संध्याकाळ होताच तो एका बागेत गेला. सुनसान. बाकड्यावर बसताना जवळ असलेली लांब काठी आणि फोन बाजूला ठेवून दिला. वर्षातून दुसर्यांदा ती बाग अगदी सुनसान आणि शांत झाली होती. लहान मुलं आणि मोठी माणसं पुन्हा एकदा आपल्या घरात अडकून पडलेली.
काही दिवस झाले तो बागेत येत होता. रात्र होताच, रस्त्यावरील दिवे लागताच, मैदानावर झाडांच्या फाद्यांच्या सावल्या पडू लागल्या. झाडांमधून हलकी झुळूक येत होती. भिरभिरत येणारा पाचोळा त्याचं लक्ष वेधून घेत होता पण त्याच्या आत दाटून आलेला अंधार अधिक गडद होत होता. त्या वादळाचा सामना करत तो तासंतास तिथे शांत बसून होता.
पंचविशीच्या त्या तरुणाला आसपासचे काही जण ओळखत असले, तरी बहुतांश लोकांसाठी तो अपरिचितच होता. त्याने घातलेला युनिफॉर्म बघून तो करत असलेलं काम लक्षात येत होतं, तो जवळच्याच एका इमारतीत चौकीदार म्हणून काम करत असे. त्याचं नाव? कुणाला काय पडलंय? सात वर्षं काम करूनही इमारतीतील ‘जमीनदारांसाठी’ तो अनोळखीच होता, त्याच्या अस्तित्वाची त्यांना कसलीही फिकीर नव्हती.
तो उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातून आला होता. तिथेच कवी आणि कथाकार असलेल्या त्याच्या वडलांचा खून करण्यात आला होता. का? आपले विचार मांडल्याबद्दल, व्यक्त केल्याबद्दल. त्यांची एकमेव ठेव, त्यांचं लेखन आणि पुस्तकं, जाळून टाकण्यात आली होती. मागे राहिलं होतं मोडकळीला आलेलं, अर्धवट जळालेलं एक झोपडीवजा घर, दुःखाचा डोंगर कोसळलेली आई आणि घाबरलेला १० वर्षाचा मुलगा. मारेकरी तिच्या मुलालाही घेऊन जातील या भीतीखाली तिने घाबरून आपल्या मुलाला पळून जायला सांगितलं होतं.
त्याला शिकायचं होतं, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊन ठेवत लिहायचं होतं, परंतु त्याला मुंबईत रेल्वे स्टेशनवर लोकांचे बूट पॉलिश करावे लागत होते. त्याने गटारं साफ केली, बांधकामावर काम केलं आणि काही वर्षात तो चौकीदाराच्या नोकरीपर्यंत पोहोचला. चौकीदार म्हणून मिळणाऱ्या पगारातून तो आईला पैसे पाठवू लागला. त्याच्या आईने लगेचच लग्न कर म्हणून त्याला गळ घातली होती.



