“आम्ही आता कधीच परत जाणार नाही,” भीमा सोदी म्हणतात. “आम्ही आमच्या मूळ गावी जंगलवाले [नक्षलवादी] आणि जुडूमवाले [सलवा जुडूमची सेना] या दोघांमुळे हैराण झालो होतो.”
सोयम् लिंगमा देखील आपल्या मूळ गावी कधीच परत जाणार नाही, असं म्हणतात. छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील भंडारपदर हे त्यांचं मूळ गाव. छत्तीसगडमधून बाहेर पडून आता आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील बुर्गमपाडू मंडलात चिपुरूपाडू येथे राहणाऱ्या २७ कुटुंबांपैकी ते आणि भीमा.
आंध्र प्रदेशातील पूर्व व पश्चिम गोदावरी तसेच तेलंगणातील खम्मम् आणि वारंगळ जिल्ह्यातल्या अंतर्गत विस्थापितांच्या अनेक वस्तींपैकी ही एक.
यातील बहुतांश लोकांना हिंसेचा प्रत्यय आला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोंटा मंडलात ताडमेटला या गावात राहणारा ३० वर्षीय रवी सोदी सांगतो, “२००५ मध्ये आमच्या गावावर आक्रमण झाल्यावर आम्ही आमचं राहतं घर सोडलं…. अख्खं गाव पळून जंगलात लपून बसलं, मात्र माझा तिशीतला चुलता मात्र घरातच अडकला होता. त्याला पकडून ठार करण्यात आलं आणि नंतर पूर्ण गाव आग लावून जाळण्यात आलं. भीतीपोटी आम्ही इथे राहायला आलो.” रवी आता खम्मम् जिल्ह्यातील चिंतलपाडू गावात राहतो.







