“आम्ही लाँग मार्च मध्ये [२०१८ साली] तारपा वाजवला होता, आणि आता देखील आमचा तारपा वाजतोय. महत्त्वाचं काही जरी असलं ना तरी आमचा तारपा वाजतोच,” आपल्या हातातल्या या सूरवाद्याबद्दल रुपेश रोज सांगतात. या आठवड्यात महाराष्ट्रातले शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघालेत, त्यातलेच एक आहेत रुपेश. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या जास्त करून पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व्हॅन, टेम्पो, जीप, कार अशा हरतऱ्हेच्या वाहनातून हा जत्था निघालाय.
सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत नवीन कृषी कायदे पारित करण्यात आले त्यानंतर देशभर हे कायदे रद्द करण्याची मागणी रेटत शेतकरी आंदोलन करतायत.
२१ डिसेंबर २०२० च्या दुपारी महाराष्ट्रातल्या तब्बल २० जिल्ह्यातले खास करून नाशिक, नांदेड आणि पालघरमधले २,००० शेतकरी नाशिकच्या मध्यवर्ती भागातील गोल्फ क्लब मैदानात जमलेत. इथून त्यांचा वाहनांचा जत्था दिल्लीला रवाना होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय किसान सभेने या सर्व शेतकऱ्यांना एकत्रित आणलं आहे. यातले सुमारे १,००० शेतकरी मध्य प्रदेशची सीमा पार करून दिल्लीच्या दिशेने रवाना झाले.
यातलेच एक होते पालघरच्या वाडा शहरातले वारली आदिवासी असणारे ४० वर्षांचे रुपेश. “आमची आदिवासींची या तारप्यावर खूप श्रद्धा आहे,” ते सांगतात. “आता आम्ही नाचत गात दिल्ली गाठू.”
“रोज रोज दोन किलोमीटर वरून पाण्याच्या घागरी वाहून आणायचा वीट आलाय आता. आम्हाला आमच्या जमिनीसाठी आणि आमची लेकरांसाठी पाणी पाहिजे,” धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी गीता गांगुर्डे सांगतात. त्या मजुरी करतात. साठीच्या मोहनबाई देशमुख म्हणतात, “आज आम्ही इथे पाण्याच्या मागणीसाठी आलोय. सरकार आमचं म्हणणं ऐकेल आणि आमच्या गावासाठी काही तरी करेल असं वाटतंय.”
अनुवादः मेधा काळे