पावसाळ्याच्या दिवसात यश महाळुंगेला दररोज आपला जीव धोक्यात टाकावा लागतो, तेही शाळेत जाण्यासाठी. आठ वर्षांचा यश अर्धवट पडलेल्या पुलाच्या निसरड्या कठड्यावरून चालत जातोय, त्याच्यासोबत इतर काही मुलं-मुली आणि त्यांचे पालकही आहेत. इथून जर का पडलं तर थेट काही फूट खोल झाडं-झुडपं आणि चिखलाचा गाळ आहे.
रोज सकाळी दोनदा, शाळेत जाताना आणि घरी परत येताना, मुलांचा हा घोळका एका रांगेत चालत असतो, बहुतेक जण अनवाणीच पायपीट करतात, तेही एका हातात छत्री आणि पाठीवरच्या शाळेच्या दप्तराचं ओझं सावरत. ३० सेकंद जीव मुठीत घेऊन चालल्यानंतर, त्यांचे पाय पुलाच्या शिल्लक राहिलेल्या सिमेंटच्या पृष्ठभागावर सुरक्षित पडतात. तिथून पुढे औरे पाल्हेरीतल्या त्यांच्या घरी पोहचण्यासाठी ते चिखलाच्या पायवाटेवर चालू लागतात – त्यांचा पाडा आवरे गावातल्या शाळेपासून दोन किलोमीटर दूर आहे.
“मी खाली बघितलं ना तर भीती वाटते. असं डोकं फिरतं. मी बाबाचा हात घट्ट धरतो मग,” यश सांगतो.
अगदी २००५ पर्यंत औरे पाल्हेरीतल्या ७७ रहिवाशांना (आवरे ग्रामपंचायत कार्यालयातील नोंदीनुसार) ही असली जीवघेणी कसरत करावी लागत नव्हती. तेव्हा भातसा नदीचा प्रवाह ओलांडण्यासाठी लहानसा पूल होता. पण त्या वर्षी २८ जुलैला मुसळधार पाऊस पडला आणि हा पूल वाहून गेला. १९९८ साली ठाणे जिल्हा परिषदेतर्फे पूल बांधण्यात आला होता. त्या पावसात पुलाचा मधला भाग वाहून गेला आणि फक्त दोन्ही बाजूचे कठडेच शिल्लक राहिले आहेत.










