारवाई केली जाणार नाही...” आणि हे कलम काही केवळ शेतकऱ्यांच्या वापरासाठी नाहीये. कुणीच अशी कारवाई करू शकणार नाही. जनहित याचिकांनाही हे लागू होणार. ना-नफा काम करणाऱ्या संस्था, किंवा शेतकरी संघटना किंवा कोणताही नागरिक (मग त्याचा हेतू भला असो वा बुरा) हस्तक्षेप करू शकणार नाही.
१९७५-७७ दरम्यान आणीबाणी आली (तेव्हा तर चक्क सगळे मूलभूत हक्कच हिरावून घेतले गेले) त्यानंतर कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचा नागरिकांचा अधिकार इतक्या दांडगाईने कधी हिरावून घेतला गेलेला नाही.







