बेलडांगा टाउनहून कोलकात्याला जाणारी हजारदुआरी एक्सप्रेस नुकतीच प्लासी स्थानकातून बाहेर पडली आणि डब्यात एकताऱ्याचा आवाज भरून गेला. संजय बिस्वास एका मोठ्या टोपलीत लाकडी खेळणी घेऊन चालले होते. त्यात होता एक चरखा, टेबल लँप, गाडी, बस आणि एक एकतारा.
अतिशय नजाकतीने तयार केलेली ही खेळणी आजूबाजूच्या चिनी वस्तूंच्या - खेळणी, कीचेन, छत्र्या, विजेऱ्या, लायटर – आणि रुमाल, दिनदर्शिका, मेंदीची पुस्तकं, झाल-मुडी, उकडलेली अंडी, चहा, खारमुरे, समोसे, पाणी इतरही असंख्य वस्तू विकणाऱ्यांच्या गर्दीत उठून दिसत होती. या मार्गावर प्रत्येक विक्रेत्याचा डबा आणि मार्ग ठरलेला आहे.
कमीत कमी पैशात वस्तू खरेदी करण्यावर गिऱ्हाइकांचा भर असतो. मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या बेहरामपूर तालुक्यातल्या बेलडांगापासून रानाघाटपर्यंतच्या १०० किलोमीटर आणि दोन तासांच्या प्रवासात हे सगळे फिरते विक्रेते चांगला धंदा करत असतात. बहुतेक सगळे विक्रेते रानाघाटला उतरतात आणि काही कृष्णानगरला. ही दोन्ही या मार्गावरची मोठी स्थानकं आहेत. तिथूनच अनेक जण लोकल गाड्या पकडून आपापल्या गावी जातात.
कुणी तरी एकताऱ्याची किंमत विचारतं. ३०० रुपये, ते सांगतात. गिऱ्हाइक जरा बिचकतो. “हे काही स्वस्तातलं खेळणं नाहीये, मी फार मन लावून ही खेळणी तयार करतो,” संजय सांगतात. “कच्चा मालसुद्धा एकदम भारी. आणि एकताऱ्याच्या बुडाचं कातडं पण एकदम खरंखुरं.” दुसरा एक प्रवासी म्हणतो, “आमच्या गावातल्या जत्रांमध्ये तर हे अगदी स्वस्तात मिळतात.” संजय उत्तरतात, “तुम्हाला जत्रेत मिळतात तसला स्वस्तातला माल नाही हा. आणि मीही काही लोकांना लुबाडून धंदा करणाऱ्यातला नाही.”
ते दोन्ही बाजूच्या खुर्च्यांच्या मधल्या जागेतून हळू हळू आपली खेळणी दाखवत पुढे जात राहतात. काही छोटीमोठी खेळणी विकली जातात. “घ्या, हातात घेऊन नीट पहा. माझी कला पाहण्याचे काही तुम्हाला पैसे पडायचे नाहीत.” थोड्याच वेळाने एका उत्सुक जोडप्याने कसलीही घासाघीस न करता त्यांच्याकडचा एकतारा विकत घेतला. “हा करायला खूप कष्ट पडतात – त्यातनं येणारे सूर तर ऐकून पहा.”
ही कला कुठून शिकलात, मी विचारलं. “मी माझा मीच शिकलो. शाळेतली आठवीची परीक्षा चुकली आणि मग शिक्षण तिथेच थांबलं,” ४७ वर्षीय संजय सांगतात. “जवळ जवळ २५ वर्षं मी बाजाच्या पेट्या दुरुस्त करत होतो. मग मलाच त्या कामाचा कंटाळा आला. गेल्या दीड वर्षापासून मला या कामाचं जणू व्यसन लागलंय. आता लोक पेटी घेऊन आले तर मी मदत करतो त्यांना. पण आता हाच माझा धंदा आहे. यासाठी लागणारी हत्यारंदेखील मी स्वतः हाताने तयार केली आहेत. तुम्ही माझ्या घरी आलात ना तर मी माझ्या हाताने काय काय घडवलंय ते पाहून थक्क व्हाल,” ते म्हणतात. आपल्या कलेबद्दलचा अभिमान त्यांच्या बोलण्यात ओतप्रोत भरला होता.
संजय यांचा नेहमीचा मार्ग म्हणजे प्लासी (किंवा पलाशी) ते कृष्णानगर. “मी आठवड्यातले तीन दिवस या वस्तू विकतो आणि उरलेले दिवस त्या तयार करण्यात जातात. ही खूप नाजूक आहेत आणि ती अशीच तयार करता येत नाहीत. आता ही लाकडी बस तयार करायला किती तरी वेळ लागतो. बघा ना, तुम्ही स्वतःच हातात घेऊन बघा.” एक लाकडी बस माझ्या हातात देत ते सांगतात.
किती कमवता तुम्ही? “आज माझी ८०० ची विक्री झालीये. नफा अगदीच किरकोळ. कच्च्या मालालाच भरपूर पैसे पडतात. मी काही स्वस्तातलं लाकूड वापरत नाही. याला बर्मा टीक, सागवान किंवा शिरिषाचं लाकूड लागतं. मी लाकडाच्या व्यापाऱ्यांकडून माल घेतो. कोलकात्याच्या बडा बाजार किंवा चायना बाजारमधनं चांगल्या दर्जाचा रंग आणि स्पिरिट घेतो. आणि कोणतीच लबाडी मला येत नाही... मी जवळ जवळ पूर्ण वेळ कामच करत असतो. तुम्ही माझ्या घरी आलात ना तर मी दिवस रात्र काम करतानाच दिसेन मी तुम्हाला. लाकडाला चकाकी आणायला मी कोणतं यंत्र वापरत नाही. माझ्या हाताची जादू आहे ही. आणि म्हणूनच इतकं सफाईदार काम दिसतं तुम्हाला.”
संजय यांनी तयार केलेल्या वस्तू ४० रुपयांपासून (शिवलिंग) ते ५०० रुपयांना (छोटी बस) विकल्या जातात. “मला सांगा, तुमच्या शॉपिंग मॉलमध्ये ही बस कितीला विकली जात असेल?” ते विचारतात. “किती तरी प्रवाशांना यामागचे कष्ट दिसतच नाहीत. ते प्रचंड घासाघीस करतात. माझी तर फक्त हातातोंडाची गाठ आहे. कोण जाणो, असा दिवस येईल जेव्हा त्यांना माझ्या कामाचं मोल कळेल.”
गाडी कृष्णानगर स्थानकात येऊ लागताच संजय आपली टोपली घेऊन उतरण्यासाठी सज्ज होतात. आता इथे उतरून ते नडिया जिल्ह्यातल्या बडकुला शहरातल्या घोशपारा बस्तीतल्या आपल्या घरी जातील. ते पेट्या दुरुस्त करतात, इतका सुंदर एकतारा घडवतात ते पाहून मी त्यांना विचारते की तुम्ही गाता का. हसून ते सांगतात, “कधी कधी, आमच्या गावाकडची गाणी.”
अनुवादः मेधा काळे