“आम्ही माणसं मातीमध्ये राहणारी आहोत, सिमेंटच्या फरशा आणि उंच उंच इमारतीत नाय,” लक्ष्मी गायकवाड म्हणतात. या क्षणी त्या मातीपासून दूर १२ व्या मजल्यावर बसल्या आहेत. एका २६९ स्क्वे. फूटच्या फ्लॅटमध्ये जो त्यांना त्यांच्या प्रजापूरपाड्यातल्या २ एकर शेतजमिनीच्या मोबदल्यात दिला गेला आहे.
“मी कधी जरी खाली पाहिलं ना, मला धस्स होतं. मी पडणार असंच वाटतंय. आम्ही इथे नाही राहू शकत. मी माझ्या पाड्यावर कशी मोकळेपणानी चालायची, तसं इथं नाय चालता येत,” अंदाजे ७५ वर्षांच्या असलेल्या लक्ष्मी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.
त्यांचं हे इवलंसं घर मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेअंतर्गत बांधलेल्या अंधेरीच्या चकालामधल्या एका इमारत संकुलात आहे. आरे कॉलनीतल्या प्रजापूरपाड्यापासून सुमारे ३.७ किमी. अंतरावर.
ही दूध कॉलनी १९४९ मध्ये केंद्र सरकारने निर्माण केली होती – एक दुधाचा कारखाना आणि गाई-गुरांना चरण्यासाठी कुरणं असा हा ३१६० एकराचा परिसर आहे. या भागात २७ आदिवासी पाडे आहेत आणि त्यांची लोकसंख्या ८,००० हून जास्त आहे. १९९० पासून इथे झोपडपट्ट्याही उभ्या राहिल्या आहेत.
गायकवाडांसारखीच इथली इतर ७० कोकणा आदिवासी कुटुंबं म्हणजेच सुमारे ३०० व्यक्ती आहेत, ज्यांना एप्रिल २०१७ मध्ये त्यांच्या पाड्यातून विस्थापित केलं गेलं. आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने डेपो आणि शेड बांधण्यासाठी २६ हेक्टर जागेचा ताबा घेतला.
ही ७० कुटुंबं आणि आरेमधल्या सारिपुत नगरमधल्या तब्बल १०० कुटुंबाना झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सोळा मजली इमारतींमध्ये हलवण्यात आलं. झोपडपट्टी पुनर्वसन ही १९९५ साली सुरू झालेली महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यामध्ये शहरी वस्त्यांमधल्या लोकांना त्यांच्या वस्तीतल्या घरांच्या जागेच्या बदल्यात २५०-३०० स्क्वे. फुटांची घरं मोफत देण्यात आली आहेत.





