सूरज जट्टीने किशोरवयातच आपल्या वडलांना सांगितलं होतं की, त्याला लष्करात भरती व्हायचंय. स्वतः सैन्यातून निवृत्त झालेल्या त्याच्या वडलांना आपण आपल्या मुलाला प्रेरणा देऊ शकलो याचा खूप अभिमान वाटला.

“माझ्या घरच्या वातावरणामुळे माझ्यासाठी हा स्वाभाविक निर्णय होता,” १९ वर्षांचा सूरज सांगतो. सांगली जिल्ह्यात पलूस इथल्या प्रशिक्षण संस्थेत तयारी करता करता तो बोलत होता. “जेव्हापासून मला कळायला लागलंय तेव्हापासून मी दुसऱ्या कोणत्याच पर्यायाचा विचार केलेला नाही,” सूरज सांगतो.  शंकर जट्टीही आपल्या मुलाच्या निर्णयावर खूष होते. वडील म्हणून त्यांची मुलाकडून हीच अपेक्षा होती.

या सगळ्याला दहा वर्षं उलटली. शंकर यांना मुलाचा निर्णय योग्यच आहे याची खात्री वाटेनाशी झाली होती. आपल्या मुलाचा अभिमान असणारे आणि भावनिक असलेले शंकर भाऊ आता साशंक झाले होते. अगदी अचूक दिवस सांगायचा, तर १४ जून २०२२ उजाडला आणि चित्र पालटलं.

याच दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली की “अग्नीपथ योजनेअंतर्गत भारतीय तरुणांना सैन्यात अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी मिळेल.”

ही योजना सुरू होण्याआधीच्या पाच वर्षांत म्हणजेच २०१५ ते २०२० या काळात; सैन्यात सरासरी ६१ हजार युवक भरती झाले. २०२० मध्ये कोविडची साथ सुरू झाल्यानंतर सैन्य भरती थांबवण्यात आली होती.

भारतीय लष्कर “तरुण, सुदृढ आणि विविधता जपणारं” व्हावं यासाठी अग्नीपथ योजनेद्वारे सुमारे ४६ हजार युवक अथवा अग्नीवीरांची भरती करण्यात येणार होती. अग्नीवीर भरतीसाठी नावनोंदणीच्या वेळी उमेदवाराचं वय साडेसतरा ते २१ वर्षे असावं असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सैन्यदलाचं सरासरी वय ४ ते ५ वर्षांनी कमी झाल्याचं सरकारी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

अग्नीवीर योजनेद्वारे होणारी भरती चार वर्षांसाठी असणार आहे. त्यातून लष्करात कायमस्वरुपी नोकरी मिळेलच असं नाही. भरतीची चार वर्षं पूर्ण झाल्यानंतर त्यातल्या केवळ २५ टक्के उमेदवारांना सैन्याच्या नियमित केडरमध्ये नोकरी मिळू शकते.

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

डावीकडे – सांगली जिल्ह्यातील पलूस गावातल्या यश अकादमीमध्ये तरुण मुलं आणि मुली सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण घेत आहेत. अग्नीवीर योजनेद्वारे होणारी भरती चार वर्षांसाठी असणार आहे. ती लष्करातली कायमस्वरुपी नोकरी नाही. भरतीची चार वर्षं पूर्ण झाल्यानंतर त्यातील केवळ २५ टक्के उमेदवारांना सैन्याच्या नियमित केडरमध्ये नोकरी मिळू शकते. उजवीकडे – कुंडल इथल्या सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व माजी सैनिक शिवाजी सूर्यवंशी (निळ्या सदऱ्यात) म्हणतात, चार वर्षं हा सैनिक म्हणून घडण्यासाठी खूपच कमी कालावधी आहे

शिवाजी सूर्यवंशी, वय ६५ माजी सैनिक आहेत. सांगली जिल्ह्यातल्या कुंडल इथल्या सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या सूर्यवंशी यांच्या मते, “ही योजना राष्ट्रहिताची नाही. चार वर्षं हा सैनिक म्हणून घडण्यासाठी खूपच कमी कालावधी आहे. या सैनिकांना जर काश्मीरसारख्या किंवा इतर कोणत्या संघर्षग्रस्त भागात तैनात करण्यात आलं तर अनुभव कमी असल्यामुळे ते अन्य प्रशिक्षित सैनिकांसाठी धोकादायक ठरू शकतं. ही योजना राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणत आहे.”

