तालात, लयीत त्या झुलत होत्या – “रे रेला रे रेला रे रेला रे” – एकमेकींच्या कंबरेत हात अडकवलेले, एका वेळी तीन पावलं टाकतं गुडघ्यापर्यंत नेसलेल्या पांढऱ्या साड्या आणि डोक्यावर रंगीबेरंगी कंड्यांचा भार ल्यायलेल्या त्या युवती गोंड समुदायात लोकप्रिय असलेली रेला गाणी गात होत्या.
तितक्यात युवकांचा एक गट आला, तेही सफेद कपड्यात, सफेद मुंडासं आणि त्याच्यावर रंगीत पिसं अडकवलेली. क्लिष्ट अशा पदन्यासात त्यांच्या पायातल्या घुंगरांचा नाद मिसळून गेला. हातातला मांदरी नावाचा एक लहानसा ढोल वाजवत तेही रेला गीतं गात होते. एकमेकींच्या हातात हात गुंफून त्या युवतींनी या युवकांच्या गटाभोवती एक गोल तयार केला. सगळे नाचत गात राहिले.
गोंड आदिवासी असलेल्या या ४३ युवक-युवतींचा गट, सगळ्यांची वय १६-३० मधली, छत्तीसगडच्या कोंडागाव जिल्ह्याच्या केशकाल तालुक्यातल्या बेडमामारी गावाहून इथे आले होता.
रायपूर-जगदलपूर महामार्गालगत असणाऱ्या (बस्तर भागातल्या) या ठिकाणी पोचण्यासाठी त्यांनी ३०० किलोमीटर प्रवास केला होता. रायपूर या राज्याच्या राजधानीपासून १०० किलोमीटर अंतरावर हे ठिकाण होतं. मध्य भारतातल्या इतर आदिवासी समुदायांमधले खास करून छत्तीसगडमधले नाचणारे हे युवा इथे तीन दिवसांच्या वीर-मेळ्यासाठी आले होते. २०१५ सालापासून १० ते १२ डिसेंबर या काळात वीर नारायण सिंग या छत्तीसगडच्या बलौंदाबाजार-भाटापारा जिल्ह्यातल्या सोनाखान इथल्या आदिवासी राजाची स्मृती जागवण्यासाठी हा मेळा आयोजित केला जातो. डिसेंबर १८५७ मध्ये इंग्रजांच्या विरोधात उठाव करणाऱ्या या राजाला पकडून रायपूर जिल्ह्याच्या जयस्तंभ चौकात इंग्रज सत्ताधाऱ्यांनी फाशी चढवलं होतं. स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार त्याला फाशी दिल्यानंतर इंग्रजांनी त्याचं शव उडवून दिलं होतं.
जिथे हा मेळा भरवला जातो ती जागा – राजाराव पठार – गोंड आदिवासींच्या एक पूर्वज देवाचं ठाणं किंवा देवस्थान मानली जाते. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गाणी आणि नाचाची रेलचैल असते.
“रेलामुळे [किवा रेलो किंवा रिलो] सगळा समजा एक होतो,” सर्व आदिवासी जिल्हा प्रकोष्ठचे अध्यक्ष प्रेमलाल कुंजम म्हणतात. “माळेतली फुलं जणू तसे सगळे एकमेकाच्या हातात हात गुंफून नाचतात. एक ऊर्जा, शक्ती जाणवत राहते.” रेला गाण्यांची लय आणि शब्द गोंडवाना संस्कृती दाखवतात (गोंड समुदायाच्या परंपरा आणि इतिहास). “या गाण्यांमधून आम्ही आमच्या गोंडी संस्कृतीबद्दलचा संदेश आमच्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवतो.”
“रेला म्हणजे गाण्याच्या रुपातला देव आहे,” बलोद जिल्ह्याच्या बलोदगहन गावाचा दौलत मंडावी म्हणतो. “आमच्या आदिवासी संस्कृतीप्रमाणे, आम्ही देवतांचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही गाणी गातो. जर तुम्हाला काही दुखलं खुपलं असेल आणि तुम्ही रेलावर नाचलात तर ती वेदना नाहिशी होईल. ही गाणी लग्नांमध्ये आणि आदिवासींच्या अन्य सण-समारंभात गायली जातात.”
डिसेंबर महिन्यात भरलेल्या या मेळ्यासाठी आलेली सर्वात लहान सहभागी होती सुखियारिन कावडे, इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी. “मला रेला फार आवडतो. ते आमच्या संस्कृतीचं अंग आहे.” ती या गटामध्ये होती म्हणून एकदम खुशीत होती कारण तिला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नृत्य सादर करता येणार होतं.
बेडमामारी गावाहून आलेल्या गटाने रेला गाण्याने सुरुवात केली आणि त्यानंतर हुल्की मांदरी आणि कोलांग नाच सादर केले.
“मांदरी पूर्वापारपणे हरेलीमध्ये सादर केली जाते [बिया उगवून नवती आलेली असते आणि खरिपात सगळी शिवारं हिरवी गार झालेली असतात तेव्हा हा सण साजरा केला जातो. तो दिवाळीपर्यंत सुरू असतो],” महाविद्यालयीन विद्यार्थी असणारा दिलीप कुरेटी सांगतो. या काळात मोठाले मांदर (ढोल) घेऊन पुरुष आणि बाया हातात झांजा घेऊन एकत्र नाचतात.
पूस (पौष) कोलांग हिवाळ्यात साजरा केला जातो. डिसेंबरचा शेवट ते जानेवारीच्या मध्यापर्यंत. गोंड आदिवासी तरूण रेला गाण्यांवर कोलांग नाच करत करत शेजारच्या गावांमध्ये जातात. ही गाणी एकदम ठेक्यात असतात आणि त्यांचा नाचही. हातात धायटीच्या काठ्या घेऊन हा नाच केला जातो.
“पूस कोलांग असतो तेव्हा आम्ही आमचा शिधा सोबत घेऊन दुसऱ्या गावाला जातो. दुपारचं जेवण आमचं आम्ही बनवतो. रात्री तिथल्या गावातले लोक आमच्यासाठी जेवण बनवतात,” बेडमामारीच्या जत्थ्यातले ज्येष्ठ सोमारु कोर्राम सांगतात.
नाचणाऱ्यांचा जत्था आपापल्या गावी परतला की सगळी गाणी नाच संपतात. पौष पौर्णिमेला आकाशात लख्ख चांदणं असतं त्याच्या आधीच ही मंडळी परततात.