मुरलीधर जवाहिरे एकदा काम करायला बसले की मग चुकीचा किंवा लक्ष विचलित व्हायचा सवालच नाही. त्यांचे हात झपाट्याने काम करत असतात, तोरणाच्या सांगाड्याचे कोने जुळतात, धाग्याने बांधले जातात. दररोज ही तोरणं तयार होत असतात. सत्तरीतल्या जवाहिरेंची काया कृश असली तरी आणि त्यांचं चित्त मात्र एकाग्र, अढळ आहे.
महाराष्ट्राच्या इचलकरंजीत त्यांच्या घराबाहेर त्यांचं कामाचं वेगवेगळं साहित्य पडलेलं दिसतं. बांबूच्या कामट्या, रंगीत कागद, जिलेटिनेचे कागद, वर्तमानपत्र आणि इतरही बरंच काही साहित्य निळ्या-मोरपंखी रंगाच्या घरभिंतींसमोर उठून दिसतंय. थोड्याच वेळात, काही तासांतच या सगळ्या वस्तूंमधून नक्षीदार तोरणं तयार होतील आणि गावातल्या घरांना, देवळांना साज चढवतील.
आपल्या सुरकुतल्या बोटांनी जवाहिरे काका बांबूच्या कामटीचे झटक्यात एकाच लांबीचे ३० तुकडे करतात. त्यानंतर नऊ समभुज त्रिकोण तयार करून, तेही कसलंही मोजमाप न करता, केवळ अंदाजाने, ३ ते १० फूट लांब बांबूच्या पट्टीला चिकटवले जातात.
अधून मधून काका जरमेलच्या पोचे पडलेल्या भांड्यात, चिंचोक्याच्या खळीत बोटं बुडवत असतात. त्यांच्या पत्नी, साठी पार केलेल्या शोभा यांनी सकाळीच खळ करून ठेवलीये.
“काम सुरू असलं की ते चकार शब्द काढत नाहीत, कुणी मध्ये काही बोलायचं पण नाही,” त्या सांगतात.
जवाहिरे काका काही न बोलता बांबूच्या कामट्यांची चौकट तयार करतात. तेवढ्या वेळात शोभा ती सजवण्यासाठी इतर काही सजावट तयार करतात – जिलेटिनच्या कागदाचे तुकडे ओवून रंगीत माळ तयार होते. “घरकामातून जरा सवड मिळाली की मी हे करायला लागते. डोळ्यावर लई ताण येतोय,” त्या म्हणतात.


















