महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा आपण पास झालोय हे कळाल्यानंतर काही तासातच संतोष खाडेने आपल्या एका मित्राला बीडहून १८० किमी दूर सोलापूरला घेऊन चल अशी विनंती केली. तिथे पोचल्यावर हवेवर डोलणाऱ्या हिरव्या गार ऊसाच्या फडात खोप कुठे ते आधी शोधली. बांबू, गवताचा पेंढा आणि ताडपत्री किंवा चवाळ बांधलेली ही तात्पुरती झोपडी. पुढच्या काही मिनिटात त्याने ती खोप मोडून तोडून टाकली. गेली ३० वर्षं दर वर्षी ऊसतोडीसाठी सहा महिने याच खोपीत त्याचे आई-वडील मुक्कामी असायचे.
“यापुढे माझ्या आई-बापाला परत कधी ऊसतोडीला जावं लागणार नाही या गोष्टीचा आनंद मी भटक्या जमातीच्या ड प्रवर्गातून पहलि आलो यापेक्षाही किती तरी जास्त होता,” संतोष सांगतो. आपल्या ३ एकर कोरडवाहू रानाला लागूनच असलेल्या घराच्या अंगणात तो प्लास्टिकची खुर्ची टाकून बोलत होता.
ही बातमी कळाली तेव्हा डोळ्यातून आधी आनंदाश्रू वाहिले होते आणि त्यानंतर पोटभर हसू. गेली ३० वर्षं बीडच्या पाटोद्याहून ऊसतोडीसाठी सोलापूरला स्थलांतर करणारे ऊसतोडणी कामगार त्याचे आई-बाप. त्याच्या सावरगाव घाट गावातली ९० टक्के कुटुंबं ऊस पिकवणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा कर्नाटकात दर वर्षी ऊस तोडणीला जातात, तो सांगतो.
वंजारी समाजाचा संतोष २०२१ साली एमपीएसची परीक्षा पास झाला. आणि नुसता पास नाही झाला, खुल्या यादीत राज्यात सोळावा आणि भटक्या जमाती-ड या प्रवर्गात तो पहिला आला.
“माझ्या आई-बापानं वर्षामागून वर्षं इतके हाल काढले त्याचं हे फलित आहे. जनावराचं जगणं कसं असतं, तसंच यांचं जगणं आहे,” तो म्हणतो. “माझं पहिलं टारगेट होतं त्यांचे हाल थांबवणं. चांगलीशी नोकरी शोधायची जेणेकरून त्यांना ऊसतोडीसाठी गाव सोडून जावं लागणार नाही.”
भारतातील साखर उद्योगामध्ये दर वर्षी अंदाजे ८०,००० कोटींची उलाढाल होते आणि देशभरात ७०० साखर कारखाने उभारलेले आहेत.
आणि या कारखान्यांचं काम चालतं ते ऊसतोड कामगारांच्या कष्टांवर. एकट्या महाराष्ट्रात यांचा आकडा अंदाजे ८ लाख असल्याचं सांगितलं जातं. यात मराठवाड्यातल्या त्यातही बीड जिल्ह्यातल्या कामगारांची संख्या यात सर्वात जास्त आहे. या कामगारांना उचल दिली जाते, शक्यतो ६० हजार ते १ लाखांच्या आसपास. ही रक्कम पुढच्या किमान सहा महिन्यांमध्ये मजूर जोडप्याच्या कामासाठी आगाऊ मजुरी म्हणून दिली जाते.
उसाच्या फडातली राहण्याची आणि कामाची परिस्थिती भयंकर आहे. संतोषची आई सरस्वती खाडे सांगतात की पहाटे ३ वाजता उठायचं, शिळंपाकं खायचं, संडासचा तर कित्येक वर्षं पत्ताच नाही आणि पाण्यासाठी रानोमाळ चालायचं हे नशीबच होतं. २०२२ साली रेती वाहून नेणाऱ्या टिपरचा त्यांच्या बैलगाडीला धक्का लागला आणि सरस्वतीताई खाली पडल्या. त्यात त्यांचा पाय मोडला.
संतोषने किती तरी सुट्ट्यांमध्ये आई-बापाबरोबर उसाच्या किंवा वाडं गोळा करून त्याच्या मोळ्या बांधायचं काम केलं आहे. बाजारात चाऱ्यासाठी वाडं विकलं जातं. बैलांची सगळंही त्यानं पाहिलंय.
“किती तरी पोरांचं स्वप्न असतं, क्लास वन ऑफिसर व्हायचं. भारी ऑफिस, चांगला पगार, आरामशीर खुर्ची, लाल दिव्याची गाडी,” संतोष म्हणतो. “माझ्या मनात तसलं काहीही नव्हतं. माझं स्वप्न एवढंच होतं – माझ्या आई-बापाला माणसाचं जिणं मिळवून द्यायचं.”
२०१९ साली महाराष्ट्र शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना केली. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी शासनाने या महामंडळाच्या कामगार कल्याण उपक्रमांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, आजही कामगार मात्र अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ऊसतोडीचं काम करत आहेत.
