"या उत्सवातून आम्हाला उमेद मिळते," बलबती माझी म्हणतात. त्या आणि कुटिया खोंड समुदायाच्या इतर आदिवासी बाया एका स्थानिक देशी वाणाच्या उत्सवाची तयारी करत होत्या. डोंगर आणि घनदाट जंगलात वसलेल्या बुर्लूबरू गावात सध्या नुसती लगबग सुरू आहे. डोक्यावर देशी बियाण्यानी भरलेली मातीची छोटी मडकी ठेवून महिला ढाप व तामुक या पारंपरिक ढोलांच्या तालावर नाचत होत्या.
त्या आपल्या गावाच्या केंद्रस्थानी असलेल्या धरणी पेनूच्या (धरणी माता) देवळात जमल्या होत्या. गावच्या पुजाऱ्याने पूजा केल्यावर त्यांनी उत्सवाच्या ठिकाणी – ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील तुमुडीबंध तालुक्यातल्या त्यांच्या गावाजवळल एका खुल्या मैदानात – मिरवणूक काढली.
"आम्ही सुगीसाठी पूजा करतो. कधीकधी आम्ही बकरं अन् कोंबडी सुद्धा चढवतो. चांगलं पीकपाणी म्हणजे वर्षभर पोटाला खाणं मिळतं. आम्ही उत्सवात एकमेकींकडून बिया घेतो आणि देतो, म्हणून आमच्याकडून ज्यांनी बिया घेतल्या त्यांच्या रानात पण चांगलं पीक येवो, अशी प्रार्थना आम्ही करतो," ४३ वर्षीय बलबती म्हणाल्या. त्यांचं कुटुंब दोन एकरात तृणधान्यं व मक्याचं पीक घेतं.
यावर्षी कोटागढ, फिरिंगिया आणि तुमुडीबंध तालुक्यातल्या गावांतील बलबती व आणखी ७०० आदिवासी शेतकरी महिला या वार्षिक बीज उत्सवात सहभागी झाल्या. मार्चमध्ये कापणीच्या दरम्यान आयोजित होणाऱ्या या समारंभात बियांचं प्रदर्शन व देवाणघेवाण, बीमोड झालेल्या वाणांचं पुनरुज्जीवन आणि प्रसंगी शेतीच्या पद्धतींवर चर्चा होते.






