गुडापुरी बालाराजूनी रिक्षाचं मागचं सीट काढलंय आणि अंदाजे ७०० किलो कलिंगड लादलंय. वेमपहाड या आपल्या गावाहून ३० किलोमीटरवर असणाऱ्या कोप्पोले गावच्या वेल्लीदंडुपुडु वस्तीवरच्या एका शेतकऱ्याकडून त्यानी नुकतंच फळ खरेदी केलं आहे.
त्यानंतर नलगोंडा जिल्ह्याच्या निदामानूर मंडलातल्या अनेक गावात तो रिक्षा घेऊन जातात. काही फळं विकली जातात, १ ते ३ किलोच्या एका फळामागे १० रुपये मिळतात. बालाराजूसाठी आजचा दिवस बराच खडतर आहे. एरवी जेव्हा फळं विकायला नसतात तेव्हा ते प्रवासी वाहतूक करतात. गावकरी त्यांना गावात येऊ देईना गेलेत. “काही जण चक्क कलिंगडांना कोरोना काया [कलिंगड] म्हणायला लागलेत,” २८ वर्षीय बालाराजू सांगतो. “ते म्हणतायत, ‘इकडे येऊ नको. त्या फळांबरोबर तू विषाणू पण घेऊन येतोयस’.”
२३ मार्च नंतर – तेलंगणात याच दिवशी टाळेबंदी जाहीर झाली – त्यांची कलिंगडाच्या विक्रीतून दिवसाला जास्तीत जास्त ६०० रुपयांची कमाई झालीये. त्या आधी फळं बाजारात आल्यापासून काही आठवडे ते रोज किमान रु. १,५०० ची तरी कमाई करत होते. या भागात जानेवारीच्या सुरुवातीला कलिंगडांची लागवड करतात आणि दोन महिन्यात फळ विक्रीसाठी तयार होतं.
विक्री कमी झालीये आणि लोकांची बोलणी यामुळे बालाराजूनी आता ठरवलंय की १ एप्रिल रोजी विकत घेतलेला माल संपला की परत काही फळं विकायला बाहेर पडायचं नाही. कलिंगडाची लागवड आणि विक्री करणाऱ्या त्याच्यासारख्या इतर शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांना कोविड-१९ संकटाचा चांगलाच फटका बसलाय.
फळाची तोडणी आणि गाडीत लादायचं काम करणारे कामगार, यात प्रामुख्याने महिला जास्त आहेत, रोजच्या मजुरीवर अवलंबून असतात. १० टनाचा एक ट्रक लादला की ७-८ बायांच्या एका गटाला ४००० रुपये मिळतात, जे त्यांच्यात समान रित्या वाटले जातात. बहुतेक दिवशी दोन तरी ट्रक लादून होतात, कधी कधी तीन. मात्र तेलंगणातील शहरांना माल घेऊन जाणाऱ्या ट्रकची संख्या जसजशी कमी होत चाललीये तशी त्यांची मजुरीही घटलीये.
स्थानिक वर्तमानपत्रांतील बातम्यांनुसार २९ मार्च रोजी कलिंगडाचे केवळ ५० ट्रक हैद्राबादच्या पूर्वेकडच्या कोठापेट मार्केटमध्ये पोचल्याचं कळतं. टाळेबंदीच्या आधी कलिंगडाच्या हंगामात तेलंगणाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून, खास करून नलगोंडा, महबूबनगरहून रोज जवळ जवळ ५००-६०० ट्रक कोठापेटला येतात असं मिर्यालागुडा शहरातले व्यापारी मधु कुमार सांगतात. प्रत्येक ट्रकमध्ये अंदाजे १० टन माल असतो. “अनेक ट्रक चेन्नई, बंगळुरू आणि अगदी दिल्लीलाही जातात,” कुमार सांगतात. ते नगरं आणि शहरांतल्या ठोक व्यापाऱ्यांना कलिंगडं विकतात.
टाळेबंदीनंतर कलिंगडांचे ठोक बाजारातले कोसळले आहेत. आधी टनामागे ६०००-७००० रुपयांचा भाव होता आणि २७ मार्च रोजी कुमार बोल्लम यादय्या या शेतकऱ्याला ३,००० रुपयाची बोली सांगत होते. नलगोंडाच्या गुर्रुमपोडे मंडलातल्या कोप्पोले गावाच्या बुड्डारेड्डी गुडा वस्तीवरच्या या शेतकऱ्याच्या रानातून कुमार यांनी त्याच भावात दोन ट्रक भरून फळ खरेदी केलं आणि मिर्यालागुडातील एका फळविक्रेत्याकडे पाठवलं.