*****
प्राथमिक शाळेत असताना संतोष, त्याच्या दोघी बहिणी आणि चुलत भावंडं वर्षाचे सहा महिने आपल्या आजी-आजोबांपाशी असायची. शाळेतनं घरी यायचं, रानात काम करायचं आणि सांजच्याला अभ्यास करायचा.
संतोष पाचवीत होता तेव्हा त्याच्या आई-वडलांनी त्याला अहमदनगरच्या एका आश्रम शाळेत टाकलं. पिढ्या न् पिढ्यांचे असले काबाडकष्ट त्याच्या वाट्याला येऊ नयेत ही त्यांची इच्छा.
“आम्ही गरीब होतो पण माझ्या आई-बापानं माझे किती तरी लाड केलेत. तिथे नगरच्या शाळेत माझं मन लागत नव्हतं म्हणून त्यांनी मला पाटोद्याच्या वसतिगृहात घातलं. सहावी आणि सातवी मी तिथे काढली.”
वसतिगृह घराजवळ असल्याने संतोष शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांमध्ये पडेल ती काम करायला लागला. कुठे हॉटेलात काम कर किंवा थोडा कापूस विक. त्यातनं जे काही चार पैसे मागे पडायचे त्यातनं दप्तर, पुस्तकं, भूमितीसाठी लागणाऱ्या गुण्यासारख्या वस्तू आणि बाकी गोष्टी आणायच्या. आई-वडलांना त्या काही परवडायच्या नाहीत.
दहावीत जाईपर्यंत त्याला पक्कं समजून चुकलं होतं की त्याला राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जायचंय.
“खरं तर कसंय, इतर कुठलाही व्यावसायिक अभ्यासक्रम पाहिला तर तो मला परवडणाराच नव्हता. माझे आई-वडील दोघं सहा महिने गाव सोडून तोडीला जायचे. तितकं काम केल्यानंतर त्यांच्या हातात ७० किंवा ८० हजार रुपये पडणार. आणि मी असल्या कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेतली असती तर फीच एक ते दीड लाख भरावी लागली असती,” संतोष म्हणतो. “त्यामुळे एमपीएससीची परीक्षा द्यायची हा पर्याय आर्थिक कारणातून आलेला होता. फी भरायची गरज नाही. किंवा एखादी परीक्षा द्यायची तर त्याच्यासाठी कुठला क्लास लावायची भानगड नाही. कुणाचे हात ओले करायला नको, का कुणाचा वशिला ओळख काही नको. माझ्यासाठी करियरचा तो सगळ्यात सोपा मार्ग होता. फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण पास होऊ शकतो.”
पदवीचं शिक्षण घेत असताना संतोष बीडला रहायला गेला आणि तिथेच कॉलेज करता करता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. “मला वाटायचं, माझ्यापाशी वेळ नाहीये. ज्या वर्षी डिग्री हातात पडेल त्याच वर्षी मी स्पर्धा परीक्षेत पास व्हायला पाहिजे असं मला वाटत होतं.”
संतोषचं कुटुंब तोवर पत्र्याचं छत मातीच्या कच्च्या घरात राहत होतं. आजही सावरगाव घाट गावी त्यांच्या नव्या घराच्या मागे या खोल्या तशाच आहेत. संतोष कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याच्या घरच्यांनी नवं घरं बांधायचं ठरवलं. त्यालाही लवकरात लवकर शिक्षण संपवून नोकरी कधी लागेल याची आस लागली होती.
२०१९ साली पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो दिवसभर लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असायचा. तेव्हा तो पुण्यात हॉस्टेलला राहून इतर मुलांबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मित्रांबरोबर जास्त वेळ घालवत नाही, बाहेर कुठे फिरायला जात नाही, चहाला सुद्धा बाहेर पडत नाही अशी त्याची ओळख बनून गेली होती.
“अपुन इधर टाइमपास करने नही आये है,” तो म्हणतो.
कसबा पेठेतल्या लायब्ररीत जाताना तो आपला मोबाइल फोन रुमवरच ठेवून जात असे. तिथे रात्री १ वाजेपर्यंत त्याचा अभ्यास चालायचा. वाचन, आधीच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या, मुलाखतींचा मागोवा घ्यायचा. त्याचं उद्दिष्ट असायचं प्रश्नपत्रिका काढणाऱ्या आणि मुलाखत घेणाऱ्यांच्या मनात काय आहे तो समजून घ्यायचं.
साधारणपणे तो रोज ५००-६०० एमसीक्यू (बहुपर्यायी प्रश्न) सोडवायचा.
५ एप्रिल २०२० रोजी त्याची पहिली लेखी परीक्षा होती. पण कोविड-१९ महासाथीमुळे ती अनिश्चितपणे पुढे ढकलली गेली. “मला मिळालेल्या वेळाचा मी उपयोग करून घेण्याचं ठरवलं.” मग सावरगाव घाटमध्ये आपल्या घराची एक खोली त्याने स्वतःसाठी अभ्यासाची खोली म्हणून वापरायचा निर्णय घेतला. घराचं बांधकाम जवळपास पूर्ण होत आलं होतं. “घराच्या बाहेर जर पडलोच, तर तेही रानात जाऊन आंब्याखाली अभ्यास करायचो किंवा संध्याकाळच्या गार हवेत घराच्या गच्चीवर.”
