“गेली २१ वर्षं मी शेती करतोय, हे असं संकट कधी पाहिलं नव्हतं,” चितरकाडू गावातले कलिंगडाचे शेतकरी, ए. सुरेश कुमार सांगतात. इथल्या इतर शेतकऱ्यांप्रमाणे ४० वर्षीय कुमार प्रामुख्याने भातशेती करतात, पण हिवाळ्यामध्ये त्यांच्या पाच एकर रानात आणि नातेवाईक आणि मित्रांकडून भाडेपट्ट्यावर घेतलेल्या १८.५ एकरात कलिंगडं घेतात. १८५९ वस्तीचं त्यांचं गाव तमिळ नाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातल्या चिथमूर तालुक्यात आहे.
“६५ ते ७० दिवसांत कलिंगडं तयार होतात. आमची सगळी तयारी झाली होती, आता फळं काढून तमिळ नाडू, बंगळुरु आणि कर्नाटकातल्या वेगवेगळ्या खरेदीदारांकडे माल पाठवायची तयारी सुरू होती आणि २५ मार्च रोजी टाळेबंदी जाहीर झाली,” ते सांगतात. “आता सगळा माल सडायला लागलाय. एरवी आम्हाला टनाला १०,००० चा भाव मिळतो, पण यंदा कुणीही २००० च्या वर भाव सांगत नाहीये.”
तमिळ नाडूमध्ये कलिंगडाची लागवड तमिळ कालगणनेनुसार मरगळी आणि थई महिन्यात म्हणजे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान केली जाते. या भागात याच काळात फळांची वाढ चांगली होते. दक्षिणेकडचा उन्हाचा कडाका वाढायला लागला की फळं काढणीला येतात. कलिंगडं करणाऱ्या राज्यांच्या यादीत तमिळ नाडू आठव्या स्थानावर आहे – ६.९३ हजार हेक्टर जमिनीतून १६२.७४ टन फळाचं उत्पादन होतं.
“मी माझ्या रानात तुकड्या-तुकड्यामध्ये अशी लागवड केलीये की साधारणपणे दर दोन आठवड्याच्या अंतराने फळं तयार व्हावीत. फळ तयार झाल्यावर जर लगेच काढलं नाही तर ते वाया जातं,” कुमार सांगतात (शीर्षक छायाचित्रात) “आम्हाला या टाळेबंदीबद्दल काहीही सांगितलं गेलं नाही. त्यामुळे माझा माल तयार झाला [मार्चचा शेवटचा आठवडा], आणि गिऱ्हाईकच नाही ना माल वाहतुकीसाठी ट्रकचालकही नाहीत.”
कुमार यांच्या अंदाजानुसार चिथमुर तालुक्यात कलिंगडाची शेती करणारे ५० तरी शेतकरी असतील. आता अनेकांना फळ सडू द्यायचं किंवा कवडीमोल भावात विकायचं हेच त्यांच्यासमोरचे पर्याय आहेत.