सूर्यवंशी पुढे म्हणाले, “अग्नीवीर म्हणून भरती होणाऱ्यांसाठीदेखील हे अवमानकारक आहे. जर एखाद्या अग्नीवीराचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला, तर त्याला शहीद मानलं जाणार नाही. ही गोष्ट लाजिरवाणी आहे. जर एखादा आमदार किंवा खासदार एखाद्या महिन्यासाठीच पदावर असेल, तर त्यालाही पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या इतर आमदार, खासदारांइतकेच लाभ मिळतात. मग सैनिकांबाबत हा दुजाभाव का?”

या वादग्रस्त योजनेविरोधात संपूर्ण भारतात निदर्शने करण्यात आली. लष्करात भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी व माजी सैनिकांनीदेखील या योजनेला विरोध दर्शविला आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी खासदार निवडून आल्यानंतर भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र सरकार या योजनेत काही सुधारणा करण्याचा विचार करीत असल्याचं वृत्त आहे. सर्वाधिक लष्करभरती होणारी राज्यं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. दोन वर्षांनंतर पश्चिम महाराष्ट्रातही या योजनेची लोकप्रियता कमी झालेली दिसते. पश्चिम महाराष्ट्रात काही गावं अशी आहेत की, जिथे प्रत्येक घरातील किमान एक तरी युवक लष्करात भरती झालेला आहे.

सूरज देखील अशाच एका घरातील मुलगा आहे. तो बी. ए. च्या शेवटच्या वर्षात शिकतोय. मात्र अग्नीवीर भरतीसाठी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केल्यानंतर त्याच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे.

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

अकादमीत शारीरिक प्रशिक्षणादरम्यान खूप कसरत करावी लागते. धावणे, जोर बैठका, जमिनीवरुन रांगत जाणे व धावताना दुसऱ्या व्यक्तीला पाठीवर घेऊन धावणेसुद्धा

“मी सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास कसरत करतो,” जट्टी म्हणाला. “ही कसरत खूपच दमछाक करणारी असते आणि त्यानंतर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची ताकदच माझ्यात उरत नाही. जर माझी निवड झाली तर परीक्षेपूर्वी मला निघावं लागेल.”

त्याच्या प्रशिक्षणात धावणे, जोर बैठका, जमिनीवरुन रांगत जाणे आणि पाठीवर दुसऱ्या व्यक्तीला घेऊन धावणे अशा कठीण कसरतींचा समावेश आहे. प्रत्येक दिवशी या प्रशिक्षणानंतर त्याचे कपडे घामाने भिजलेले व धुळीने माखलेले असतात. त्यानंतर पुन्हा काही तासांनी तो हेच सर्व व्यायाम पुन्हा करतो.

एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अग्नीवीर म्हणून निवड झाल्यावर जट्टीला दर महिना २१ हजार रुपये पगार मिळेल. चौथ्या वर्षी त्यात वाढ होऊन दर महिना २८ हजार रुपये मिळतील. त्यानंतर त्याची लष्कराच्या नियमित भरतीसाठी पुन्हा निवड होऊ शकली नाही तर अग्नीपथ योजनेचा कालावधी संपल्यावर घरी परत जाताना त्याला ११ लाख ७१ हजार रुपये मिळतील.

त्यावेळी तो २३ वर्षांचा असेल आणि नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक पदवीदेखील त्याच्याकडे नसेल.

“म्हणूनच माझ्या वडीलांना माझी काळजी वाटतीये. ते मला अग्नीवीरऐवजी पोलिस अधिकारी हो असे सांगतायत,” सूरज सांगतो.

भारत सरकारने सांगितले आहे की, अग्नीवीर योजनेच्या सुरुवातीच्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये ४६ हजार अग्नीवीरांची भरती केली जाईल. याचाच अर्थ यातले ७५ टक्के म्हणजेच ३४ हजार ५०० युवक-युवती २०२६ मध्ये जेव्हा घरी परततील तेव्हा विशीत असतील. त्यावेळी त्यांच्यासमोर भविष्यात काय करायचं हा प्रश्न असेल व त्यांना आयुष्यात पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.

या योजनेद्वारे २०२६ पर्यंत भरतीची कमाल मर्यादा १ लाख ७५ हजार इतकी आहे. पाचव्या वर्षी ९० हजार आणि त्यानंतर दर वर्षी १ लाख २५ हजार अग्नीवीर भरतीचं उद्दिष्ट आहे.

