किर्र काळोख होता. पण सूर्योदयाची वाट पाहणं त्यांना परवडण्यासारखं नव्हतं. मध्यरात्र होती, २ वाजले होते. तीन तासात त्यांना पकडण्यासाठी पोलिस तिथे पोचले असते. कसरापू धनराजू आणि त्यांचे दोन साथीदार पोलिसांचा पहारा सुरू होण्याच्या आतच निसटले. आणि अगदी थोड्याच वेळात ते मुक्त होते – दर्यावर.
“मी सुरुवातीला फार घाबरलो होतो,” १० एप्रिलला ते कसे निसटले त्याबद्दल ते सांगतात. “मला सगळा धीर गोळा करावा लागला होता. पैशाची निकड होती. भाडं थकलं होतं.” ४४ वर्षीय धनराजू आणि त्यांचे साथीदार – सगळेच हातघाईला आलेले मच्छीमार – मोटर लावलेल्या त्यांच्या छोट्या होडीतून समुद्रात पसार झाले. टाळेबंदीमुळे बंदरावरची मासेमारी आणि इतर कामं थांबवण्यात आली आहेत. रोज पहाटे ५ वाजता, विशाखापटणमच्या फिशिंग हार्बर (मासेमारीचा धक्का)च्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिस येतात. इथल्या बाजारात आता लोक आणि मच्छीमार, कुणीच येऊ शकत नाहीत.
सूर्योदयापूर्वी धनराजू ६-७ किलो बंगारू ठिगा (कॉमन कार्प) घेऊन परत आले पण “ते सगळं जरा धोक्याचंच होतं,” ते सांगतात. “मी परत आलो आणि काही मिनिटातच पोलिस आले. मी त्यांच्या हातात सापडलो असतो ना तर त्यांनी मला मारलं असतं. पण गळ्याशी आलं की जीव वाचवायला काहीही करावं लागतं. आज मी भाडं भरेन. पण उद्या आणखी काही तरी निघणार. मला काही कोविड-१९ झाला नाहीये, पण त्याच्या आर्थिक झळा मला बसतायतच.”
पोलिसांपासून लपून, स्वतःच्या जुन्या गंजलेल्या रोमा सायकलवर एक फळा आडवा टाकला आणि त्या स्टॉलवरून चेंगर लाव पेटामधल्या एनटीआर बीच रोडवर त्यांनी गुपचुप मासळी विकली. “मला मेन रोडवर सायकल नेता यायला पाहिजे होती, पण पोलिसांची भीती होती,” धनराजू सांगतात. एरवी २५० रुपये किलो भावाने विकला जाणारा मासा त्यांनी १०० रु. किलोने विकला.
एरवी धनराजूंना ६-७ किलो कार्पच्या विक्रीतून १५००-१७०० रुपये मिळाले असते. पण सायकलवरच्या त्यांच्या स्टॉलकडे फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही. त्यामुळे त्यांना दोन दिवस ही मासळी विकावी लागली आणि अखेर ते केवळ रु. ७५० कमवू शकले. त्यांच्यासोबत पाप्पू देवी होत्या. ४६ वर्षीय देवी गिऱ्हाइकांना मासळी साफ करून, कापून देतात. प्रत्येक गिऱ्हाइकाकडून त्यांना या कामाचे १०-२० रुपये मिळतात. पैशासाठी त्याही धोका पत्करून काम करत होत्या.
धक्क्यावर सगळे व्यवहार सुरळित चालू असतात तेव्हा पाप्पू देवींची दिवसाला २००-२५० रुपये तरी कमाई होते. त्यांच्याकडे मासळी साफ करायची आणि कापून द्यायची एवढंच काम होतं. “सध्या मी दिवसातून एकदाच जेवतीये. जूनपर्यंत कळ काढायचीये. काय माहित, या कोरोनामुळे जूनच्या पुढेही [लॉकडाउन] जाईल,” त्या म्हणतात. क्षणभर गप्पर राहून त्या आशेने म्हणतात, “मला तर वाटतंय की कसं तरी भागेल.” पाप्पू विधवा आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत. त्या मुळच्या आंध्र प्रदेशातल्या विजयानगरम जिल्ह्यातल्या मेंताडा तहसिलातल्या इप्पालवलसा गावच्या रहिवासी आहेत.
पाप्पू देवींनी त्यांच्या दोघी मुलींना मार्च महिन्यात आपल्या आई-वडलांकडे इप्पालवलसाला पाठवून दिलं. “माझ्या आई-वडलांची काळजी घ्यायला,” त्या सांगतात. “मीदेखील या महिन्यात जाणार होते. पण आता काही ते शक्य दिसत नाहीये.”
