३० नोव्हेंबर २०१८. दिल्लीतल्या किसान मुक्ती मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी बोलावं म्हणून मी दिल्लीच्या निझामुद्दिन रेल्वे स्थानकावर आलो होतो. काही अंतरावर मला काही गडी, बाया आणि लहानग्यांचा घोळका दिसला. डोक्यावर पोती आणि खांद्यावर पिशव्या घेऊन ते स्टेशनमधून बाहेर पडत होते.
मला वाटलं की हे मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेले शेतकरी असावेत. नंतर माझ्या ध्यानात आलं की ते कामाच्या शोधात आलेले छत्तीसगडचे मजूर होते. “आम्ही हरयाणाच्या जिंदाल पॉवर भट्ट्यावर काम करायला चाललोय,” २७ वर्षीय इतवारा जोल्हे सांगते. रायगड तालुक्याच्या खरसिया तालुक्यातल्या छोटे मुदपूर गावची ती रहिवासी. तिचा नवरा शंकर म्हणतो की दिल्लीच्या सीमेपाशी कुठे तरी आहे पण नक्की कुठे ते तोही सांगू शकला नाही.
इतवारा, शंकर आणि त्यांच्यासोबतची दोन कुटुंबं एक तर वीज प्रकल्पामध्ये किंवा जवळपासच्या वीटभट्ट्यांमध्ये काम शोधतील. या जोडप्याने सांगितलं की ते गेल्या तीन वर्षांपासून कामासाठी दिल्ली-हरयाणाला येतायत. यंदा छत्तीसगड विधान सभेच्या निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान करून ते इथे आलेत.







