“तू इतकी वर्षं माझे फोटो काढतोयस. त्याचं नक्की काय करणारेस?” गोविंदम्मा वेलु मला विचारते आणि रडू लागते. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तिचा मुलगा सेल्लय्या मरण पावला तेव्हापासून ती अगदी कोलमडून गेलीये. “आता माझी दृष्टी पार गेलीये. तूसुद्धा नीट दिसत नाहीयेस. माझ्याकडे आणि माझ्या म्हाताऱ्या आईकडे आता कोण बघेल रे?”
हाताला कसं कापलंय, लागलंय ते ती मला दाखवते. “घरी २०० रुपये न्यायचे तर मला इतकं काय काय सहन करावं लागतं. जाळं टाकून कोळंबी पकडायचं माझं काय वय आहे का? नाही जमत. आता फक्त हाताने धरता येईल तेवढी धरायची,” गोविंदम्मा सांगते. सत्तरी पार केलेल्या, लहानखुऱ्या, अगदी किरकोळ ठेवणीच्या गोविंदम्माला वाटतं की ती ७७ वर्षांची आहे. “लोकच मला तसं सांगतात,” ती म्हणते. “रेतीत हात घालायचा आणि कोळंबी धरायची तर हाताला खोल जखमा होतात. पाण्यात हात असले की रक्त यायला लागलं तरी समजत नाही.”
२०१९ साली मी बकिंगहॅम कनालमधून प्रवास करत चाललो होतो तेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं. एन्नोर या उत्तर चैन्नईच्या परिसरात कोसस्तलैयार नदीला समांतर असा हा कालवा वाहतो आणि शेजारच्या तिरुवल्लुर जिल्ह्यापर्यंत जातो. एखाद्या बदकासारखी ती चपळपणे कालव्याच्या पाण्यात डुबकी लगावत होती आणि पाण्याखाली राहत होती. त्यानेच खरं तर माझं लक्ष वेधलं गेलं. पाण्याच्या तळाशी असलेल्या खरबरीत रेतीत हात घालून ती इतरांपेक्षा जास्त चपळाईने कोळंबी पकडत होती. कंबरेइतक्या पाण्यात उभी असलेली, कंबरेला बांधलेल्या झापाच्या एका पिशवीत कोळंबी टाकत असलेल्या गोविंदम्माची त्वचा त्या कालव्याच्या पाण्याशी तद्रुप झाली होती. दोन्ही रंग वेगळे करणं केवळ अशक्य.
एकोणिसाव्या शतकात बांधलेला हा बकिंगहॅम कालवा, कोसस्तलैयार आणि अरणियार या दोन नद्या मिळून तयार झालेली जलसंस्था चेन्नईसाठी ‘जीवन’दायी ठरली आहे.
एन्नोरमधून कोसस्तलैयार नदी वाहत पुढे पळवेरकडु किंवा पुलिकत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोवराला जाऊन मिळते. नदीच्या दोन्ही तीरांवर कांदळवनं आहेत. नदीच्या २७ किलोमीटर किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचं या भूमीशी आणि पाण्याशी फार घट्ट नातं आहे. स्त्रिया आणि पुरुष दोघंही मासे धरताना दिसतात आणि त्यांची हीच मुख्य उपजीविका आहे. इथे मिळणारी विविध प्रकारच्या कोळंबीला चांगला भाव मिळतो.
२०१९ साली मी पहिल्यांदा गोविंदम्माला भेटलो तेव्हा ती मला म्हणाली होती, “मला दोन लेकरं आहेत. माझा मुलगा १० वर्षांचा होता आणि माझी लेक ८ वर्षांची होती, तेव्हा माझा नवरा वारला. चोवीस वर्षं उलटली. माझ्या लेकाचं लग्न झालंय आणि त्याला चार लेकी आहेत. माझ्या मुलीला दोन लेकरं आहेत. अजून काय पाहिजे? ये घरी ये, तिथे बसून बोलू.” तिने मला घरी यायचं आमंत्रण दिलं आणि अथिपट्टु पुदुनगर (अथिपट्टु न्यू टाउन) च्या दिशेने चालायला सुरुवात केली. सात किलोमीटरच्या या रस्त्याच्या कडेलाच ती कोळंबी विकते. कोविड-१९ ची टाळेबंदी लागली आणि मधली दोन वर्षं मी तिला भेटू शकलो नाही.
