“आम्हाला ज्यांनी इथे आणलं, त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करीत आहे. माझे पती त्यांना विटा बनवण्यात मदत करतात,” हैदराबादेच्या वीटभट्ट्यांमध्ये फिरताना आम्हाला भेटलेल्या उर्वशी सांगत होत्या.
६१ वर्षीय देगू धरूआ आणि ५८ वर्षीय उर्वशी धरूआ यांना वीटभट्टीवर पाहून आम्हाला जरा धक्काच बसला. हे जोडपं पश्चिम ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यातील बेलपाडा ग्राम पंचायतीचा भाग असलेल्या पांडरीजोड गावचं आहे. हा भाग देशातील अत्यंत गरीब भागांपैकी एक.
मी गेली २० वर्षे वृत्तांकन करीत असलेल्या पश्चिम ओडिशातून लोक गेली ५० वर्षे कामासाठी स्थलांतर करीत आहेत. उपासमार, भूकबळी आणि नाइलाज म्हणून मुलांची विक्री अशासाठी हा भाग प्रसिद्ध होता. आणि अर्थात हे सगळं गरिबी आणि चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणून होत आहे.
१९६६-६७ मध्ये आलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीनंतर स्थलांतराची सुरुवात झाली. ९० च्या दशकात कलाहांडी, नौआपाडा, बोलांगीर आणि इतर जिल्ह्यांतून स्थलांतरात वाढ झाली. त्यावेळी आम्ही पाहत होतो की, ज्या लोकांना मजूर म्हणून काम करणं शक्य होतं त्यांनी स्थलांतर केलं, मात्र वयोवृध्द लोक तिथेच मागे राहिलेत.





