हादू बाहेराचं रोज १२ तासांसाठी ‘स्वतःचं’ एक घर आहे. तेवढ्या वेळापुरता हा ५१ वर्षीय कामगार उत्तर सुरतेतल्या वेद रोडवरच्या एका अंधाऱ्या खोलीतली ६ x ३ फुटाची जागा ‘आपली’ म्हणून वापरतो.
दिवसाच्या उरलेल्या १२ तासांसाठी त्याचा साथी त्या जागेवर राहतो - त्यांच्या कामाच्या पाळीनुसार स. ७ ते संध्या. ७ किंवा उलट. वीज गुल असेल तेव्हा मिळणाऱ्या ‘सुटी’मुळे संकटच उभं राहतं कारण तेव्हा सगळ्या ६० मजुरांना महावीर मेस मधील त्या ५०० चौ. फुट जागेत दाटीवाटीने राहावं लागतं, जिथे सध्या हादू राहतायत.
उन्हाळ्याचे दिवस - जेव्हा तापमान ४० अंशापर्यंत वाढतं - असह्य असतात. “काही हॉल (कामगार राहतात त्या मोठ्या खोल्या) फारच काळोख्या आणि कोंदट आहेत,” बाहेरा सांगतात. ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील पुरुषोत्तमपूर तालुक्यातील कुसलापल्ली गावातून ते १९८३ मध्ये सुरतेला आले. “मागावर दिवसभर कष्ट केल्यावरसुद्धा आम्हाला नीट आराम करता येत नाही.”
बाहेरांप्रमाणेच यंत्रमागावर काम करणारे अनेक कामगार (त्यांच्यातील बहुतेक गंजम जिल्ह्यातून आलेले आहेत. पहा: कृत्रिम कापड, अस्सल हिरमोड) अशा ‘मेस रूम’ किंवा सामाईक खोल्यांतून राहतात. वार्षिक सुटीसाठी गंजमला जाऊन आल्यावर त्यांना इथे जागा मिळते ती ‘आधी आला तो आधी स्थिरावला’ या न्यायाने. या खोल्या उद्योगांच्या सान्निध्यात असतात; कधी तर त्यांच्या मागांपासून काही मीटर अंतरावर. १२ तासांच्या पाळीनंतर जेव्हा ते आपल्या कामचलाऊ अंथरुणात पडतात तेव्हाही यंत्रांची ‘खट-खट’ त्यांची पाठ सोडत नाही.