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

डावीकडे – अग्नीपथ योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेविरोधात भारतभर निदर्शने करण्यात आली आणि इच्छुक तरुण आणि माजी सैनिकांनीही त्याला विरोध केला.  उजवीकडे – या योजनेमुळे ग्रामीण भागातला रोजगाराचा प्रश्न आणखी गंभीर होईल असं पलूसमधल्या यश अकादमीचे प्रकाश भोरे म्हणतात. त्यांच्या मते, या मुलांना त्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याआधीच कामावर रुजू व्हावं लागेल अशा पद्धतीने या योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर बनेल

सैन्यात भरती होणाऱ्या मुलांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांची मुलं असतात. शेतीवरच्या अरिष्टांचा सामना करणारी. कर्जाचा बोजा, शेतमालाचे पडलेले भाव, कर्ज मिळण्यातल्या समस्या आणि हवामान बदलामुळे शेतीची होणारी वाताहात यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दीर्घकाळ शाश्वत उत्पन्न देणारी नोकरी म्हणूनच जास्त महत्त्वाची आहे, असते.

प्रकाश भोरे पलूसमध्ये यश अकादमी चालवतात. ते म्हणतात, “अग्नीवीर योजनेमुळे ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न अजूनच गंभीर होईल; कारण या योजनेद्वारे होणाऱ्या भरतीसाठी युवकांना पदवीचं शिक्षण पूर्ण करण्याआधीच कामावर रुजू व्हावं लागेल. मुळात सध्या नोकऱ्यांची स्थिती काही चांगली नाही. पदवी नसल्यामुळे नोकरी मिळविणं या मुलांसाठी अजूनच कठीण होईल. चार वर्षांनतर घरी परत आल्यावर त्यांना सोसायट्यांच्या अथवा एटीएमच्या बाहेर सुरक्षा रक्षक म्हणून काम करावं लागेल.”

“त्यांच्याशी लग्न करायला कोणी तयार होणार नाही,” ते इशारा देतात. मुलाला कायमस्वरुपी नोकरी आहे का केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती झाला होता? असा प्रश्न मुलीकडच्यांना विचारला तर त्यात वावगं ते काय? कल्पना करा, शस्त्र चालवायला शिकलेल्या, ज्यांच्याकडे काहीही काम नाही अशा नैराश्याने घेरलेल्या तरुणांबद्दल मी बोलतोय. यापेक्षा जास्त मला काहीही सांगावयाचे नाही. परंतु हे चित्र भीतीदायक आहे.”

मेजर हिंमत ओव्हाळ १७ वर्षं भारतीय लष्करात होते. ते २००९ पासून सांगलीमध्ये प्रशिक्षण अकादमी चालवतायत. ते म्हणतात, “या योजनेने खरं तर युवकांना सैन्यात भरती होण्यापासून परावृत्त केलंय. २००९ मध्ये अकादमी सुरू केल्यानंतर दर वर्षी दीड ते दोन हजार युवक अकादमीत प्रशिक्षणासाठी प्रवेश घेत होते. अग्नीवीर योजना जाहीर झाल्यानंतर ही संख्या शंभरावर आली. ही फार मोठी घट आहे.”

अशा परिस्थितीत आपण सैन्यात कायमस्वरुपी भरतीसाठी पात्र ठरू अशी आशा असणारा सूरज किंवा वेगळंच भावनिक कारण असणाऱ्या रिया बेलदारसारखे युवक-युवती अग्नीवीरमध्ये भरती होतीलही.

रिया बेलदार ही मिरज शहरात राहणाऱ्या सीमांत शेतकरी कुटुंबातली मुलगी. ती लहानपणापासूनच तिच्या मामाची लाडकी होती आणि आपल्या मामांना अभिमान वाटेल असे काहीतरी तिला करुन दाखवायचंय. ती म्हणते, “मामांना सैन्यात जायचं होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. माझ्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वप्न जगावं अशी माझी इच्छा आहे.”

PHOTO • Parth M.N.
PHOTO • Parth M.N.

सैन्यात जायची इच्छा असणाऱ्या तरुणींना लोकांकडून टोमणे ऐकून घ्यावे लागतात. ‘अग्नीवीरचा कालावधी संपल्यावर मुलींसाठी प्रशिक्षण संस्था सुरू करण्याची माझी इच्छा आहे ,’ रिया बेलदार सांगते. मिरजेच्या एका सीमांत शेतकरी कुटुंबातली रिया सध्या सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण घेत आहे

ओव्हाळ यांच्या अकादमीत रिया प्रशिक्षण घेत आहे. “मुलगी असून मला सैन्यात जायचं होतं. लोक टिंगल करायचे. शेजाऱ्यांच्या या टोमण्यांकडे मी दुर्लक्ष केलं. लोकांनी माझी खिल्ली उडवली, चेष्टा केली. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण माझे आईवडील माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते,”  ती सांगते.