गोविंदम्मा इरुलार समाजाची आहे. तमिळ नाडूमध्ये अनुसूचित जमातींमध्ये या समाजाची गणना होते. ती आधी चेन्नईतल्या कामराजार पोर्ट (पूर्वीचं एन्नोर पोर्ट) जवळ रहायची. इथून कोसस्तलैयार नदी जवळ होती. पण २००४ साली आलेल्या त्सुनामीत तिची झोपडी उद्ध्वस्त झाली. एक वर्षानंतर ती तिथून १० किलोमीटरवर असलेल्या तिरुवल्लुर जिल्ह्यातल्या अथिपट्टु गावात रहायला आली. त्सुनामीने बाधित अनेक इरुलार कुटुंबांना इथल्या अरुणोदयम नगर, नेसा नगर आणि मरियम्मा नगर या तीन वसाहतींमध्ये जागा देण्यात आली.
त्सुनामीनंतर बांधलेल्या
अरुणोदयम नगरमध्ये बांधलेल्या चाळींमधल्या घरांना आता अवकळा आली आहे. गोविंदम्मा
आता इथेच राहते. एक दोन वर्षांपूर्वी तिच्या नातीचं लग्न झालं तेव्हा तिने
तिच्यासाठी आपलं घर रिकामं केलं आणि आता ती जवळच्या एका कडुनिंबाच्या झाडाखाली
राहते.
रोज पहाटे ५ वाजता गोविंदम्मा उठते आणि दोन किलोमीटरवर अथिपट्टु रेल्वे स्थानकावर जाते. तितून दोन स्थानकं पुढे असलेल्या अथिपट्टु पुदुनगरला ती रेल्वेने जाते. तिथून सात किलोमीटर चालत कामराजार पोर्टजवळ माता चर्चपाशी पोचते. कधी कधी ती शेअर रिक्षाने जाते. धक्क्यापाशी इरुलार लोकांच्या तात्पुरत्या झोपड्या दिसतात. हे सगळे पोटापाण्यासाठी कोळंबी पकडून विकण्याचं काम करतात. गोविंदम्मा त्यांच्यासोबत लगबगीने नदीच्या पाण्यात उतरते.
दृष्टी अधू होत गेल्यामुळे कामावर जायचा हा प्रवास आता दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे. “मला रेल्वेत किंवा रिक्षात बसायचं तर कुणाची तरी मदत लागते,” गोविंदम्मा सांगते. दररोज प्रवासावर तिला ५० रुपये तरी खर्च येतो. “इतका खर्च केला तर जगू कसं? कोळंबी विकून फक्त २०० रुपये तर मिळतात,” ती म्हणते. कधी कधी गोविंदम्माला ५०० रुपयांची कमाईसुद्धा होते. पण बहुतेक दिवस हातात फक्त १०० रुपये येतात. आणि कधी कधी तर शून्य.
ज्या दिवशी सकाळी भरती असते, तेव्हा गोविंदम्मा तिच्या ठरलेल्या ठिकाणी रात्री जाते, पाणी ओसरल्यावर. डोळ्याला कमी दिसत असलं तरी अंधारात कोळंबी पकडणं तिला सोपं जातं. पण पाणसापांची आणि खास करून इरुन केळती (मांगूर) माशाची तिला भीती वाटते. “मला नीट दिसत नाही...पायाला काय चाटून गेलं, साप होता, का मांगूर होता, काहीच कळत नाही,” ती सांगते.
“पाण्यात असताना तो मासा डसला नाही पाहिजे. जर का मांगूर माशाची शेपटी हाताला बसली तर पुढचे सात आठ दिवस आम्ही जागचे उठूच शकत नाही,” गोविंदम्मा सांगतात. मांगूरचे गल विषारी असल्याचं मानलं जातं आणि त्याच्या माराने जखमा झाल्या तर प्रचंड वेदना होतात. “औषध गोळ्या घेतल्या तरी दुखायचं थांबत नाही. तरण्या लोकांना सहन होतंय. मी कसं करू, सांग?”
