पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातल्या तारापीठ स्टेशनवर उतरून तुम्ही ग्रँड ट्रक रोडवर या. सगळीकडे नुसती धूळच धूळ. दगड भरून चाललेल्या मोठाल्या ट्रक्समुळे रस्त्यावर जागाच नाही, धूळ आणि धुराचे ढग मागे सोडत ट्रक चाललेत. धूळ सोडून तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाही आणि नाका-तोंडात आणि डोळ्यात धुळीचे कण जाऊ नयेत म्हणून तुम्हाला चेहरा कपड्याने झाकून घेतल्याशिवाय पर्याय नाही.
बिरभूमच्या मल्लारपूर दगडखाणींच्या पट्ट्यात असणाऱ्या गरिया या आदिवासी गावाकडे आम्ही निघालोय. तिथल्या आदिवासी मुलांना त्यांच्या मायबोलीत प्राथमिक शिक्षण देणारी उथनऊ नावाची एक सामाजिक संस्था तिथे काम करते. दगडखाणींमध्ये काम करणाऱ्या आणि खडी फोडणाऱ्या कामगारांशी मला बोलायचं होतं.
गरियामध्ये माझी गाठ घासीराम हेम्ब्रोम यांच्याशी पडली. ते भारत जकात माझी मंडुआ या संथाल गावाच्या आणि त्या भागातल्या मुखियांची संघटना आहे. तेच माझे सांगाती असणार होते. लिपिडी गावाकडे निघालो असता वाटेत आम्हाला एक म्हातारी भेटली, एकटीच चालत होती. काळ्या वर्णाची, कुरळे पांढुरके केस, अनवाणी, तोंडाचं बोळकं, पांढऱ्या साडीवर जुनी लाल रंगाची शाल पांघरलेली. ती एकटी राहते, झारखंडच्या सीमेवर. आपली वंशपरंपरागत आलेली जमीन खाणमालकाला काही रुपयांसाठी विकून तिची मुलं आणि नवरा तिला सोडून निघून गेलेत. आता तिचं घरही जाणार आहे. दगडांची ही खुली खाण आता जास्त मोठी होत चाललीये. आणि तिची झोपडी गिळंकृत करेल तो दिवस दूर नाही. चरितार्थासाठी ती दगड फोडायचं काम करते, ट्रकमधून दगड खाली उतरवायचे आणि नंतर ते फोडायचे.
घासीराम दगडखाण उद्योगाविरोधात लोकांना संघटित करण्यासाठी सहाय्य करत आहेत. ते त्या महिलेला आपल्या मुलांना दगडखाण मालकांच्या विरोधात उभं राहायला सांग असं म्हणतात. पण एकटी, परित्यक्ता महिला इतरांना काय सांगू शकणार, ती आपली वाट चालत राहते.
२०१० साली बिरभूमच्या नलहट्टी आणि महम्मदबझार तालुक्यांना आदिवासींच्या उठावांनी हादरवून सोडलं. त्यांची मागणी होती की या दगडखाणी आणि खडी केंद्रं बंद व्हायला पाहिजेत. बिरभूम आदिवासी गावता, या संघटनेने ही चळवळ सुरू केली होती. घासीराम आधी या संघटनेत होते. त्यांची मागणी होती की सगळ्या खाणी आणि खडी मशीन बंद करा आणि जोपर्यंत खाणमालक देशातले जमिनीबाबतचे, पर्यावरण, प्रदूषण, खाणीतील सुरक्षा आणि कामगारांसंबंधीचे सगळे कायदे पाळतायत हे सिद्ध करत नाहीत तोवर ती बंद ठेवा. आणि बहुतेक उद्योग अवैध असल्यामुळे कित्येक महिने खाणी आणि खडी मशीन बंद होती.
