जानेवारी महिन्यातली थंडगार दुपार. दिल्लीतल्या आपल्या घरून कमार भाई आपल्या आईशी फोनवर बोलत होते. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातलं बारी फुलवरिया हे त्यांचं गाव. हजारेक किलोमीटर दूर असलेल्या ७५ वर्षीय शमीमा खातून यांच्याशी त्यांचं बोलणं सुरू होतं.
फोनच्या दोन टोकांवर असलेल्या मायलेकांचा संवाद सुरू होतो. कमारभाई आपल्या शुद्ध ऊर्दूत आईला विचारतात, “अम्मी, जरा ये बताइयेगा, बचपन में जो मेरे सर पे जख्म होता था ना, उसका इलाज कैसे करते थे?”
“सिर में जो हो जाहाई – तोरोहो होला रहा – बतखोरा कहा हयी ओको इधर. रेह, चिकनी मिट्टी लगाके धोलिया रहा, मगर लगा हयी बहुत. ता छूट गेलायी,” शमीमा खातून सांगतात. त्याचा अर्थ असा – डोक्याला जखम होते ना तीच तुला पण व्हायची. तिला इथे बतखोरा म्हणतात. मी खारी माती आणि चिकण मातीनी तुझं डोकं धुऊन काढायचे. खूप आग व्हायची. पण त्यानेच ती बरी झाली. आपला घरगुती उपाय सांगताना त्यांना हसू आवरत नाही. त्यांची भाषा कमारभाईंच्या ऊर्दूपेक्षा पूर्णपणे निराळी.
कमारभाईंना मात्र यात काहीही वावगं वाटत नाही कारण हे दोघं मायलेक असेच एकमेकांशी बोलत आले आहेत. दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये.
“मला तिची बोली पूर्ण समजते. पण मी बोलू शकत नाही. माझी ‘मातृभाषा’ ऊर्दू आहे असं जरी मी सांगत असलो तरी प्रत्यक्षात माझी आई वेगळीच भाषा बोलते,” कमारभाई सांगतात. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनासंबंधी पारीभाषाच्या चर्चेत हा मुद्दा येतो. “तिच्या भाषेला काय म्हणतात, कुणालाच माहित नाही. अम्मीला नाही, माझ्या घरच्या कुणाला नाही किंवा खरं तर ही भाषा बोलणाऱ्या एकालाही तिचं नाव माहित नाही,” ते सांगतात. ते स्वतः, त्यांचे वडील आणि भाऊसुद्धा कामासाठी गाव सोडून शहरात गेले. इतरही पुरुष मंडळी ही भाषा कधीच बोलत नाहीत. कमारभाईंची मुलांची तर गोष्टच सोडा. त्यांना त्यांच्या आजीची भाषा समजतही नाही.
“मी याचा बराच शोध घ्यायचा प्रयत्न केलाय,” ते सांगतात. “अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील एक भाषातज्ज्ञ मोहम्मद जहांगीर वारसी या भाषेला ‘मैथिली ऊर्दू’ म्हणतात. जेएनयूचे प्राध्यापक रिझवानुर रहमान यांच्या म्हणण्यानुसार बिहारच्या या भागातले मुस्लिम आपली भाषा ऊर्दू असल्याची नोंद करत असले तरी घरी मात्र वेगवेगळ्या बोलीत बोलतात. असं दिसतंय की माझ्या अम्मीची भाषा म्हणजे ऊर्दू, पर्शियन, अरेबिक, हिंदी आणि मैथिलीचं मिश्रण आहे – आणि ती याच प्रांतात तयार झालीये.”
जी प्रत्येक पिढीबरोबर लुप्त होत जाणारी मायबोली.
हा किस्सा ऐकला आणि आम्ही सगळेच आपापल्या मायबोलीतल्या हरवलेल्या शब्दांच्या शोधात निघालो. अनेकानेक शब्द बोलीतून कसे आणि का गळून गेले त्याचा मागोवा घेण्याचं काम सुरू झालं. आणि मग लक्षात आलं की हा शोध म्हणजे आदिम आणि अंतिमाचा वेध आहे.
*****
सुरुवात राजाने केली. “तमिळमधल्या एका लोकप्रिय म्हणीबद्दल तिरुकुरुलच्या दोन ओळी आहेत,” तो सांगतो.
मयिर
नीप्पिण
वाळा
कवरिमा
अण्णार
उयिरनीप्पर
माणम
वरिन
[
Kural # 969
]
याचा अर्थ असाः हरणाच्या कातडीवरचा एक केस जरी उपटून टाकला तरी ते मरून जातं. तसंच ज्याला मान राहिला नाही तो देखील शरमेने मरण पावेल.
“या म्हणीत माणसाच्या स्वाभिमानाची तुलना हरणाच्या केसाशी केलीये. किमान मु. वरदरासनार यांच्या अनुवादातून तरी हेच प्रतीत होतं,” राजा सांगतो. “पण, एखाद्या हरणाचा एक केस उपटला तर ते का बरं मरेल? कालांतराने मी भारतविद्या तज्ज्ञ आर. बालकृष्णन यांचा एक लेख वाचला, सिंधु संस्कृतीतील तमिळ गावांची नावे . आणि मग माझ्या लक्षात आलं की या दोन ओळींमध्ये ‘कवरिमा’चा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ होतो याक. तमिळमध्ये कवरिमन म्हणजे हरीण.”
