“हा फोटोच माझं रक्षण करतो, माझी ताकद आहे तो,” अनंतपूर मंडलातल्या कुरुगुंटा गावच्या ३५ वर्षीय शेतकरी सी. अलिवेलम्मा म्हणतात. अलिवेलम्मांनी त्यांच्या पतीचा फोटो एटीएम कार्डासोबत छोट्या कव्हरमध्ये जपून ठेवला आहे. “आम्ही इथे न्याय मागण्यासाठी आलोय, जेणेकरून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.”
खंडाने शेती करणारे अलिवेलम्मांचे पती, सी. वेंकटरामुडु यांनी २०१३ साली भुईमुगात ठेवण्यासाठी वापरात असणाऱ्या रासायनिक गोळ्या खाऊन आत्महत्या केली. “त्यांनी मला सांगितलं होतं की कर्जाचा मोठा बोजा आहे आणि शेतीतून काहीच नफा निघत नाहीये. ते मला म्हणायचे, ‘सावकार पैशाबद्दल विचारतात. माझ्या छातीत धस्स होतं. काय करावं तेच कळत नाही. भुईमुगाच्या पेरणीसाठी तरी पैसा जमा होईल का नाही तेच कळंना गेलंय’.” भुईमूग लावू नका असं अलिवेलम्मा सतत त्यांना सांगायच्या पण त्यांचं एकच उत्तर असायचं, “जिथे हरपलंय, तिथेच शोधावं.”



