“कधी कधी तरी एखादी बाई रात्रीच मला फोन करायची किंवा घरच्या कुणा पुरुष माणसाला निरोधचं पाकिट घेऊन जायला धाडायची,” कलावती सोनी सांगतात. टिकरीतल्या ५४ वर्षीय ‘डेपो दीदी’ कितीही उशीर झाला तरी खळखळ करत नाहीत. गावातल्या महिलांना लागणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी त्या पुरवतात. “माझं काम रात्रीसुद्धा चालू असतं,” त्या हसत हसत म्हणतात. उत्तर प्रदेशच्या अमेठी जिल्ह्यातल्या आपल्या गावी छोट्याशा घरात चारपाईवर बसून त्या माझ्याशी बोलत होत्या. “इतनी कोई बडी बात नही है,” कलावती आपल्या कामाबद्दल बोलताना सांगतात.
या गावात काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेकडून ‘डेपो दीदी’बद्दल बरंच काही ऐकलं होतं त्यामुळे आमची उत्सुकता चाळवली गेली होती. आणि आम्ही कलावतींच्या घरी पोचलो. “जा रे, जरा ती पिशवी घेऊन ये,” कलावती त्यांच्या नातवाला सांगतात. आणि क्षणाचाही विलंब न लावता तो चिमुकला घरातून एक प्लास्टिकची पिशवी घेऊन धावत येतो. आणि मग त्या पिशवीतून काय काय गंमती जंमती बाहेर पडायला लागतात. विविध प्रकारचे निरोध, तोंडावाटे घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या, जलसंजीवनी आणि काय काय. आपल्या बाजेवर प्रदर्शन मांडल्यासारखं त्या सगळं नीट मांडून ठेवतात.
“इतनी कोई बडी बात नही है,” पालुपद असल्यासारखं त्या म्हणतात. “सुरुवातीला मी घरातल्या इकडच्या तिकडच्या गोष्टींनी सुरुवात करायचे. त्यानंतर घरी कसं काय चाललंय, सासूबरोबरची काही किटकिट, मुलांबद्दल असं सगळं विचारून घ्यायचे. शांतपणे त्यांचं सगळं ऐकून घ्यायचे. या गप्पागोष्टींमधून - थोड्या नाही, मला खूप बोलायला लागतं - मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. सगळ्या बायांना सारख्याच अडचणी येतात. मग एकमेकींची मदत केली तर? बास,” आपण टिकरी गावात ‘डेपो दीदी’ झालो याचा प्रवासच कलावती उलगडून सांगतात.
आरोग्यवर्धक सवयींना प्रोत्साहन आणि आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी गावातल्याच बायांची नेमणूक डेपो होल्डर म्हणून करण्यात येते. त्या नावावरून ‘डेपो दीदी’ हे नाव पडलं. पण कलावती अंगणवाडी ताई नाहीत किंवा आशा कार्यकर्त्या देखील नाहीत. खरं तर डेपो होल्डरचं काम यांच्याकडे असतं. पण त्या झोला छापही नाहीत. पण त्यांच्याकडे प्रजनन आरोग्याचा विचार करता बायांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा साठा असतो आणि त्या बायांच्या लैंगिक आणि प्रजननासंबंधीच्या समस्यांबद्दल त्यांच्याशी बोलतात देखील.
“गेल्या १५ वर्षांत मी पाहतीये की आशा खूप कष्ट घेतात आणि अगदी दमून जातात. एकदा एका गरोदर बाईला लोहाच्या गोळ्या द्यायला आशा आली पण तिची काही त्या बाईशी भेट होऊ शकली नाही. तेव्हा गोळ्या माझ्याकडे ठेवून जा असं मी तिला सांगितलं होतं. मी गोळ्या किती आणि कशा घ्यायच्या ते मी तिला समजावून सांगेन असं मी आशाला सांगितलं. तिथनंच या सगळ्याची सुरुवात झाली,” कलावती सांगतात. गावातल्या बायांना त्या नक्की कधीपासून मदत करतायत त्याची तारीख काही लक्षात नाही पण कारण त्या सांगतात.
