हे स्थलांतर काही मनमर्जीने होत नाही. माणसांनी पाळलेल्या म्हशींचं हे स्थलांतर आहे. दर वर्षी ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातले गवळी लोक म्हशींचे कळप देवी नदी पार करून नेतात. हे सगळं घडतं ते कडक उन्हाळ्यात. पल्याडच्या किनाऱ्यावरच्या नव्या कुरणांच्या शोधात. आणि नंतर त्या म्हशी पोहत माघारीही येतात. सेरेनगेट्टी अभयारण्यातल्यासारखं भव्य नसलं तरी हे एक विलक्षण दृश्य आहे हे निश्चित.
एक दिवस नहाराना ग्राम पंचायतीजवळ मी हा सगळा ताफा पाहिला. गाव देवी नदीच्या किनारी हे गाव वसलं आहे. देवी नदी ओडिशाच्या पुरी आणि जगतसिंगपूर या किनारी जिल्ह्यांमधून वाहते आणि ती महानदीची मुख्य शाखा आहे.






