२ एप्रिल २०२० पर्यंत मच्छिमारांना समुद्रात जायची अधिकृतरित्या परवानगी नव्हती. शिवाय दर वर्षी विणीच्या हंगामात – १५ एप्रिल ते १४ जून – मासेमारीवर बंदी असते. म्हणजे काय तर इंजिनांवर चालणाऱ्या आणि यांत्रिक बोटींना या काळात मासेमारी करता येत नाही. जेणेकरून प्रजनन काळात माशांचं संवर्धन व्हावं. “मी १५ मार्च रोजीच मासे धरणं थांबवलं. दोन आठवडे आधीपासून माशाला निम्मा किंवा त्याहून कमी भाव मिळत होता,” चेंगल राव पेटा परिसरात राहणारे ५५ वर्षीय वासुपल्ले अप्पाराव सांगतात. “मार्च महिन्यात मी केवळ ५००० रुपयांची कमाई करू शकलो.” एरवी दर महिन्याची त्यांची कमाई १० ते १५ हजार इतकी असते.
“एप्रिलच्या पहिल्या दोन आठवड्यांत आम्हाला चांगला नफा कमवता येतो [नंतर दोन महिने मासेमारी असते] कारण त्या काळात भरपूर गिऱ्हाइक असतं,” अप्पाराव सांगतात. “गेल्या वर्षी, विणीचा काळ सुरू होण्याआधी १०-१५ दिवसांत मी १५,००० रुपयांची कमाई केली होती,” ते खुशीत येऊन सांगतात.
या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच माशाच्या किंमती धडाधड कोसळायला लागल्या होत्या – वंजारम (सुरमई) आणि सांदुवई (पापलेट) एरवी १००० रु. किलो भावाने विकले जातात, त्याला किलोमागे ४००-५०० रुपये भाव मिळत होता. अप्पाराव यांच्या मते कोरोनो विषाणूसंबंधी जे काही भीतीचं वातावरण तयार झालं होतं त्याचा हा परिणाम होता. “एक माणूस आला आणि म्हणाला की जाळं टाकू नको, माशांमध्ये चीनमधला विषाणू आलाय म्हणून,” ते हसतात. “मी काही शिकलेलो नाहीये, पण मला नाही वाटत हे खरं असेल म्हणून.”
सरकारने देऊ केलेलं मोफत धान्य – प्रत्येक व्यक्तीला पाच किलो तांदूळ – मिळालं तरी येणारा काळ खडतर असणार याची अप्पाराव यांना जाणीव आहे. “तसंही दर वर्षी विणीचा हंगाम आमच्यासाठी खडतर असतो, पण त्या आधी जो काही नफा मिळालेला असतो त्यावर आम्ही त्या काळात भागवतो,” ते सांगतात. “पण यंदा सगळंच वेगळं आहे. आमच्यापाशी कमाईही नाही आणि नफ्याची बातच सोडा.”
१२ एप्रिल रोजी राज्य सरकारने मच्छीमारांसाठी टाळेबंदीचे निर्बंध जरा शिथिल केले आणि त्यांना तीन दिवस दर्यावर जायची परवानगी दिली. तसंही या ७२ तासांनंतर दोन महिने मासेमारी थांबणारच होती. यामुळे त्यांना तोडा दिसाला मिळाला – पण “फारच कमी वेळ दिला,” अप्पारावांना वाटतं, “तसंही टाळेबंदीच गिऱ्हाईकही खूपच कमी असणार.”
चेंगल रान पेटाच्या एका लहानशा बोळात चिंतापल्ले ताताराव राहतात. काडेपेट्या वेड्यावाकड्या रचून ठेवल्या तर दिसतील अशा घरांच्या वस्तीत त्यांचंही घर आहे. यातला एक जिना त्यांच्या अंधाऱ्या घराकडे जातो. ४८ वर्षीय ताताराव रोज पहाटे उठतात आणि चालत चालत समुद्र किनारा दिसेल तिथपर्यंत जातात. टाळेबंदीच्या काळात त्यांना तेवढंच अंतर जाण्याची परवानगी आहे. पाप्पू देवींप्रमाणे तेही मूळचे विजयानगरम जिल्ह्यातल्या इप्पालवलसा गावचे आहेत.
“मला दर्याची याद येते. मला धक्क्याची य़ाद येते. मला मच्छीची याद येते,” ते हसत सांगतात, पण त्या हसण्याला दुःखाची किनार आहे. मासळीतून होणाऱ्या कमाईचीही कमतरता त्यांना जाणवतच असणार. २६ मार्च २०२० नंतर ते दर्यावर गेलेले नाहीत.