अखेर, जानेवारी २०२१ मध्ये त्याने राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली. कटऑफहून त्याला ३३ गुण जास्त होते त्यामुळे मेन्स किंवा मुख्य परीक्षेसाठी त्याची निवड झाली. पण ही परीक्षाही पुढे ढकलली गेली. कोविड-१९ ची दुसरी लाट आली होती.
संतोषच्या वैयक्तिक आयुष्यातही काही दुःखद घटना घडल्या. “माझा ३२ वर्षांचा एक भाऊ कोविडमुळे वारला. दवाखान्यात, माझ्या डोळ्यासमोर. आमच्या रानात त्याची माती केली,” तो सांगतो.
त्यांनंतर १५ दिवस तो विलगीकरणात होता. मनाने खचलेल्या संतोषला वाटू लागलं की आता शिकलेला तो एकटाच तरुण आहे आणि आता इथेच रहायला पाहिजे, आपली जबाबदारी आहे. कोविडच्या महासाथीने लोकांचं जगणंच उद्ध्वस्त केलं होतं. कमाई आटली होती. स्पर्धा परीक्षांची वाट सोडून देण्याचा विचारही त्याच्या मनात येऊन गेला.
“पण मग मी विचार करायला लागलो की मी जर आता अभ्यास सोडला तर ऊसतोडीवर जगणाऱ्या कुणालाच आपल्या आयुष्यात चांगलं काही होऊ शकतं ही उमेदच वाटणार नाही,” तो सांगतो.
*****
२०२१ साली डिसेंबर महिन्यात झालेल्या मुख्य परीक्षेत संतोष पास झाला आणि मुलाखतीसाठी त्याची निवड झाली. त्याने आई-वडलांना सांगून टाकलं की येणाऱ्या २०२२ साली त्यांना ऊसतोडीला जावं लागणार नाही.
पण मुलाखतीच्या वेळी तो गांगरून गेला, आत्मविश्वास कमी पडला आणि त्यात काही तो पास झाला नाही. “मला उत्तरं माहित होती, तरी मी सॉरी म्हणत होतो.” फक्त ०.७५ गुणांनी त्याचा कटऑफ गेला. २०२२ ची मुख्य परीक्षा १० दिवसांवर येऊन ठेपली होती. “मी सुन्न झालो. माझे आई-वडील तिथे तोडीला गेले होते. मी खूपच दुःखी होऊन बापूंना फोन केला. आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला दिलेला शब्द काही मी पाळू शकत नाही.”
त्यानंतर जे काही घडलं ते सांगताना संतोषला भरून येतं. त्याला वाटलं होतं की त्याचे वडील त्याला रागावतील. बापू पोलिओमुळे अधू आहेत. निरक्षर आहेत, एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा वगैरे काय असतात ते त्याची त्यांना काहीही कल्पना नाही.
“मला रागवायचं सोडून ते म्हणाले, ‘भावड्या, अरे तुझ्यासाठी मी आणखी पाच वर्षं तोडीला जाईन.’ पण मी माझे प्रयत्न सोडता कामा नयेत. पण मी सरकारी अधिकारी झालेलं त्यांना पहायचंय. दुसऱ्या कसल्याच प्रोत्साहनपर भाषणाची मला गरज भासली नाही.”
मग संतोष परत पुण्यात आला. फोन बंद केला आणि लायब्ररीत जाणं सुरू केलं. पुढच्याच प्रयत्नात त्याचे गुण ७०० पैकी ४१६ वरून ४६१ वर पोचले. आता त्याला मुलाखतीत १०० पैकी किमान ३०-४० गुण पडायला पाहिजे होते.
२०२२ च्या ऑगस्टमध्ये मुलाखती होणार होत्या पण सारख्या सारख्या लांबणीवर पडत होत्या. अखेर त्याच्या आई-वडलांनी त्या वर्षीची उचल घ्यायचं ठरवलं. “त्या दिवशी मी निश्चय केला, आता त्यांना भेटायला जाईन ते हातात काही तरी पक्कं असेल तेव्हाच.”
जानेवारी २०२३ मध्ये मुलाखत झाली आणि त्याला खात्री होती की त्याची निवड होणार. त्याने वडलांना फोन करून सांगितलं की यापुढे त्यांना कोयता हातात घ्यावा लागणार नाही. त्यांनी घेतलेली उचल परत करण्यासाठी त्याने पैसे उसने घेतले आणि सोलापूरला धाव घेतली. आई-वडलांचा सगळा पसारा आणि दोन बैलं पिक-अप ट्रकमध्ये लादली आणि त्यांना घरी पाठवून दिलं.
“ते परत तोडीला गेले तो दिवस माझ्यासाठी काळा दिवस होता. पण ज्या दिवशी मी त्यांनी तिथून वापस घरी पाठवलं त्याच्या इतका आनंदाचा दुसरा दिवस नाही.”