तर हाच तो मायला पकीर, लहान मुलांच्या तेलुगु पुराणकथांमधला एक दुष्ट जादूगार. आंध्रातल्या अनंतपूरच्या रस्त्यांवरनं सध्या तो भटकतोय. आणि हा अवतार धारण केलाय तो किशोर कुमार यांनी. स्वर्गवासी झालेले महान गायक किशोर कुमार नाहीत, आंध्र प्रदेश पोलिसांच्या ताफ्यातले सशस्त्र राखीव हवालदार किशोर कुमार. आणि त्यांचं हे छायाचित्र टिपलं, २ एप्रिल रोजी शहराच्या मध्यवर्ती भागातल्या क्लॉक टॉवरपाशी.
या तेलुगु भाषिक राज्यांमधले पोलिस – जे एरवी लोकांना काहीही सांगायचं असेल तर सर्रास दंडुक्याचा वापर करतात – आता कलेच्या प्रातांत मुशाफिरी करू लागलेत बहुतेक (दुसऱ्या एका जिल्ह्यातल्या एका व्हिडिओमध्ये पोलिस रामुलो रामाला या लोकप्रिय तेलुगु गाण्यावर नाच करत हात धुण्याचा संदेश देताना दिसतात). ‘अनंतपूर पोलिस’ या नावाने असलेल्या फेसबुक पेजवर मलाया पकीर (म्हणजेच किशोर कुमार) यांचे कोरोनाचा मुकुट घातलेले भयंकर फोटो टाकले आहेत (करोना शब्दाचा एक अर्थच मुळी ‘मुकुट’ असा आहे.)
या अभियानाची गाडी आणि आणि हा “अभिनव बहुरुप्या” टाळेबंदीतून जेव्हा थोडी सूट दिली जाते (उदा. जेव्हा लोक वाणसामान आणण्यासाठी घराबाहेर पडतात) तेव्हा लोकांपर्यंत सामाजिक अंतर पाळण्याचा आणि स्वच्छतेचे इतर संदेश घेऊन जातील असं अनंतपूर पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच हा संदेश “गर्दी असलेल्या मंडया, सरकारी रुग्णालयं, किराणामालाची दुकानं आणि मोठ्या चौकांमध्येही” नेला जाणार असल्याचं ते सांगतात. लोकांना घाबरवण्यासाठी इतर कशाचीही गरज न लागणाऱ्या पोलिस दलाने नवी वाट चोखाळली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
अनुवादः मेधा काळे