“बर्फात ठेवूनही त्या आठवड्यात किती तरी मासळी उरली होती,” ताताराव सांगतात. “बरं झालं, उरली,” त्यांच्या पत्नी सत्या मध्येच म्हणतात, “आम्हाला चांगली मासळी तर खायला मिळाली!”
४२ वर्षांच्या सत्या घरचं सगळं पाहतात आणि तातारावांना मासळी विकायला मदत करतात. टाळेबंदी लागल्यापासून घर कसं भरून गेल्यासारखं असं त्यांना वाटतंय. “एरवी मी एकटीच असते. पण आता माझा नवरा आणि मुलगा दोघंही घरी आहेत. किती तरी महिने आम्ही दुपारी किंवा रात्री एकत्र जेवलो नव्हतो. पैशाची अडचण असली ना तरी आम्ही एकमेकांबरोबर वेळ घालवतोय ते मला फारच आवडतंय,” त्या म्हणतात. आणि ते सांगताना त्यांचा चेहरा खुललेला दिसतो.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी बोट विकत घेतली त्यासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं त्याचाच विचार तातारावांना सतावतोय. ते म्हणतात की काहीच नाही तर त्यांना सावकारांकडून कर्ज काढून या वर्षाच्या अखेरपर्यंत कर्ज फेडावं लागेल. “मासळीला सध्या इतका कमी भाव मिळतोय की तीन दिवस मासेमारी करून काहीही फरक पडणार नाही,” ते म्हणतात. “मासळी धरण्यापेक्षा बऱ्या किंमतीला विकणं हेच महाकठिण होऊन बसलंय.”
“मला माझ्या मुलाचीही काळजी लागून राहिलीये. गेल्या महिन्यात त्याची नोकरी गेली,” ते सांगतात. चिंतापल्ले तरुण, वय २१ एका खाजगी कंपनीत वेल्डरचं काम करत होता. फेब्रुवारीच्या शेवटी त्याचं कंत्राट संपलं. “मी रोजगाराच्या शोधात होतो आणि त्यात हा कोरोना विषाणू...” तो सुस्कारा टाकतो.
“आम्ही झोपडपट्टीत राहतो, आमच्यासाठी सामाजिक अंतर ठेवणं अशक्य आहे. अजून तरी या भागात कोणाला लागण झाल्याचं समजलं नाहीये, पण देव न करो, असं काही झालं – तर मात्र आमची सुटका नाही,” ताताराव म्हणतात. “कोणताही मास्क किंवा सॅनिटायझर आम्हाला वाचवू शकणार नाही.” त्यांच्याकडे सर्जिकल मास्क नाही आणि ते तोंडाला रुमाल बांधतात. सत्या त्यांचं तोंड साडीच्या पदराने झाकून घेतात.
“जे काही चाललंय ते आमच्यासाठी फारसं बरं चाललंय असं वाटत तरी नाही,” ताताराव कसंबसं हसून सांगतात. “मला किंवा माझ्या घरच्या कुणाला विषाणूनी गाठलं तर आमच्याकडे काही उपचारासाठी पैसा नाही.” आणि सत्या सांगतात, “आमचा कुणाचाच आरोग्याचा विमाही नाही आणि बचतही नाही. फक्त डोक्यावर कर्जाचा बोजा आहे आणि पोटात भूक.”
ताताराव, सत्या आणि पाप्पू देवी विशाखापटणमहून इथे स्थलांतर झालेल्या मच्छीमारांपैकी आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणाहून इथे आले आहेत. एरवी, ते अधून मधून शक्यतो माशांच्या विणीच्या हंगामात दोन महिने आपापल्या गावी जाऊन येतात. यंदा काही त्यांना संधी मिळेल असं वाटत नाही.
“पूर्वी आम्हाला या दोन महिन्यांचं भाडं भरावं लागायचं नाही – पण आता द्यावं लागणार,” ताताराव सांगतात. “विणीच्या काळात [गावी] आम्ही शेतात किंवा इतर काही छोटी मोठी कामं करायचो, त्याचे दिवसाला ५० रुपये तरी मिळायचे.” जंगली प्राण्यांपासून शेतमालाचं किंवा उभ्या पिकांचं रक्षण करण्याचं काम त्यांना मिळायचं.
“कधी कधी मी त्यातही घोळ घालतो,” ते हसून सांगतात. “मच्छीमारांना इतर कोणतंच ब्रथुकु थेरुवु [व्यवसाय किंवा काम] येत नाही. सध्या तरी आम्हाला इतकीच आशा आहे की विणीचा हंगाम संपल्यानंतर हा विषाणू गेला असेल.”
प्रजाशक्ती, विशाखापटणमचे ब्यूरो चीफ, मधु नरवा यांनी त्यांची छायाचित्रं दिल्याबद्दल त्यांचे आभार.
अनुवादः मेधा काळे