लवकरच घासीराम आणि इतर काही जणांच्या लक्षात आलं की त्यांच्या चळवळीतलेच काही पुढारी, त्यांचे मित्र खाणमालक आणि खडी केंद्रधारकांकडून लाच घेत होते. एकेक करत ते कामं सुरू करायला परवानगी देत होते. हा विश्वासघात लक्षात आल्यानंतर या संताळ गावांना परत एकदा भारत जकात माझी मंडुआ या संघटनेखाली संघटित होण्यासाठी एक वर्षं लागलं. त्यांनी त्यांच्या भ्रष्ट नेत्यांवर बहिष्कार टाकला, त्यांना व्यभिचारी किंवा बहिष्कृत घोषित करण्यात आलं. तरीही चळवळीला फटका बसला होताचः चळवळीत फाटाफूट झाली होती आणि सगळा समाजाची एकी भंग पावली होती. आता ही भ्रष्ट नेते मंडळी ज्यांचे खाणमालकांशी लागेबांधे आहेत, ते प्रामाणिक लोकांना खाणींमध्ये काम करू देत नाहीयेत.
याच कारणामुळे काम करू शकत नसणारे एक आहेत छोटू मुंडा. त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. ते दृश्य बघून मी अवाक् झाले. एक छोटीशी झोपडी खाणीच्या अगदी काठावर लटकत असल्यासारखी भासत होती. शेजारची खाण किमान ५०० फूट खोल असावी. “पावसाळ्यात हे फार धोकादायक असतं,” छोटू सांगतात. “रस्ता निसरडा होतो, दरडी कोसळत असतात. मी इथे माझ्या कुटुंबासोबत कसा राहतो हे भगवंतालाच ठाऊक. आमच्या घराच्या छपरावरून पावसाचं पाणी थेट खाणीत पडतं.” मला तर त्यांच्या त्या खोलीत जायलाच भीती वाटत होती. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या निसरड्या उतारावरून जायचीदेखील. घसरून थेट खाणीत पडेन की काय अशी गत होती.
छोटूंनी त्यांची जमीन खाणमालकाला तीन लाखाला विकली. “आम्हा गावकऱ्यांना जमिनी द्यायच्या नव्हत्या,” ते सांगतात. “पण खाणमालक संघटनेचे अध्यक्ष माझीर हुसैन मलिक यांनी आम्हाला सांगितलं की जर आम्ही त्यांना जमिनी दिल्या तर ते आमच्या गावात वीज आणतील. त्यामुळे आम्ही भरीस पडलो.” कायद्याप्रमाणे आदिवासींची जमीन बिगर-आदिवासींकडे हस्तांतरित करता येत नाही, पण छोटूंना कायदा कुठे माहित होता. “ते काही कागद माझ्याकडे घेऊन आले आणि मला सह्या करायला सांगितलं,” ते सांगतात. “मी अंगठा लावला आणि त्यांनी मला पैसे दिले.”
पण इतक्यावर हे थांबलं नाही. खाणीतले दगड उडून त्यांच्या शेतात पडू लागले आणि तिथे शेती करणं मुश्किल होऊ लागलं. पाण्याची पातळी देखील खालावली त्यामुळे पिकांना पाणी देता येईना. आता तर खाण मोठा आ वासून उभी आहे. छोटूंच्या घराचा घास कधी तिच्या पोटात जाईल, सांगता येत नाही.
धोलकाटातली परिस्थिती अजूनच वाईट आहे. घासीराम यांच्या सोबत मी गावात शिरले ती तिथे राहिलेली एकुलती एक झोपडी माझ्या नजरेस पडली. मी भाबडेपणाने विचारलं, “तुम्ही म्हणताय की हे गाव आहे, आणि इथे गावकरीच नाहीत?” घासीराम हसतात आणि म्हणतात, “हो, हे कधी काळी गाव होतं. पण आता ही एक खाण आहे. गावाचं नामोनिशाण राहिलेलं नाही. एक विधवा तेवढी मागे राहिलीये. तिचा मुलगा मरण पावला. बाकीचे लोक झारखंडला खाणींमध्ये किंवा खडी केंद्रांवर कामाला गेलेत.”
संध्याकाळी गरियामध्ये बुद्धा नावाचा एक मुलगा आम्हाला त्याच्या दगड फोडायचं काम करणाऱ्या आईची भेट घालून देण्यासाठी घरी घेऊन जातो. मोनखुशी लोहार दिवसभराच्या मेहनतीनंतर अंग धुऊन, नवी साडी नेसून येते, फाटलेलं पण साडीला जुळतं पोलकं घातलेलं असतं. उंच, सावळी आणि सुंदर. मातीच्या स्वच्छ कपात ती आम्हाला चहा देते.