एन्नोरमधल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून प्रचंड प्रमाणावर राख आणि सांडपाणी पाण्यात सोडलं जातं. त्यामुळे कालव्याच्या प्रवाहात मध्येमध्ये उंचवटे तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. “अंथ सगथी पारु [हा सगळा गाळ बघ जरा],” मी फोटो काढण्यासाठी पाण्यात उतरत असताना ती मला म्हणते. “काळ एडुदु वाचु पोग नमक्कु सत्तु पोयिड्डु [पाण्यात नुसती हालचाल केली तरी माझी सगळी शक्ती हरपते].”
बकिंगहॅम कालव्याच्या सभोवती असलेल्या एन्नोर-मानली औद्योगिक पट्ट्यामध्ये किमान ३४ मोठे आणि प्रदूषणकारी उद्योग आहेत. यात औष्णिक विद्युत, पेट्रोकेमिकल आणि खताच्या कारखान्यांचा समावेश होतो. इथे तीन मोठी बंदरं देखील आहेत. इथल्या पाण्यात कारखान्यांचं सांडपाणी सोडलं जातं त्यामुळे मत्स्यजीवांवर विपरित परिणाम होत आहेत. इथले स्थानिक मच्छीमार सांगतात की पूर्वी त्यांना पाच-सहा प्रकारची कोळंबी मिळायची. आता फक्त दोन-तीनच प्रकार पाण्यात आढळतात.
गेल्या काही वर्षांमध्ये कोळंबी कमी होत चाललीये आणि त्यामुळे गोविंदम्मा अस्वस्थ आहेत. “जोराचा पाऊस पडला की आम्हाला भरपूर कोळंबी मिळायची. कोळंबी पकडून सकाळी १० वाजता तर आम्ही ती विकायला जात होतो. पण आजकाल पूर्वीइतका मालच मिळत नाही,” ती म्हणते. “इतर हंगामात आम्ही अर्धा किंवा एक किलो कोळंबी मिळण्यासाठी दुपारपर्यंत [२ वाजेपर्यंत] काम करतो.” त्यामुळे विक्री दुपारनंतरच होते.
बहुतेक दिवशी तिला कोळंबी विकण्यासाठी रात्री ९ किंवा १० वाजेपर्यंत ताटकळत बसावं लागतं. “लोक खरेदी करायला येतात आणि भाव पाडून मागतात. काय करणार? उन्हाच्या कारात आम्हाला ही कोळंबी विकण्यासाठी बसून रहावं लागतं. लोकांना हे कळत नाही. हे दोन वाटे धरण्यासाठी आणि विकण्यासाठी आम्हाला किती कष्ट पडतात, ते तू बघतोयस ना,” गोविंदम्मा सांगते. प्रत्येक वाट्यात १५-२० कोळंबी आहेत आणि हा वाटा १०० ते १५० रुपयांना विकला जातो. “मला तर दुसरं कोणतं कामही येत नाही. माझं पोट यावरच चालतं,” सुस्कारा सोडत ती म्हणते.
गोविंदम्मा कोळंबी बर्फात घालत नाही. पण ती ताजी आणि मऊ रहावी यासाठी तिला रेती माखून ठेवते. “घरी नेऊन शिजवेपर्यंत ती छान ताजी राहते. शिजवल्यावर किती चवदार लागते, माहिती तरी आहे का तुला?” ती मला विचारते. “ज्या दिवशी कोळंबी पकडली, त्याच दिवशी विकायची असा माझा नेम आहे. तसं केलं तर कुठे माझ्या पोटात कांजी जाईल आणि नातवंडांसाठी काही खाऊ घेऊन जाता येईल. नाही तर उपास ठरलेलाच.”
कोळंबी धरायची ही ‘कला’ तिला फार कमी वयात शिकवली गेली. “माझ्या आई-बापाने मी लिहायला, वाचायला शाळेत पाठवलंच नाही. पण ते मला नदीवर घेऊन जायचे, कोळंबी धरायला,” गोविंदम्मा लहानपणच्या आठवणी सांगते. “माझं अख्खं आयुष्य मी पाण्यातच काढलंय. ही नदी माझं सर्वस्व आहे. हिच्याशिवाय मी काहीच नाही. माझा नवरा वारला त्यानंतर पोरांना चार घास खाऊ घालण्यासाठी मी किती काबाडकष्ट केले आहेत ते देवालाच माहित आहेत. मी जर या नदीत कोळंबी पकडली नसती ना तर मी जगूच शकले नसते.”