१९ वर्षांच्या रियालाही कल्पना आहे की अग्नीवीर ही काही तिच्यासाठी आदर्श योजना नाही. ती म्हणते, “तुम्ही दिवसरात्र प्रशिक्षण घेता, तुमचं शिक्षण पणाला लावता आणि सैन्याचा गणवेश घालता...आणि केवळ चार वर्षानंतर हे सगळं तुमच्याकडून काढून घेतलं जातं. आणि भविष्यात काय करायचं काहीच माहीत नसतं...हा फारच अन्याय झाला.”

असं असलं तरी चार वर्षांनंतर काय करायचं याची योजना रियाकडे तयार आहे. ती म्हणते, “परत आल्यानंतर मी मुलींसाठी प्रशिक्षण संस्था सुरू करणार आहे. आमचं शेत आहे, त्यात ऊस घेणार आहे. चार वर्षांनंतर सैन्यात जरी कायमस्वरुपी नोकरी मिळाली नाही तरी मी एवढं नक्कीच म्हणून शकते की मी सैन्यात भरती होऊन माझ्या मामाचं स्वप्न पूर्ण केलंय.”

रिया जिथे आहे त्याच संस्थेत प्रशिक्षण घेणारा, कोल्हापूरचा १९ वर्षांचा युवक ओम विभुते याचा दृष्टीकोन जास्त व्यवहारी आहे. त्याने अग्नीवीर योजना जाहीर होण्याआधीच देशसेवा करण्याच्या हेतूने ओव्हाळ यांच्या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने दुसरा पर्याय निवडला. तो म्हणाला, “आता मला पोलिस अधिकारी व्हायचंय. त्यात वयाच्या ५८ वर्षांपर्यंत नोकरीची हमी असेल आणि पोलिस दलातील नोकरीदेखील देशसेवाच आहे. सैन्यदलात भरती व्हायला मला आवडलं असतं, मात्र अग्नीपथ योजनेमुळे माझा विचार मी बदलला.”

ओम सांगतो, “चार वर्षांनंतर घरी परत यायचं या विचाराने मला अस्वस्थ केलं. परत आल्यानंतर मी करू? मला चांगली नोकरी कोण देईल? असे प्रश्न मला पडले. कोणत्याही व्यक्तीने आपल्या भविष्याबाबत वास्तववादी असायला पाहिजे.”

माजी सैनिक असलेले सूर्यवंशी म्हणतात, “सैन्यात जाण्याची इच्छा असलेल्या युवकांच्या मनातली राष्ट्रसेवेची इच्छा कमी झाली, हे अग्नीवीर योजनेचं सर्वात मोठं अपयश आहे.  काही अप्रिय गोष्टी माझ्या ऐकण्यात आल्या आहेत. जेव्हा मुलांच्या लक्षात येतं की आपण सैन्यात कायमस्वरुपी नोकरी मिळवू शकत नाही; तेव्हा ते प्रयत्न करणं सोडून देतात व आपल्या वरिष्ठांच्या आज्ञांचं पालन करीत नाहीत. यासाठी मी त्यांना दोष देणार नाही. चार वर्षात नोकरी सोडून बाहेर पडायचंय हे माहीत असल्यावर तुम्ही त्यासाठी आपलं आयुष्य का पणाला लावाल? जोखीम का पत्कराल? अथक परिश्रम का घ्याल? या योजनेमुळे सैनिक म्हणजे कंत्राटी मजूर होऊन गेलेत.”

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

यांचे इतर लिखाण Parth M.N.
Editor : Priti David

प्रीती डेव्हिड पारीची वार्ताहर व शिक्षण विभागाची संपादक आहे. ग्रामीण भागांचे प्रश्न शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये आणि अभ्यासक्रमांमध्ये यावेत यासाठी ती काम करते.

यांचे इतर लिखाण Priti David
Translator : Surekha Joshi

सुरेखा जोशी मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी पत्रकारितेमध्ये एमए केलं असून lत्या पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करतात.

यांचे इतर लिखाण Surekha Joshi