या आधी अख्खं एक वर्ष घरी काढल्याचं रमेश शर्मांना तरी आठवत नाही. “गेली १५-२० वर्षं नेमाने हे काम चालू आहे,” हरयाणाच्या कर्नाल जिल्ह्यातल्या गगसिना गावातल्या एका शेतात ऊस तोडता तोडता ते सांगतात.
दर वर्षी ऑक्टोबर ते मार्च असे वर्षातले सहा महिने ४४ वर्षीय रमेश बिहारच्या अरारिया जिल्ह्यातल्या आपल्या शोइरगावहून हरयाणा आणि पंजाबात शेतात मजुरी करण्यासाठी जातात. “हरयाणात मजुरी केली तर बिहारमध्ये शेती करण्यापेक्षा जास्त पैसे मिळतात,” ते सांगतात.
शोइरगावात रमेश यांची स्वतःच्या मालकीची तीन एकर शेतजमीन आहे. वर्षातले सहा महिने ते ती कसतात. खरिपात भाताचं पीक घेतात. “घरी खाण्यापुरताच भात काढतो,” ते सांगतात. बोलत असतानालाही तोडत असलेल्या उसावरनं त्यांची नजर ढळत नाही.
दर वर्षी शर्मांचं मुख्य नगदी पीक म्हणजे मका. रब्बीतली. पण त्यातनं फारसा काही पैसा हाती लागतच नाही. “मी गेल्या वर्षी [२०२०] ९०० रुपये क्विंटलनी माझी मका विकली,” ते सांगतात. एकूण ६० क्विंटल मका झाली. “कमिशन एजंटने गावातच आमच्याकडून माल खरेदी केला. किती तरी वर्षं हे असंच सुरू आहे.”
२०१९-२० साठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान हमीभावापेक्षा – रु. १,७६०/- प्रति क्विंटल - हा भाव निम्म्याहून कमी आहे. शासनाच्या अखत्यारीतल्या बाजार समित्यांमध्ये किमान हमीभावाला शेतमाल विकणे हा पर्यायच आता उरलेला नाही. त्यामुळे शर्मांसारख्या छोट्या शेतकऱ्यांना देखील कमिशन एजंटांसोबत भावासाठी घासाघीस करण्याची वेळ आली आहे.
२००६ साली बिहार सरकारने बिहार कृषी उत्पन्न बाजारपेठ कायदा, १९६० रद्दबातल ठरवला. आणि त्यासोबतच या राज्यात कृषी उत्पन्न बाजारसमित्यांची संपूर्ण यंत्रणा बंद करण्यात आली. सरकारचा असा दावा होता की यामुळे शेती क्षेत्र निर्बंधांमधून मुक्त होईल कारण शेतकऱ्यांसाठी खाजगी मालकीची व्यापार क्षेत्रं खुली होतील. मात्र बाजारसमित्या बंद केल्यामुळे बिहारच्या शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळालेला नाही. कारण आता त्यांना व्यापाऱ्यांच्या दलालांवर आणि त्यांनी ठरवलेल्या भावावर जास्त अवलंबून रहावं लागत आहे.