नव्याने लग्न झालेल्या सुना एकीकडे आणि घरातले जुने जाणते दुसरीकडे या सगळ्यांबरोबर काम केल्यानंतर, त्यांचं आपल्याविषयी चांगलं मत होईल यासाठी धडपड केल्यानंतर आता त्या या सगळ्याविषयी फार मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा विचार करत असतानाच माझ्या मनात अनेक प्रश्न घोळू लागतात. बाया इच्छा आणि इच्छापूर्तीबद्दल, त्यांच्या जोडीदाराशी आणि घरच्यांशी असलेल्या संबंधांबद्दल तसंच गरोदरपण, गर्भनिरोधक इत्यादीबद्दल कसा संवाद साधत असतील? त्या लाजतात, का बिनधास्त बोलतात? अशा गोष्टी कुठे बोलत असतील त्या? एकमेकींची अशी साथ मिळेल, निवांतपण असेल, जिथे त्यांना स्वतःच्या शरीराविषयी बोलता येईल अशी जागा कलावती कशी काय निर्माण करत असतील?
“दहा वर्षांपूर्वी या सगळ्या विषयांवर बोलायला वेळ लागायचा, जास्त कष्ट पडायचे,” त्या सांगतात. “घरातली म्हातारी मंडळी पाळणा लांबवण्याबद्दल बोलूच द्यायची नाहीत, किंवा गर्भनिरोधकांबद्दलसुद्धा. नातवंडांबद्दल काहीही बोललेलं त्यांना खपायचं नाही. सरळ म्हणायचे, ‘बिगाडने आयी हमारी बहू को’. पण आता काळ बदललाय. लग्न होऊन आलेल्या तरुण मुली आता जास्त जागरुक आहेत आणि निरोध वगैरे हवा असला तर सरळ विचारतात,” कलावती सांगतात. प्रजनन अधिकारांचा विषय त्यांच्या सरळसाध्या गप्पांमुळे जिवंत राहिलाय. चहा पिता पिता, दंगा मस्ती करत त्या या तरुण मुलींना काय काय माहिती देत असतात. “मी त्यांना सांगते की आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर दोन मुलांमध्ये तीन वर्षांचं अंतर ठेवायचं,” त्या म्हणतात.
“सासवासुद्धा जरा सुधारल्या आहेत,” कलावती हसतात. त्यांची स्वतःची सासू २०२० साली फेब्रुवारी महिन्यात वारली, त्यांची आठवण निघते. कलावतींनी अगदी पहिल्यांदा जेव्हा घरी या सगळ्या गोष्टी ठेवायला सुरुवात केली तेव्हा त्या निरोध आणि गर्भनिरोधक गोळ्या दडवून ठेवायच्या. त्यांचं काम त्यांच्या सासूला अजिबात आवडायचं नाही. इतर लोक बिछान्यात काय करतात त्याच्यात आपण पडू नये असं त्यांना वाटायचं. त्यांना भविष्यात काय करायचं ते करू द्यावं. पण शेवटच्या काही वर्षांमध्या मात्र त्यांनी कलावतींच्या कामाला पाठिंबा दिला होता.
“त्यांना वाटायचं हे काय फार उपयोगी किंवा चांगलं काम नाहीये. माझं लग्न झालं आणि लगेच पाठोपाठ पोरं झाली – आधी दोघं जुळी मुलं आणि त्यानंतर एक मुलगी. परत तिसऱ्यांदा दिवस गेले. काही तरी गुंतागुंत झालं, किती तरी दिवस पोटात दुखत होतं. आता वाटतं, तेव्हा मला कुणी तरी सल्ला द्यायला असतं तर किती बरं झालं असतं. कुणीच सोबत नव्हतं. बाळ वारलं आणि माझा फार फार संताप झाला,” त्या सांगतात. कसलंही मानधन नसतानासुद्धा त्या हे काम का करतात त्याचं कारणच त्यांच्या बोलण्यातून पुढे येतं. “मी हे काम करतीये कारण आपल्याला सगळ्यांनाच ही गरज असते, एखाद्या सहेलीचा सल्ला असतो तसं,” त्या म्हणतात. शिवाय त्या हे काम कुठल्याही दबावाशिवाय किंवा ठराविक लक्ष्यपूर्तीच्या अटीशिवाय करू शकतात, आशा कार्यकर्तीसारखं ताणाखाली नाही, त्या म्हणतात.
