“आम्ही एक वेळ उपाशी राहू, पण आम्ही आमच्या पक्षाचे झेंडे घेऊन बाहेर पडणारच. जायलाच पाहिजे. आमच्यापाशी पर्यायच नाहीये,” तालुपुरूमध्ये एम. नारायणस्वामी सांगतात. अनंतपूर जिल्ह्याच्या रापताडू विधानसभा मतदार संघात येणाऱ्या त्यांच्या गावी ते रेशन दुकान चालवतात. आज - ११ एप्रिलपर्यंत ज्या प्रकारे निवडणुकांचा प्रचार चालू आहे त्याबद्दल ते बोलतायत. लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीसाठी आज राज्यात मतदान होणार आहे. लोक काय विचार करतायत, ते कसं काय मतदान करणार आहेत आणि कुणाला मत देणार आहेत आणि का हे सगळं ते बोलतात.
इथे बरचसं लक्ष आणि चर्चा आहे ती दोन विधानसभा जागांची – रापताडू आणि पुलिवेंदुला हे अनुक्रमे हिंदूपूर आणि कडपा लोकसभा मतदार संघात येतात.
रापताडूमध्ये लढा आहे सत्ताधारी तेलुगु देसम पक्षाचे पारिताला श्रीराम आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे थोपूदुर्थी प्रकाश रेड्डी यांच्यामध्ये. २००९ आणि २०१४ साली रेड्डी श्रीराम यांच्या आई पारिताला सुनीता यांच्याकडून पराभूत झाले होते. पुलिवेंदुलामध्ये वाएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी तेलुगु देसमच्या कुमार रेड्डींच्या विरोधात उभे आहेत. जगनमोहन यांच्याकडे अनेक जण भावी मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत आणि त्यांचंच पारडं भारी आहे.
हिंदूपूर लोकसभा मतदारसंघात तेलुगु देसमच्या निर्मला किस्तप्पा आणि वायएसआर काँग्रेसचे गोरंटला माधव यांच्यात लढत आहेत. कडपा लोकसभा जागेसाठी वायएसार काँग्रेसचे विद्यमान खासदार वाय एस अविनाश रेड्डींची लढत त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी तेलुगु देसमचे आदिनारायण रेड्डी यांच्याशी होणार आहे.
पण, अनंतपूरच्या गावांमध्ये मात्र लोकांसाठी पक्ष आणि गटातटाशी असलेली निष्ठा उमेदवारांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. रापताडूमध्ये आम्ही ज्या गावकऱ्यांशी बोललो त्यांचं जास्त लक्ष हिंदूपूर लोकसभा लढतीपेक्षा विधानसभेच्या निवडणुकांवर होतं (अर्थात ते दोन्हींसाठी मतदान करणार आहेत). या मतदारसंघांमध्ये सगळीकडेच मतदरांना राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्येच जास्त रस असल्याचं चित्र होतं.










