मागच्या खेपेला फातिमा बीबीचं नवजात अर्भक दगावलं त्यानंतरच ती तिच्या पाचव्या बाळंतपणासाठी सामुदायिक प्रसूती केंद्रात दाखल झाली. तिची सगळी मुलं – तीन मुली आणि एक मुलगा – घरीच जन्माला आलीयेत. “प्राणवायू मिळाला नाही त्यामुळे लेकरू गेलं,” तिची आई जमिला सांगते. “म्हणून आम्ही या खेपेला हॉस्पिटलात आलोय.”
त्यांच्या गावाहून रामपूरहून इथे नॉर्थ २४ परगणा जिल्ह्यातल्या बायेरमारी गावी यायला अर्धा तास लागतो. त्या प्रवासासाठी त्यांनी ७०० रु. भाड्याने गाडी केली. “आमच्या गावच्या गरीब घरातल्या बाया नावेनं हॉस्पिटलात येतात,” फातिमा सांगते. “भरतीच्या वेळी ते फारच धोक्याचं असतं. गेल्या साली, खचाखच भरलेली एक नाव कथखालीजवळ भरतीच्या वेळी उलटली. नावेतली काही माणसं दगावली.”
सुंदरबनमधल्या गरोदर बायांना काय काय अडचणींना तोंड द्यावं लागतं तेच फातिमाच्या या सगळ्या धडपडीतून दिसून येतं. आणि हे आरोग्याच्या सगळ्याच समस्यांना लागू पडतं. या बेटावर राहणाऱ्यांसाठी कुठलीही आरोग्य सुविधा मिळवणं म्हणजे मोठं दिव्य आहे.
अख्ख्या सुंदरबनमध्ये उपकेंद्रांचं फार विरळ जाळं आहे. इथल्या लोकांसाठी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोचण्याचा पहिला टप्पा म्हणजे ही उप केंद्रं. प्रत्येक उपकेंद्राने ५००० लोकसंख्येला सेवा द्याव्यात अशी अपेक्षा असते. साउथ २४ परगणा जिल्ह्यामधल्या पश्चिम श्रीपतीनगर आणि पूर्व श्रीपतीनगर या गावांची लोकसंख्या सुमारे ९५०० इतकी आहे (जनगणना, २०११). तेव्हापासून लोकसंख्येत निश्चित वाढ झाली असणार. म्हणजे या दोन गावांत मिळून १०,००० च्या वर लोक राहतात हे नक्की. त्या सगळ्यांचं आरोग्य अपुऱ्या सेवा देणारी दोन उप केंद्रं आणि काही स्व घोषित ‘डॉक्टरां’च्या हातात आहे.
अशा परिस्थितीमुळेच पश्चिम श्रीपतीनगरसारख्या सुंदरबनच्या अतिशय दुर्गम पट्ट्यातल्या गावात राहणाऱ्या लोकांना फिरत्या दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. यातले काही दवाखाने बोटींवर आहेत ज्या सुंदरबनच्या वेगवेगळ्या भागात पाणी कापत पोचतात. आम्ही ज्या दिवशी तिथे गेलो होतो, तेव्हा काही आजारी, दुखणाइत एका रिकाम्या खोलीच्या बाहेर कोंडाळं करून थांबलेले होते. आज तिथे दवाखाना लागणार होता. दोन तासाच्या प्रवासानंतर शिबुआ नदी पार करून नुकतीच डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम इथे दाखल झाली आहे. आज मंगळवार, फिरत्या दवाखान्याचा आज या गावी मुक्काम असतो.