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणारे किंवा सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते प्रजनन अधिकारांचा विचार शक्यतो पूर्णपणे वैद्यकीय किंवा चिकित्सेच्या दृष्टीकोनातून करतात. कलावतींचं मात्र तसं नाही. त्यांचं काम तसं अनौपचारिक असतं. अर्थात त्यांनी जे काम हाती घेतलंय त्या भूमिकेच्या मर्यादाही त्यांना चांगल्याच माहित आहेत. “एखाद्या बाईला खूप दुखतंय किंवा तातडीने उपचार करायची गरज असते तेव्हा त्या मला बोलावत नाहीत,” कलावती सांगतात. अशा वेळी बाया आशाकडे किंवा दवाखान्यात जातात.
आजच्या घडीला त्या आशा कार्यकर्त्यांसोबत काम करतायत, निरोध आणि गोळ्या तसंच इतर आवश्यक गोष्टींचं वितरण करायला त्यांना मदत करतायत. पंधरवड्यातून एकदा त्या २५ मिनिटावरच्या भेटुआ तालुक्यातल्या आरोग्य केंद्रातून गर्भनिरोधकं घेऊन येतात आणि घरी ठेवतात. गरजेप्रमाणे ज्याला लागेल त्यांना देतात. गावातल्या बायांना दवाखान्यात जाणं शक्य नसतं, तेव्हा त्यांना याचा फायदा होतो. लोक त्यांच्याकडे निरोध आणि सहेली गोळ्या घ्यायला येतात. “माझ्या घरी या दोन गोष्टी नेहमी असतात. पण गरज पडली तर मी काही तरी बहाणा शोधून त्यांच्या घरी जाऊन या गोष्टी पोचवून येते बरं,” कलावती म्हणतात.
दवाखान्यात गोळ्या मोफत मिळतात. निरोध आणि सॅनिटरी पॅड एका सामाजिक संस्थेच्या ऑफिसमधून मिळतात किंवा स्वतःच्या खर्चाने गावातल्या मेडिकलमधून घेऊन येतात.
२०२० साली टाळेबंदी लागली तो काळ त्यांच्यासाठी फार कठीण होता. बाहेर पडण्यावर बंधनं होती त्यामुळे कलावतीला दररोज बायांकडून गर्भनिरोधकांसाठी अगदी पाच-पाच फोन यायचे. “पुरुषांना काहीही काम नव्हतं, करायला काहीच नसायचं. त्यामुळे बायांना सारखी भीती होती की आता त्यांना दिवस जाणार. आणि अनेक जणी खरंच गरोदर राहिल्या. मी त्यांना घराबाहेर गुपचुप कुठे तरी भेटायचे आणि निरोध आणि सहेली गोळ्या द्यायचे. पण माझ्याकडे साठा होता तोवरच,” कलावती सांगतात. बायांनाही इच्छा असतेच की आणि “ही इच्छा कधी जागृत होईल याचं काही ठरलेलं वेळापत्रक नसतं,” त्या म्हणतात.
“माझ्याकडचा साठा मला पुरवून पुरवून वापरावा लागला. मागणी वाढतच होती पण काहीच साधनं मिळत नव्हती. मी तरी काय करणार? माझ्याच गावातल्या सात बाया, ज्यांना मूल नको होतं, त्यांना दिवस राहिले टाळेबंदीच्या काळात. करणार तरी काय?” त्या विचारतात. देशात टाळेबंदी जाहीर केली तेव्हा वरच्या अधिकाऱ्यांनी बायकांचा अजिबात विचार केला नाही असं कलावतींना वाटतं. “कौन सोचता है इन सब चीजों के बारे में, की यह भी जरुरी है?” कलावती म्हणतात.
गेल्या कित्येक वर्षांमध्ये गावातल्या बाया त्यांच्या आयुष्याविषयी, त्यांना पुढे काय करायचंय, काय अडचणी येतायत अशा सगळ्याबद्दल कलावतींपाशी मन मोकळं करत आल्या आहेत. त्यांच्या खास विश्वासातल्या झाल्या आहेत त्या. “माझ्या पोतडीत सगळी गुपितं आणि गोष्टीही आहेत, बरं,” कलावती हसू लागतात.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा
अनुवाद: मेधा काळे