गोविंदम्माच्या आईने तिला आणि तिच्या भावंडांचा सांभाळ नदीतली कोळंबी पकडून आणि इतर छोट्या मासळीची खरेदी विक्री करून केला. ती १० वर्षांची असताना तिचे वडील वारले. “माझ्या आईने दुसरं लग्न नाही केलं. तिने तिचं सगळं आयुष्य आमची काळजी घेतली. तिचं वय आता १०० वर्षांहून जास्त आहे. त्सुनामी कॉलनीतले लोक म्हणतात की ती इथे सगळ्यात म्हातारी आहे.”
गोविंदम्मांच्या मुलांचं आयुष्यही नदीवरच अवलंबून आहे. “माझ्या मुलीचा नवरा दारुडा आहे. तो धड काहीच काम करत नाही. तिची सासू कोळंबी धरते, विकते आणि त्यातून घरच्यांचं पोट भरते,” ती सांगते.
गोविंदम्माचा थोरला मुलगा सेलय्या देखील घर चालवण्यासाठी कोळंबी पकडायचा. तो गेला तेव्हा पंचेचाळिस वर्षांचा होता. २०२१ साली मी त्याला भेटलो तेव्हा तो म्हणाला होता, “मी लहान होतो तेव्हा आई-बाबा पहाटे पाच वाजता उठून नदीवर जायचे. ते थेट रात्री ९-१० वाजता परत यायचे. मी आणि माझी बहीण भुकेलेच झोपी जायचो. आईबाबा तांदूळ घेऊन यायचे, भात शिजवायचे आणि आम्हाला उठवून खाऊ घालायचे.”
वयाच्या दहाव्या वर्षी सेलय्या साखर कारखान्यात काम करण्यासाठी आंध्र प्रदेशला गेला. “मी तिथे असतानाची गोष्ट आहे. कोळंबी धरून घरी परतत असताना बाबाचा अपघात झाला आणि त्यात तो गेला. मला त्याचा चेहरासुद्धा पाहता आला नाही,” तो सांगत होता. “तो गेल्यानंतर माझ्या आईनेच सगळं काही केलं. ती बहुतेक सगळा वेळ नदीतच असायची.”
कारखान्यात त्याला वेळेवर पैसे मिळत नव्हते म्हणून त्याने घरी आईकडे परत जायचं ठरवलं. गोविंदम्मा हाताने कोळंबी धरायची पण सेलय्या आणि त्याची बायको जाळं वापरायचे. त्या दोघांना चार मुली आहेत. “माझ्या थोरल्या मुलीचं लग्न लावलंय. एक जण कॉलेजात शिकतीये [बीए, इंग्रजी] बाकी दोघी शाळेत शिकतायत. कोळंबी विकून जो काही पैसा येतो तो त्यांच्या शिक्षणावर खर्च होतो,” तो सांगत होता. “पदवी पूर्ण झाल्यानंतर माझ्या मुलीला कायद्याचं शिक्षण घ्यायचंय. आणि माझा पण तिला पाठिंबा आहे.”
पण, तिची ही इच्छा मात्र अपूर्णच राहिली. २०२२ च्या मार्च महिन्यात घरातल्या काही वादातून सेलय्याने आत्महत्या केली. या आघाताने पूर्ण खचून गेलेली गोविंदम्मा म्हणते, “माझा नवरा लवकर गेला. आता माझ्या चितेला कोण आग देणार? माझा लेक माझं सगळं करायचा. तसं आता कोण करणार?”
हा लेख आधी मूळ तमिळमध्ये लिहिला गेला. एस. सेंथलिर हिने त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे. तमिळ अनुवाद संपादक राजासंगीतन यांनी तमिळ मजकुराच्या संपादनात मोलाची मदत केली आहे. त्यांचे आभार.
अनुवाद: मेधा काळे