नखाहून फार मोठी नसलेली फिक्या पांढऱ्या रंगाची आणि सुंदर अशी कळी. बागेत फुललेल्या फुलांच्या चांदण्या. त्यांच्या मोहक सुगंधाने धुंदी चढावी. मोगऱ्याचं फूल म्हणजे आपल्याला मिळालेलं लेणं आहे. मातीने, काटक रोपाने आणि पांढऱ्या ढगांनी सजलेल्या आकाशाने दिलेली एक भेट म्हणा ना.
इथे मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे मात्र या फुलांचं वर्णन करायला, त्याच्या सौंदर्यात रमायला बिलकुल वेळ नाही. त्यांना हा मल्ली म्हणजेच मोगरा फुलण्याच्या आधी पूकडई म्हणजेच फूलबाजारात पोचवायला हवा. विनायक चतुर्थीला चारच दिवस राहिलेत. फुलांना बरा भाव मिळण्याची शक्यता आहे.
अंगठा आणि तर्जनीचा वापर करत बाया आणि गडी झपाझप कळ्या खुडत असतात. ओंजळ भरली की साडीच्या किंवा धोतराच्या ओच्यात टाकायची आणि नंतर पिशव्यांमध्ये. सगळं काम कसं काटेकोर सुरू आहे. फांदी हलवायची, त्यानंतर कळ्या खुडायच्या, मग पुढच्या झाडाकडे. झाड केवढं तर तीन वर्षांच्या लेकराइतकं. पुन्हा तेच. आणखी थोड्या कळ्या खुडायच्या. गप्पा सुरूच. काम करता करता रेडिओवर तमिळ गाणी वाजतायत. पूर्वेकडे सूर्य वर येऊ लागलाय...
थोड्याच वेळात पुलं मदुरई शहरातल्या मथ्थुवनी बाजारात पोचलेली असतील आणि तिथून तमिळ नाडूतल्या बाकी शहरांमध्ये. आणि कधी कधी तर परदेशातही.
पारीने २०२१, २०२२ आणि २०२३ अशी तीन सलग वर्षं मदुरईच्या तिरुमंगलम आणि उसिलमपट्टी तालुक्यांना भेटी दिल्या. मोगऱ्याचे हे मळे मीनाक्षी अम्मन मंदीर आणि आपल्या फूलबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या मदुरई शहरापासून फार तर एका तासाच्या अंतरावर आहेत. इथेच मोगरा विकला जातो, ओंजळभर असो किंवा ढिगाने.




























