अनिता घोटाळेंसाठी, शनिवारी, मार्च २१ हा कामावरचा नेहमीचा दिवस – इतरत्र शहरात मात्र दुकानांना टाळे आहेत, बाजार बंद आहेत, रस्ते शांत आहेत. कोविड-१९ च्या संसर्गामुळे सरकारनं बंदी लागू केली आहे, या दिवशी बरेचजण घरीच राहिले आहेत.
पण अनिता ते शांत रस्ते स्वच्छ करतेय, साचून राहिलेल्या काळ्या आणि घाणरेड्या पाण्यातून ती कचरा झाडून बाहेर काढतेय. त्यातलं काही मैला पाणी तिच्या पायांवरही उडलं आहे. “आमाचा तर रोजचाच दिवस धोक्याचा असतो. फक्त कोरोनामुळंच नाय काय, पन [नेहमी हीच परिस्थिती असते] पिढ्यांपासून,” ती सांगते.
सकाळचे ९ वाजले होते, आणि गेले दोन तास ती पूर्व मुंबईतल्या माहुलमधील एम-पश्चिम वॉर्डमधील रस्ते आणि गल्ल्या झाडते आहे.
पण या गंभीर परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेचं काय? “आमाला हे मास्क कालच [२० मार्चला] मिळाले, ते पन आमी वायरसमुळे मागितले म्हणून,” ती सांगते. तिने तो मास्क तिच्या साडीला खोचला आहे, ३५ वर्षांच्या अनिताने तिच्या गळ्यात सुरक्षेसाठी ओढणी बांधली आहे. “हे मास्क पातळ आहेत आनी परत नाय वापरू शकत [दोन दिवस घातल्यानंतर],” ती सांगते. तिच्या हातात हातमोजे नाहीत कि तिच्या पायात कुठली संरक्ष असे मजबूत बूट. तिच्या कामात या गोष्टी विरळाच.
अनिता महाराष्ट्रात अनुसूचित जातीत समाविष्ट असलेल्या मातंग समाजाची आहे. ती सांगते तिचं कुटुंब पिढ्यानपिढ्या या स्वच्छतेच्या कामातच आहे. “माझे आजोबा डोक्यावरून गटारातील मैला [मुंबई] उचलायचं काम करत होते,” ती सांगते. “कुटली बी पिढी असो, वर्ष असो, आमच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी नेहमीच लढावं लागलंय.”









