“सगळे तरणेताठे आजारी पडले आणि गोळ्या खात होते. मी नाय. मी चालणं थांबवलं नाय,” अभिमानाने कमळी सांगतात.
वारली आदिवासी असणाऱ्या कमळी मार्च २०१८ मध्ये नाशिक ते मुंबई असा १८० किलोमीटरचा पल्ला पार करणाऱ्या ऐतिहासिक लाँग मार्चमधल्या ४०,००० शेतकऱ्यांपैकी एक. त्यांच्यासारख्या मेणाहून मऊ पण लढवय्या शेतकऱ्यांची चिकाटी पाहूनच सरकारला त्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या मागण्या मान्य करणं भाग पडलं.
दोन महिन्यांनी, ३ मे रोजी कमळी पुन्हा एकदा रस्त्यात उतरल्या होत्या, या वेळी डहाणूमधल्या निर्धार मोर्चात सामील होण्यासाठी. लाँग मार्चप्रमाणे हा मोर्चादेखील अखिल भारतीय किसान सभेने आयोजित केला होता, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा त्यांचा निर्धार व्यक्त करण्यासाठी. या मोर्चालाही ३५,००० शेतकरी आले होते. दुपारच्या भाजून काढणाऱ्या उन्हात कमळी मोर्चासोबत चालत होत्या. लाँग मार्चचं यश आणि हा लढा पुढे कसा चालू ठेवायचा याबद्दल किसान सभेचे नेते काय सांगत होते ते त्या जिवाचा कान करून ऐकत होत्या.
कमळी बाबू बाहोटा या ज्येष्ठ क्रांतीकारी आहेत. ठाणे पालघरच्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या सदस्य असणाऱ्या कमळी पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातल्या चरोटी नाक्याजवळ आवळवेडा पाड्यावर राहतात. आजवर शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे. किसान सभेच्या दिल्लीत झालेल्या [२०१२ आणि २०१५] दोन सभांमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.



