“इथे येऊन तर पहा,” त्या म्हणाल्या. “आम्ही सगळे आदेश पाळतोय. इथे एकमेकांपासून दूर बसलोय, मास्क घालून. हे रेशन मिळतंय ते बरं, पण यावर काहीच दिवस माझ्या घरच्यांचं पोट भरेल. नंतर आम्ही काय करू कोण जाणे.”
या आहेत ५५ वर्षांच्या दुर्गा देवी, राजस्थानातील चुरु जिल्ह्यातील सुजनगढच्या रहिवासी. आमच्याशी फोनवर बोलत असताना त्या दिशा शेखावती नावाच्या स्वयंसेवी संस्थेत मोफत रेशन गोळा करण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. या संस्थेत त्या एक शिबोरी कारागीर म्हणून काम करतात. शिबोरी ही पूर्णतः हाताने करण्यात येणारी बांधणीची कला आहे. “हा कोरोना कधी होईल ते माहीत नाही, त्या आधी आम्ही भुकेपायीच मरून जाऊ,” आपणच केलेल्या भयाण विधानावर दुर्गा देवी हसतात.
काही वर्षांपूर्वी दारूच्या व्यसनाने त्यांचे पती मरण पावल्यानंतर दुर्गा देवी त्यांच्या कुटुंबातील एकुलत्या काम करणाऱ्या सदस्य आहेत. त्या आपल्या नऊ मुलांना स्वतःच्या हिंमतीवर वाढवत आहेत. त्यांना २०० रुपये रोजगार मिळत असून महिन्याचे १५ दिवस त्यांना काम मिळतं.
त्या आपल्या मागे रेशनच्या रांगेत बसलेल्या ३५ वर्षीय परमेश्वरी यांच्याकडे फोन देतात. त्यादेखील रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागीर आहेत. परमेश्वरी (त्या केवळ पहिलं नावच वापरू इच्छितात) सांगतात की त्यांचे पती बांधकामावर मजुरी करतात, पण लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने ते बसून आहेत. “ना काम, ना खाण्यासाठी पैसा,” त्या म्हणतात. पाच किलो कणिक, एक किलो डाळ आणि धणे, हळद व तिखट यांचे प्रत्येकी २०० ग्रॅमची पाकिटं यावर त्यांचे पती आणि चार मुलांचं कुटुंब कसं तरी निभावून नेईल अशी दुर्गादेवींप्रमाणे त्यांनाही आशा आहे.
चांदी देवी, वय ६५, हल्ली शिबोरीचं काम करत नाहीत, पण रेशन घेण्यासाठी इतरांप्रमाणे रांगेत उभ्या राहिल्या आहेत. “शेवटचं जेवले त्याला २४ तास उलटले. भात खाल्ला. कोरडा भात. काल काही अन्न घेऊन एक गाडी आमच्या वस्तीत आली होती, पण माझं चालणं हळू. आणि मी तिथे पोचेपर्यंत सगळं संपून गेलं होतं. मला कडकडून भूक लागलीये.”










