लक्षिमा देवीला नेमकी तारीख लक्षात नसली तरी हिवाळ्यात त्या रात्री काय झालं हे चांगलंच लक्षात आहे. तिची पाण्याची पिशवी फुटली तेव्हा “गव्हाचं पीक नुकतंच घोट्यात आलं होतं,” आणि तिची प्रसूती झाली. “डिसेंबर किंवा जानेवारी [२०१८/१९] असेल,” ती म्हणते.
तिच्या घरच्यांनी तिला बडागाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी टेम्पो मागवला. हा दवाखाना उत्तर प्रदेशाच्या वाराणसी जिल्ह्यातील अश्वरी या त्यांच्या गावापासून साधारण सहा किलोमीटर लांब आहे. “पीएचसीमध्ये पोहोचलो तेव्हा मला खूप दुखत होतं,” ३० वर्षांची लक्षिमा म्हणते. तिची तीन मुलं, रेणू, राजू आणि रेशम, (वयोगट ५ ते ११) घरीच होती. “दवाखान्यातल्या माणसाने [कर्मचाऱ्याने] मला भरती करायला मनाई केली. म्हणाला मी पोटुशी नाहीये, एक आजार झाला म्हणून माझं पोट फुगलंय.”
लक्षिमाच्या सासूबाई हीरामणी यांनी तिला भरती करायला तिथल्या कर्मचाऱ्यांशी गयावया केली, पण आरोग्य केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी तरीही नकार दिला. अखेर हीरामणी यांनी त्यांना सांगितलं की तिथे लक्षिमाची प्रसूती करण्यात त्या मदत करतील. “माझा नवरा मला दुसरीकडे नेण्यासाठी ऑटो शोधत होता,” लक्षिमा सांगते. “पण तोवर मी इतकी थकली होती की मला हलता येत नव्हतं. मी केंद्राच्या बाहेरच, एका झाडाखाली बसून गेली,”
साठीच्या हीरामणी लक्षिमाच्या बाजूला तिचा हात धरुन बसल्या होत्या आणि तिला मोठा श्वास घ्यायला सांगत होत्या. तासाभराने, मध्यरात्रीच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला. भोवती काळोख आणि गोठवणारी थंडी होती, लक्षिमाला आठवतं.








