"मी मालकाला २५,००० रुपये देणं लागतो. हे कर्ज फेडल्याशिवाय मला अधिया किसानी सोडता येणार नाही," रवेंद्र सिंह बरगाही सांगतात. "अगर छोड दिया तो ये वादा खिलाफी माना जाएगा [जर सोडून दिली, तर हा वचनभंग होईल].”
रवेंद्र मध्य प्रदेशातील मुगवारी गावात राहतात, जिथे ते गेली २० वर्षं खंडाने शेती करत आहेत. अधिया किसानी हा मध्य प्रदेशाच्या विंध्य भागातील सीधी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रचलित असलेली एक पारंपरिक बोली करार आहे. यात मालक आणि खंडकरी शेतीचा खर्चही समान प्रमाणात करतात आणि आलेला मालही समान वाटून घेतात
आठ एकर जमिनीवर रवेंद्र आणि त्यांच्या पत्नी ममता सहसा धान, गहू, मोहरी, मूग आणि तुरीची लागवड करतात. पण अधिया – म्हणजे मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या हिंदीच्या बाघेली नामक बोलीत 'अर्धी' – पद्धतीत त्यांच्या कुटुंबाला समान वाटा मिळत नाही.
भारतभर वेगवेगळ्या स्वरूपात करण्यात येणाऱ्या या अनौपचारिक करारात शेती-विषयक सगळे निर्णय जमिनीचा मालकच घेतो, कुठलं पीक घ्यायचं हेसुध्दा तोच ठरवतो. पण कडाक्याची थंडी, अवेळी पाऊस, गारपीट यांमुळे पिकांचं नुकसान झाल्यावर मालकाला शासनाकडून किंवा विमा कंपन्यांकडून जी भरपाई मिळते, ती काही खंडकऱ्यांच्या वाट्याला येत नाही.





