फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तीन शेजारी होते - कॅथरीन कौर, बोधी मुर्मु आणि मोहम्मद तुलसीराम. कॅथी शेतकरी होती. बोधी तागाच्या गिरणीत काम करत असे आणि मोहम्मद गुराखी होता. ‘भारतीय संविधान’ नावाच्या एका जाडजूड ग्रंथाबद्दल शहरातले शिकले सवरलेले लोक बराच आरडाओरडा करत होते. पण या ग्रंथराजाचं काय करायचं, हे या तीन शेजार्यांना मात्र माहीत नव्हतं. कॅथी म्हणाली, काही उपयोग नाही त्याचा... बोधीला वाटलं, कदाचित तो दैवी ग्रंथ असेल... मोहम्मदला मात्र प्रश्न पडला होता, माझ्या मुलांना यामुळे दोन वेळचं जेवण मिळेल का?
एक दाढीवाला राजा निवडून आलाय याची या तिघांना खबरच नव्हती आणि त्यांना खरं तर काही फरकही पडत नव्हता. ‘‘आखिर इतना वक्त किसके पास है?’’ ते म्हणत. काही वर्षांतच पाऊस कमी झाला, डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढला आणि कॅथरीनने कीटकनाशकाची बाटली जवळ केली. पाठोपाठ तागाच्या गिरणीचंही दिवाळं निघालं. त्या विरोधात निदर्शनं करणार्या कामगारांवर पोलिसांनी अश्रूधूर फोडला आणि बोधी मुर्मुला अटक करत कामगारांचं नेतृत्व करणारा दहशतवादी असल्याचा आरोप त्याच्यावर लावला. शेवटी मोहम्मद तुलसीरामची पाळी आली. एके दिवशी गोरजवेळेला त्याच्या गायी घरी परतल्या. त्यांच्या मागे दोन पायाची वासरं धावत तलवार परजत येत होती. ‘‘गौ माता की जय! गौ माता की जय!’’
या आरोळ्या सुरू असतानाच कुठेतरी काही पानं फडफडत होती, निळा सूर्य उगवत होता आणि एक कुजबूज कानावर येऊ लागली होती...
आम्ही, भारताचे लोक, संकल्पपूर्वक निर्धार करतो की....