“मी पहाटे ५ वाजता खडी केंद्रावर गेलीये,” ती सांगते. “आम्हाला दगडं लादायचं आणि उतरवून घ्यायचं काम असतं. मोठे पत्थर फोडायचे असतात. त्याची नंतर खडी करतात. दिवसाचे २०० रुपये मिळतात. नेमून दिलेलं काम पूर्ण करावं लागतं. नाही तर मग पैसे कापतात आणि जादा काम केलं तर मग भत्ता मिळतो.” खूपदा अपघात होतात. ना रुग्णवाहिका, ना डॉक्टर. “डॉक्टर ठेवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली तर मग ते आमच्याच मजुरीतून पैसे कापून घेणार. पैसा मोलाचा आहे. आम्ही आमच्या लहान सहान दुखापतींसाठी पैशावर पाणी सोडू शकत नाही. जखमांचं काय आमचं आम्ही पाहून घेऊ शकतो. पण पैसा नसेल तर घर कसं चालवणार?”
त्यांना मास्क किंवा हातमोजे देतात का, मी विचारलं. मोनखुसी हसते. “कसंय, त्यांनी आम्हाला मास्क दिले होते. पण भर उन्हात तो मास्क घालून आम्हाला कामच करता येत नाही. त्यांनी जीव गुदमरतो, तो मास्क घातला की श्वासच घेता येत नाही. आणि मळमळ व्हायला लागते.” खडी केंद्रावरचा एक माणूस मला म्हणाला, “मॅडम, या कामगारांना काही कळत नाही. आम्ही प्रत्येकाला मास्क दिलाय. पण ते तो घालतच नाहीत!” उथनऊच्या म्हणण्यानुसार, पंचमी, महम्मदबझार आणि तालबंध इथले अनेक जण दगडाच्या बारीक मातीशी संपर्क आल्यामुळे सिलिकॉसिसचा संसर्ग होऊन मरण पावलेत. सरकारचा दावा आहे की क्षयाने त्यांचा मृत्यू झालाय. गरोदर बायांसाठी देखील कसल्याच सुविधा नाहीत. पाळणाघरं नाहीत, रुग्णवाहिका नाही, तपासण्या नाहीत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रावरतीच एक बाई बाळंत झाली.
मोनखुसीची दोघं मुलं आहेत आणि ती तिच्या अत्याचारी नवऱ्याला सोडून आपल्या गरियातल्या आपल्या मूळ घरी परत आलीये. आता तिथे राहण्याची भरपाई म्हणून ती तिची दोन मुलं आणि माहेरच्या कुटुंबाचं पोट भरतीये, स्वतःचं रक्त आटवून, घाम गाळून. ती क्षणभर थांबते आणि खोलीच्या मागच्या भागात ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीपाशी जाते. कदाचित तिच्या आयुष्यातला तेवढा एकच खाजगी म्हणावा असा तो कोपरा असावा. येताना तिच्या हातात एक छोटीशी चांदीची डबी असते. “माझं लग्न झालं ना तेव्हा माझ्या वडलांनी मला दिली होती,” ती सांगते. “ही काजलदानी, काजळाची डबी आहे. आमच्या समाजात लग्नानंतर प्रत्येक मुलीला ही भेट मिळते.” मायेने त्या डबीवरून ती हात फिरवते. “माझे वडील तुमच्या लग्नासाठी असली एक बनवू शकतील,” ती हसते. आणि खोलीत एकच हशा पिकतो.
मोनखुसीची तब्येत ढासळत चाललीये आणि दगड फोडायचं काम अजून किती दिवस जमू शकेल हे काही तिला माहित नाही. पण तिच्याकडे फारसे काही पर्यायही नाहीत कारण आता या भागात फारशी शेतीच उरलेली नाहीये. “तुम्ही जमीन पाहिली ना,” ती म्हणते. “वर्षानुवर्षं बलात्कार केल्यासारखी दिसतीये, हिंसेच्या खुणा वाहणाऱ्या बाईच्या देहासारखी.”
अनुवादः मेधा काळे