अनंतपूरमधल्या आंबेडकरांच्या पुतळ्याला दररोज नवा पुष्पहार घालण्यात येतो. रोज सकाळी ८:३० च्या सुमारास ए. सुभान त्यांच्या कुटुंबीयांनी गुंफलेला गुलाब आणि कमळाचा हार आंबेडकरांच्या सोनेरी पुतळ्याला अर्पण करतात. सुभान नाही तर त्यांचा १७ वर्षांचा भाचा बबलू, दोघं मिळून नेमाने हे काम पार पाडतात.
हा नेम २०१० पासून सुरु झाला. त्या वर्षी वाहतुकीला अडथळा म्हणून आंबेडकरांचा एक पुतळा पाडण्यात आला व त्याच्या ऐवजी हा पुतळा उभा करण्यात आला. हा पुतळा क्लॉक टॉवरपासून १ किमी दक्षिणेला अनंतपूर शहराच्या मध्यवर्ती भागात उभा असून सुभान यांच्या फुलांच्या दुकानाहून चालत जाण्याच्या अंतरावर आहे.
जवळपासचे इतर पुतळे मात्र एवढे सुदैवी नाहीत. त्याच रस्त्यावर क्लॉक टॉवरनंतर लगेच इंदिरा गांधींचा पुतळा लागतो. आता तो गोणपाटाने झाकून ठेवण्यात आला असला तरी आंध्र प्रदेशात काँग्रेसचं शासन असताना (२००४–२०१४) त्याला चांगले दिवस आले होते. २०१३ मध्ये या पुतळ्याची जुनी प्रतिकृती आंध्र प्रदेश विभाजन विरोधकांनी जाळली होती. त्यानंतर नवा पुतळा बसवण्यात आला खरा, पण तो झाकूनच ठेवण्यात आला आहे. याच रस्त्यावर असलेला राजीव गांधींचा पुतळा देखील झाकून ठेवण्यात आला आहे. यातून जणू काही काँग्रेस पक्षाचं राज्यातील अंधारलेलं भवितव्यच अधोरेखित होतंय!







