२३ मार्च रोजी दक्षिण बंगळुरूतल्या बांधकामावर अमोदा आणि राजेश पोचले तेव्हा त्यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची त्यांना कणही कल्पना नव्हती.
जे. पी. नगर भागातल्या बांधकामावर काम सुरू करण्याचा त्यांचं नियोजन दुसऱ्याच दिवशी गडबडलं कारण कोविड-१९ साठीची टाळेबंदी जाहीर करण्यात आली. करोना विषाणूबद्दल त्यांना काहीही माहित नव्हतं – आणि आजही त्यांना ही माहिती नाही. “काळजी घ्या असं काही जण आम्हाला म्हणाले, पण कशाची काळजी घ्यायची तेही आम्हाला माहित नाहीये. आम्हाला इतकंच कळतंय की काम नाहीये,” आम्ही पहिल्यांदा त्यांना भेटलो तेव्हा अमोदा म्हणाली.
अमोदा आणि राजेश, दोघंही २३ वर्षांचे आहेत. ते बंगळुरूतल्या एका बांधकामावरून दुसरीकडे हिंडत असतात. सोबत त्यांची दोन मुलं – तीन वर्षांची रक्षिता आणि एक वर्षांचा रक्षित. सगळं पोटासाठी.
२३ मार्चपासून हे तरुण जोडपं आणि त्यांची कच्चीबच्ची जे. पी. नगर मधल्या बांधकामाच्या ठिकाणीच मुक्कामाला आहेत. त्यांच्या हाताला काम नाही, गाठीला पैसा नाही आणि अन्नाचा साठा संपत आलाय. वीज आणि पाणीही वेळेवर मिळेनासं झालंय. “मुकादम आम्हाला परत येतो, उद्या येतो असा शब्द देऊन जातो. तो नुसता येतो आणि जातो. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. तो कोण आहे, काय करतो. आम्हाला तर त्याचं साधं नावही माहित नाहीये,” अमोदा म्हणते.