खरं तर कलिंगड शेतकऱ्यांची शेती तशीही बेभरवशाची झालीये त्यात टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीची भर पडलीये. नलगोंडा जिल्ह्याच्या कंगल मंडलातल्या तुर्का पल्ले गावातला २५ वर्षीय शेतकरी बायरू गणेश असाच एक शेतकरी.
गणेशने कलिंगडाचं एक संकरित वाण लावलं आहे. याला खर्च खूप येतो, हवामानातले बदल आणि किडीचा प्रादुर्भाव या वाणावर लगेच होतो. या वाणाच्या लागवडीला एकरी ५०,००० ते ६०,००० रुपये खर्च येतो, यात बियाणं, खतं, कीटकनाशकं, खुरपणी, तणणी, मल्चिंग इत्यादी समाविष्ट आहेत. २०१९ सालच्या उन्हाळ्यात गणेशने १ लाखाचा नफा कमवला होता – टनामागे १०,००० भाव मिळवला होता.
या वर्षी देखील तितकाच नफा होईल अशी गणेशला आशा होती आणि त्याने मार्च ते जूनच्या काळात तीन टप्प्यात फळ हाती येईल अशा पद्धतीने नऊ एकर जमीन भाड्याने घेऊन त्यावरही कलिंगडाची लागवड केली. साधारणपणे एका एकरात १५ टन कलिंगड होतं. यातली १० टन तरी एकदम सुबक, नितळ, वजन आणि आकारात सारखी आणि कसलेही ओरखडे नसणारी असतात. मधु कुमारसारखे व्यापारी अशी फळं शहरं आणि मोठ्या नगरांना पाठवतात. बालाराजूंसारखे फळ विक्रेते (तो स्वतःच्या रिक्षात फळं लादतो) ‘उरलीसुरली’ फळं छोट्या गावांमध्ये आणि खेडोपाडी विकतात, तीही शेतकऱ्यांकडून पडत्या किंमतीला घेऊन.
एकाच रानात दुसऱ्यांदा कलिंगडाचं पीक घेतलं तर सरासरी उत्पादन सात टनांपर्यंत घसरतं – आणि तिबार पीक घेतलं तर अजून जास्त. पेरणीनंतर ६० किंवा ६५ व्या दिवशी जर फळाची काढणी झाली नाही तर सगळा माल जास्त पिकतो. आणि जर का खतं आणि कीटकनाशकांचा वापर अचूक वेळी आणि सातत्याने केला नाही तर मग फळाला हवा तसा सुबक आकार, आकारमान आणि वजन मिळत नाही.
आता ही खतं आणि कीटकनाशकं विकत घ्यायची तर शेतकऱ्याकडे सगळी रक्कम रोखीत पाहिजे. “कलिंगडासाठी ह्या गोष्टी कुणीच उधारीवर देत नाहीत. मोसंबी किंवा भातपिकासाठी मात्र उधारी चालते. [कलिंगडामध्ये] किती जोखीम आहे ते त्यांना माहितीये,” चिंतला यादम्मा सांगतात. २०१९ साली त्यांनी तुरका पल्ले गावात कलिंगडाची लागवड सुरू केली. “दुसरीकडून पैसा उसना घेणं बरं,” त्या सांगतात. त्यांचा निर्देश चढ्या व्याजाने कर्जं देणाऱ्या खाजगी सावकारांकडे होता.
आणि अगदी टाळेबंदीच्या आधीसुद्धा किंमती तशाही घसरायला लागल्या होत्या. खूप जास्त प्रमाणात कलिंगडांची लागवड झाल्यामुळे असं झाल्याचं इथले शेतकरी सांगतात. आवक खूप जास्त असल्यामुळे व्यापाऱ्यांना भाव पाडणं शक्य झालं होतं आणि त्यामुळेच मार्चच्या सुरुवातीलाच किंमती घसरलेल्या होत्या असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
अनेक शेतकरी मला सांगत होते की कलिंगडाची शेती एक जुगार किंवा ‘पत्त्याचा डाव’ बनली आहे. तरीही, जोखीम असतानाही अनेकांनी हे पीक घेणं कही थांबवलं नाही – प्रत्येकालाच आशा होती की यंदाचं पीक त्यांचा खिसा थोडा तरी गरम करेल.
गणेश यांनी त्यांच्या तीन एकरावरची लागवड तीन महिन्यांनी पुढे ढकलली – आशा हीच की बरा भाव मिळेल. तोडणी करून गोदामांमध्ये टनानी फळ नीट रचून ठेवणं हा पर्याय त्यांच्यापुढे नाही. “[मार्चच्या सुरुवातीला] एक ट्रक भरेल इतकं फळ [१० टन] तर तोडलंही नव्हतं,” तो सांगतो. टनाला ६००० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळेल का एवढीच तो वाट पाहतोय. पण वेळ गेली आणि फळं जास्त पिकली आणि त्याला मिळणारा भाव आणखी घसरला.
