ओखी वादळ येऊन गेलं त्याला आठवडे लोटले तरी जॉन पॉल II रस्त्यावरच्या आपल्या घराच्या व्हरांड्यात अलेल अजूनही उभा होता. दोन वर्षांचा हा चिमुरडा येणाऱ्या प्रत्येकाकडे बघून हसत होता मात्र नजर घराच्या दिशेने येणाऱ्या कच्च्या पाउलवाटेवर खिळलेली होती. आता येतील ते त्याचे वडील येसूदास असतील हेच त्याच्या मनात होतं.
या रस्त्यावरची काही घरं चांदणी आणि चमचमत्या दिव्यांनी सजली होती. मात्र अजीकुट्टनच्या (अलेलचं घरचं लाडाचं नाव) घरी मात्र अंधार होता. आत त्याची आई, ३३ वर्षाची अजिता रडत होती. कित्येक दिवस ती अंथरुणातून उठलीच नव्हती. थोड्या थोड्या वेळाने अजीकुट्टन जाऊन तिला एक मिठी मारायचा आणि परत व्हरांड्यात येऊन उभा रहायचा.
२०१७ चा नाताळ यायच्या आधी काही दिवसांची ही गोष्ट. अजिताने लहानग्या अलेलला सांगितलं होतं की त्याचे बाबा नाताळपर्यंत परत येतील, येताना त्याच्यासाठी नवे कपडे आणि केक घेऊन येतील. पण अलेलचे बाबा परतलेच नव्हते.
अडतीस वर्षाचा येसुदास शिमायोन. ३० नोव्हेंबरला जेव्हा ओखी चक्रीवादळ येऊन थडकलं तेव्हा समुद्रात बोट घेऊन गेलेल्या मच्छिमारांपैकी एक. तिरुवनंतपुरम जिल्ह्याच्या नेय्यतिंकर तालुक्यातल्या करोडे गावात येसुदासचं तीन खोल्यांचं घर आहे. २९ नोव्हेंबर रोजी आपल्या चार साथीदारांसोबत तो समुद्रावर गेला. साथीला एक त्यांचा शेजारी – अलेक्झांडर पोडीथंपी, वय २८. बाकी तिघं तमिळ नाडूचे. अलेक्झांडर आणि त्याची पत्नी २१ वर्षीय जास्मिन जॉन, या दोघांची १० महिन्याची तान्ही मुलगी आहे, अश्मी अलेक्स.






