किनारी आंध्र प्रदेशातील कोटापालेम गावातील बांटू दुर्गा राव यांची नारळी बाग गायब होण्याच्या मार्गावर आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एन.पी.सी.आय.एल.) च्या प्रकल्पासाठी श्रीकाकुलम् जिल्ह्यातील तीन गावांतील - कोटापालेम, कोव्वडा, मरूवडा (आणि त्यातील दोन वस्त्या - गुडेम आणि टेक्कळी) अशा एकूण २,०७३ एकर जमिनीचं जिल्हा प्रशासनाद्वारे संपादन सुरु आहे. दुर्गा राव यांची एक एकर जमीन यातलीच एक.
खरं तर, मे २०१७ मध्ये दुर्गा राव यांना आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँकेने ६०,००० रुपयांचं कर्ज दिलं होतं. "एकीकडे बँका आम्हाला शेतीसाठी कर्ज देत आहेत अन् दुसरीकडे महसूल अधिकाऱ्यांच्या मते गट नंबर ३३ [जिथे त्यांची जमीन आहे] मध्ये पाण्याचा झरा वाहतोय. दोन्हीही सरकारी संस्थाच. असं कसं होऊ शकतं?" ते गोंधळून विचारतात.
ह्या प्रकल्पामुळे जवळपास २,२०० शेतकरी आणि मच्छिमार कुटुंबं विस्थापित होण्याची शक्यता आहे, असं जानेवारी २०१७ मध्ये पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थान, हैदराबाद यांनी केलेल्या सामाजिक प्रभाव अभ्यास अहवालात म्हटलं आहे. यातील बहुतांश कुटुंबं दलित आणि इतर मागासवर्गीय आहेत. या प्रकल्पाला एकूण ४ लाख कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज हा अहवाल वर्तवतो.
रणस्थलम् पट्ट्यातील तीन गावं आणि दोन वस्त्यांमधील भू संपादनाच्या प्रक्रियेला २०११ मध्येच सुरुवात झाली होती, आणि २०१४ मधील निवडणुकांनंतर तिला वेग आला. मात्र, मार्च २०१८ मध्ये राज्यातील सत्ताधारी तेलगू देसम् पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडला, आणि एन.पी.सी.आय.एल. एक केंद्रीय संस्था असल्याने, "प्रकल्प आणखी लांबणीवर पडणार", शंकर धनंजय राव, कोटापालेमचे सरपंच, म्हणतात.
यामुळे गावकऱ्यांच्या मनातील द्विधा आणि गोंधळात आणखी भर घातली आहे.








