“अगदी सगळ्या प्रकारची वादळं बघितलीयेत मी, पण हे मात्र काही वेगळंच होतं. जवळजवळ बारा तास थैमान सुरू होतं त्याचं. दुपारी बघता बघता माझ्या शेतात पाणी घुसलं... एखाद्या उधळलेल्या बैलासारखं, आमचा पाठलाग करत. माझ्या भावाच्या पांगळ्या मुलाला उचलून मी धावत सुटलो,” स्वपन नायक सांगत होते. पश्चिम बंगालमध्ये सुंदरबन भागातल्या दक्षिण काशियाबाद गावातल्या शाळेत ते शिक्षक आहेत.
दक्षिण काशियाबाद हे साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या काकद्वीप तालुक्यातलं, रामगोपालपूर पंचायतमधलं गाव. या गावाच्या जवळच अम्फान चक्रीवादळ धडकलं, तेव्हा त्याचा वेग होता ताशी १८५ किलोमीटर.
हे असं वादळ गावकऱ्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. २००९ मध्ये आलेलं आयला आणि २०१९ मधलं बुलबुल वादळांनीही सुंदरबनमध्ये नुकसान केलं होतं, पण अम्फानने केलं, तेवढं नाही, असं गावकरी सांगतात.
“आमची शाळा पार उद्ध्वस्त झालीये. तिचं छप्पर उडालं आणि चार वर्गखोल्या ढासळल्या. आता इथल्या जवळपास १०० विद्यार्थ्यांचं भवितव्य अधांतरी आहे,” नायक सांगतात. दक्षिण काशियाबादमधल्या मानब तीर्थ या खाजगी प्राथमिक शाळेत ते शिकवतात.
भारतीय हवामान विभागाने २० मे रोजी इशारा दिला होता की सुंदरबनच्या दिशेने एक अतितीव्र चक्रीवादळ येत आहे. काकद्वीपच्या दक्षिणेकडे सागर बेटाजवळ दुपारी साडेचारच्या सुमाराला ‘अम्फान’ धडकलं. दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात काकद्वीप, कुलतली, नामखाना, पाथारप्रतिमा आणि सागर हे तालुके या ठिकाणाच्या जवळचे... आणि इथेच ‘अम्फान’ने सगळ्यात जास्त नुकसान केलंय.
२९ मे ला आम्ही काकद्वीप बस स्टॅंडहून दक्षिण काशियाबादला निघालो. ४० किलोमीटरचा हा पट्टा पार करायला दोन तास लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडझड दिसत होती. झाडं उन्मळून पडली होती. घरं आणि दुकानं उद्ध्वस्त झाली होती.
दक्षिण काशियाबादला जाताना रस्त्यावरच नेताजी पंचायतमध्ये माधब नगर आहे. तिथे रंजन गायेन आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या घराजवळच्या तळ्यात मासेमारी करत होतं. वादळाने आणलेल्या खाऱ्या पाण्यामुळे खरं तर तळं पार कामातून गेलंय. “या वर्षी गोड्या पाण्यातल्या माशांची शेती करण्यासाठी ७० हजार रुपये खर्च केले होते. सगळे मासे मेलेत आता. बाजारात नेऊन विकण्यासाठी थोडे तरी वाचलेत का ते पाहतोय... माझी नागवेलीची पानंही गेली. कर्जात बुडालोय आम्ही,” गायेन म्हणाला. त्याच्या एकूण नुकसानीचा आकडा आहे एक लाख रुपये. “आता सुखाचे दिवस आम्हाला कधीच दिसणार नाहीत, कधीच नाही.”



















