"पोलिस पहारा द्यायला यायच्या अगोदर माझा मोठा मुलगा [ऑटोरिक्षा चालक] आणि माझी सून सकाळी काम करायला बाहेर पडतात. तो तिला ऑटोतून सोडतो, ती एका घरी स्वयंपाक करून देते अन् संध्याकाळी ते दोघं घरी परत येतात," एक म्हातारी सांगते. कामगार वर्गातील बरेच लोक लपून छपून काम करत असले, तरी खाऊनपिऊन सुखी असणाऱ्या लोकांना मात्र ही महामारी म्हणजे त्यांच्या आयुष्यातील हवीहवीशी सुटी वाटते आहे. "कोरोना विषाणूमुळे सुट्ट्या लागल्यात ना," मी १९ मार्च रोजी सुपर मार्केटच्या बाहेर एक माणूस म्हणत होता ते मी ऐकलं होतं.
आमच्या घराच्या बाल्कनीतून संगमेश नगर परिसराचं विहंगम दृश्य दिसून येतं. शहरातील कमी उत्पन्न असलेल्या, बहुतांशी कामगार वर्गाची ही वस्ती. आमच्या शेजारील कुटुंबं एक किंवा दोन खोल्यांच्या लहान घरांमध्ये राहतात. ते बराचसा वेळ आपल्या घराबाहेर असतात. आम्ही आमच्या काही शेजाऱ्यांना सामाजिक अंतर ठेवण्याचं महत्त्व पटवून सांगितलं, मात्र अनंतपूरच्या कायमस्वरुपी उन्हाळ्यात एका घरात पंख्याखाली कोंबून राहणं काही सोपी गोष्ट नव्हे. आमच्या शेजाऱ्यांमध्ये ऑटोरिक्षा चालक, भाजीवाले, वराहपालक, शिक्षक आणि घरकामगार आहेत. इतर बरेच लोक टोपल्या किंवा सुपं विणतात. या शेवटच्या गटातील लोकांसाठी प्रत्येकच दिवस घरातून काम करण्याचा असतो. त्यामुळे लॉकडाऊन असला तरी त्यांचं काम चालूच आहे.
बहुतेक दिवशी येथील मुलं सकाळी लवकर उठतात आणि त्यांच्या पालकांना पाणी आणू लागतात. अनंतपूरमध्ये हे अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचं संसाधन आहे. ऑटोरिक्षांच्या मदतीने काही स्थानिक कंपन्या 'शुद्ध पिण्याचं पाणी' विकतायत. त्यांपैकी एक कंपनी २०१४ सालच्या एका तेलुगु चित्रपटातील जोशपूर्ण गाण्यातून आपल्या उत्पादनाची जाहिरात करत आहे. ३० मार्च रोजीदेखील ही विक्री सुरु होती आणि काही महिलांनी आपली प्लास्टिकचे हंडे पाण्याने भरून घेतले. इतर ठिकाणचं पाणी 'जिवाणू आणि विषाणूंनी प्रदूषित' असल्याने अशा काळात लोकांनी 'शुद्ध' पाणीच वापरावं असं आवाहन कंपनीच्या रेकॉर्ड केलेल्या जाहिरातीत करण्यात येत होतं.
लॉकडाऊनमुळे दिनक्रम हळूहळू बदलत असले तरी लोकांना शासनाचे आदेश जे शहरी व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पनांवर केंद्रित आहेत ते पाळणं कठीण जात आहे. मुलांचं खेळणं चालूच आहे (लपंडाव, चोर शिपाई, ज्यात कुठलंही खेळणं लागत नाही). या मुलांकरिता लॉकडाऊन म्हणजे जास्तीच्या सुट्ट्याच आहेत. अगदी आता आता फेरीवाले यायचे बंद झालेत. आमच्या गल्लीत मोठ्याने मंत्रोच्चार करत भाजलेले शेंगदाणे विकणारा फेरीवाला २१ मार्च रोजी यायचा थांबला. २८ मार्च पासून आईस्क्रीमवाला दिसला नाही. भाजीवाला अजून तरी दिसतोय.
आमच्या शेजाऱ्यांसाठी, ज्यांची घरं इतकी लहान आहेत की सगळ्यांना दिवसभर एकाच वेळी घरात राहणं शक्यच नाही, आवश्यक वस्तू साठवून ठेवणं किंवा 'सामाजिक अंतर' पाळणं जवळपास अशक्य. वडीलधारी मंडळी आपल्या जमिनीवर चौकटी आखून फासे टाकून त्यांचा आवडता बैठा खेळ, मेका-पुली (वाघ-बकरी) खेळतात.