जो व्यापारी मार्चच्या सुरुवातीला त्याच्या रानातून फळ विकत घ्यायला आला होता, त्याने त्यातलं बरंचसं फळ फेकून दिलं. पहिलं, दुसरं, तिसरं फळ त्याने फेकलं काढलं तरी तो गप्प राहिला. मात्र चौथं फळ बाजूला फेकल्यावर मात्र त्याचा पारा चढला आणि त्याने फळाची प्रतवारी करणाऱ्या माणसाच्या अंगावर दगड भिरकावला.
“पोटच्या पोराला जपावं तसं हे फळ मी जपलंय. कोल्ह्यांपासून फळ वाचवण्यासाठी गेला महिनाभर मी या रानात रात्री जागलीला राहिलोय. ते चक्क फळं फेकून देतात? ते सावकाश फळं बाजूला काढून ठेवू शकतात की नाही? मी कमी किमतीत ती दुसऱ्या कुणाला तरी विकली असती,” गणेश म्हणतो. नाईलाज म्हणून त्याने अखेर एकदम ‘योग्य’ फळ त्या व्यापाऱ्याला विकलं आणि ‘उरलंसुरलं’ फळ बालाराजूंसारख्या फळविक्रेत्याला.
कोविड-१९ ची टाळेबंदी लागू होण्याच्या आधीची ही गत होती.
“नलगोंडामध्ये यंदा ५,००० एकरावर कलिंगडाची लागवड होईल,” एका बियाणे कंपनीचे विक्रेते असणारे शेखर सांगतात. मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात वेल्लीदंडुपुडु वस्तीवर त्यांच्याशी बोललो होतो. बुड्डारेड्डी गुडा वस्तीवरच्या बोल्लम यादय्यांना मधु कुमार यांनी टनाला ३००० इतकाच भाव दिला. तोच भाव राहिला तर कलिंगडाची नव्यानेच लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना एकरी २०,००० रुपयांचं नुकसान सहन करावं लागू शकतं. गणेश यांना त्यांच्या पहिल्या तीन एकरातच ३०,००० रुपयांचं नुकसान होण्याची भीती वाटतीये. ते आणि इतर काही शेतकरी, जे टाळेबंदीमुळे आणखी पेचात सापडले आहेत ते तर चांगला भाव मिळण्यासाठी फार वाटाघाटीही करण्याच्या स्थितीत नाहीत.
शिवाय, या फळाचा व्यवहार असा असतो की कधी कधी व्यापारी शेतकऱ्यांना बाजारात फळ विकलं गेलं की मग पैसे देतात – आणि आता टाळेबंदीच्या काळात तर उशीरा पैसे देण्याच्या या पद्धतीने अनिश्चिततेत आणखीच भर घातली आहे.
तरीही, कोविड-१९ च्या टाळेबंदीमुळे आणि अनेक धक्के पचवल्यानंतरही काही शेतकऱ्यांना पूर्ण विश्वास आहे की उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये कलिंगडाची मागणी वाढेल आणि भावही.
खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने अनेकांनी खतांची मात्रा कमी केली आहे – कलिंगडाने नियमित खतं घालावी लागतात – मात्र कीटकनाशकं आणि पाण्याची पाळी चालूच ठेवलीये. फळ ‘वेडंवाकडं’ येईल पण बरा माल येईल अशी त्यांना आशा आहे.
काहींना त्यांच्या गरजेची खतं आणि कीटकनाशकं विकत घेता येत नाहीयेत. प्रवासावर घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांना त्यांच्या दुकानदारापर्यंत पोचणं दुरापास्त झालंय. खरं तर कोविड-१९ टाळेबंदीसंबंधी दोन्ही पुरवणी नियमावलीत (२५ मार्च आणि २७ मार्च) गृहमंत्रालयाने बियाणं, खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्या दुकानांना निर्बंधांमधून सूट दिली होती.
“हे पीक मी असंच कसं सोडून द्यावं? आतापर्यंत लाखाचा खर्च झालाय,” कोप्पोले गावचे बोम्मू सैदालु सांगतात. २७ मार्च रोजी मी त्यांना भेटलो तेव्हा ते त्यांच्या तीन एकर रानात कीटकनाशकं फवारत होते.
गणेश देखील एप्रिलच्या अखेर त्याच्या दुसऱ्या तुकड्यातून चांगला माल निघण्याची वाट पाहतोय, तिसऱ्या पेरणीची बेगमी सुरू आहे.
अनुवादः मेधा काळे