“तुम्ही त काय सण साजरा केला हवा. आम्ही काय करावा ? काम नाय ,धंदा नाय. कुठून आनायचा पैसा?” आपल्या घराच्या दारात बसून माझ्याकडे एकटक बघत सोनी वाघ, वय ६०, यांनी अचानक प्रश्न विचारला. बाजूच्यांनी त्यांना शांत राहण्याचा इशारा केला पण सोनी यांच्या शब्दात फक्त त्यांच्याच नाही अख्ख्या वाडीची वस्तुस्थिती मांडली होती. कोणीही ती वस्तुस्थिती लपवू शकत नव्हतं. नोव्हेंबर महिन्याचा सुरवातीचा काळ होता, दिवाळी नुकतीच साजरी झाली होती. पण वाडीतल्या कुठल्याच घरावर कंदील दिसत नव्हता ना कुठे सजावटीसाठी दिवे दिसत होते. बोट्याच्या वाडीतील कुठलेच घर, दिवाळीत शहरातली घरं जशी फुलांपानांनी सजतात तसं सजलं नव्हतं.
वाडी शांत होती. आवाज फक्त अंगणात खेळणाऱ्या मुलांचा. जुने व चुरगळलेले कपडे आणि पाय धुळीने माखलेले. काहींच्या अंगावर अर्धवट फाटलेले, बटणं तुटलेले कपडे. अंगणाच्या एका कोपर्यात ८-९ वर्षांच्या ५-६ मुली घर-घर खेळतं होत्या. आपापल्या घरातून आणलेली स्टील व अल्युमिनियमची भांडी समोर मांडलेली होती. जमिनीत रोवलेल्या ४ काठ्यांना चिंधी बांधून लहान बाळासाठी झोळी केली होती.
जवळच एक लहान मुलगी, एका तान्ह्या बाळाला घेऊन इतर मुलींचा खेळ बघत बसली होती. तिच्याजवळ एक मुलगा बसला होता. मी त्यांच्या जवळ गेले तेव्हा ते उठून दुसरीकडे जाऊ लागले. मला काहीतरी विचारायचं आहे हे पाहून ती मुलगी थांबली. “तू शाळेत जातेस का” यावर नाही असं उत्तर आलं. अनिता दिवे, वय वर्ष ९, पहिलीनंतर तिने शाळा सोडली होती. कारण विचारताच उत्तर मिळालं “मला बारक्याला बाळगायला लागतं. त कसं जावं मी शाळेत? घरचे पातल्यावर कामाला जात्यात.”






