"आज त्यांचा हा फोटो भिंतीवर टांगलेला नसता," शीला तारे म्हणतात. "वेळेत तपासणी झाली असती तर ते आज इथे आमच्यासोबत असते."
निळ्या पार्श्वभूमीवर काढलेल्या अशोक तारेंच्या फोटोखाली लिहिलंय: 'मृत्यू दि. ३०/०५/२०२०'.
अशोक पश्चिम मुंबईतील वांद्रे येथील के बी भाभा हॉस्पिटलमध्ये मरण पावले. मृत्यूचं कारण दिलं होतं कोविड-१९ ची ‘संभाव्य’ लागण. ४६ वर्षांचे तारे बृहन्मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार होते.
४० वर्षीय शीला आपले अश्रू आवरतात. पूर्व मुंबईतील चेंबूर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण इमारतीतल्या भाड्याच्या २६९ चौरस फूट फ्लॅटमध्ये शांतता पसरते. त्यांची मुलं निकेश व स्वप्निल, आणि मुलगी मनीषा, आपली आई बोलण्याची वाट पाहतायत.
"भांडुपमध्ये त्यांच्या चौकीचा मुकादम पॉझिटिव्ह झाला होता तेंव्हा ८ ते १० एप्रिलच्या आसपास त्यांनी चौकी बंद केली," शीला सांगतात, "आणि सगळ्या कामगारांना [शहराच्या एस वॉर्ड मधील त्याच भागातील] नाहूर चौकीवर जायला सांगितलं. आठवडाभरानंतर त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला."
अशोक काही लोकांसोबत कचऱ्याच्या ट्रकवर काम करायचे, आणि भांडुपमध्ये विविध ठिकाणाहून कचरा उचलायचे. ते कुठलंच संरक्षक साहित्य घालत नसत. आणि त्यांना मधुमेह होता. त्यांनी मुख्य निरीक्षकांना आपल्या लक्षणांबद्दल कळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची रजेची आणि वैद्यकीय तपासणीची विनंती अनेकदा नाकारण्यात आली. शीला तारेंसोबत नाहूर चौकीत गेल्या होत्या तो दिवस शीला यांना आजही आठवतो.
"मी सायबांकडे त्यांना पाच दिवस सुटी द्या अशी विनंती करायला गेली होती," त्या म्हणतात. अशोक यांनी त्यांच्या २१ दिवसांच्या पगारी रजांपैकी एकही सुटी घेतली नव्हती. "खुर्चीवर बसलेले साहेब म्हणाले जर सगळेच सुट्ट्या घ्यायला लागले तर मग अशा वेळी काम कोण करणार?"
मग अशोक एप्रिल व मे महिन्यांत काम करतच राहिले. त्यांचे साथीदार सचिन बनकर (विनंतीमुळे नाव बदलण्यात आलंय) म्हणतात की त्यांना अशोक यांची होणारी दमछाक दिसत होती.