“याक? आता हिमालयाच्या उंच पर्वतराजीतला हा प्राणी इथे तमिळ काव्यामध्ये काय करतोय? देशाच्या अगदी दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या लोकांच्या तोंडी त्याचं नाव कसं काय आलं असेल? आर. बालकृष्णन संस्कृतींच्या स्थलांतर प्रक्रियेचा आधार घेत याचा खुलासा करतात. त्यांच्या सिंधु संस्कृतीतले लोक इथे दक्षिणेकडे आले असणार. आणि त्यांच्या बरोबर त्यांचे स्वतःचे शब्द, जगण्याच्या रितीभाती आणि गावांची नावंसुद्धा.”
“आणखी एक अभ्यासक, व्ही. अरासु म्हणतात की आताच्या देश-राज्याच्या अंगाने तेव्हाच्या भारतीय उपखंडाची कल्पना करता कामा नये. कुणास ठाऊक कधी काळी संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये लोक द्रविडी भाषा बोलणाऱ्या लोकांची वस्ती असेल. उत्तरेला अगदी सिंधुच्या खोऱ्यापासून ते दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत हे लोक राहिले असतील. त्यामुळेच हिमालयातल्या एका प्राण्यासाठी तमिळ भाषेत एक शब्द आहे यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.”
“कविरमा – खरंच कोड्यात टाकणारा शब्द आहे हा!” राजा म्हणतो. “मजा म्हणजे, तमिळ शब्दसंग्रह क्रिआ मध्ये मात्र हा शब्द नाही.”
*****
लोकांच्या तोंडी असलेल्या पण शब्दसंग्रहात नसलेल्या अनेक शब्दांची जंत्रीच हळूहळू तयार व्हायला लागली. जोशुआ या प्रक्रियेला सपाटीकरणाचं राजकारण म्हणतो.
“कित्येक शतकांपासून बंगालमधले शेतकरी, कुंभार, कवी, कारागीर, गृहिणी आपापल्या भाषांमध्ये एकमेकांशी बोलत होते आणि त्याच भाषांमध्ये लिहीतही होते. राढी, वरेंद्री, मानभूमी, रोंगपुरी, इत्यादी. पण १९ व्या शतकाची अखेर आणि विसाव्या शतकाच्या पहाटे बंगालमध्ये प्रबोधन पर्व सुरू होतं आणि त्यात बंगाली भाषेतले स्थानिक आणि अरबो-पर्शियन शब्द आणि बोली हरवून गेली. त्यानंतर मानकीकरण आणि आधुनिकीकरणाचा प्रवाह सुरू झाला. बंगाली भाषेवरचे संस्कृत भाषेचे संस्कार असोत किंवा इंग्रजाळलेले, युरोपाळलेले शब्द आणि वाक्प्रचार आणि वापर रुढ होत गेले. बंगाली भाषेतलं वैविध्य, अनेकत्व हरवून गेलं. तेव्हापासून शॉन्ताली, कुडमाली, राजबाँग्शी, कुडुख अशा अनेक आदिवासी भाषांमधून आलेले किंवा या भाषांवर आधारित शब्द बंगालीमधून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
हे फक्त बंगालमध्येच घडत होतं का? भारतातल्या जवळपास सर्व भाषांमध्ये एक म्हण सापडतेच – बंगालीत आम्ही म्हणतो, “बार गाउ ए बोली बादलाय (दर बारा मैलांवर भाषा बदलते). वसाहतकाळात, भाषावार राज्य रचनेच्या प्रक्रियेत प्रत्येक भाषेचा असाच ऱ्हास झाला आहे. भारतात राज्यभाषेच्या प्रश्नाचे अनेकविध सांस्कृतिक आणि राजकीय परिणाम आहेत.”
“मी बांकुडाचा आहे,” जोशुआ सांगतो. “इथे पूर्वी मल्लभूम राजवट होती. विविध वांशिक-भाषिक समूह या प्रांतात राहत होते आणि त्यामुळे भाषा, चालीरिती आणि इतर अनेक गोष्टींची सातत्याने देवाणघेवाण सुरू असे. या भागात बोलल्या जाणाऱ्या सगळ्याच भाषांमध्ये कुडमाली, शाँताली, भुमिजो आणि बिरहोडी या भाषांमधले शब्द येतात किंवा त्या भाषांची छाप आढळते.”
“मात्र, मानकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली आडा (जमीन), जुमडाकुचा (जळालेलं लाकूड), काकती (कासव), जोड (झरा), आगडा (पोकळ), बिलाती बेगुन (टोमॅटो) अशा व इतर अनेक शब्दांच्या जागी संस्कृतप्रचुर किंवा युरोपीय वळणाचे शब्द आणि संज्ञा तयार केल्या जात आहेत. आणि हे करणारे वरच्या वर्गातले, जातीतले वसाहतवादी कलकत्त्याचे लोक आहेत.”
*****
एखादा शब्द भाषेतून गळतो तेव्हा त्यासोबत काय काय हरवून जातं? आधी शब्दाचा वापर थांबतो की अर्थाचा? का त्याभोवतीचा संदर्भच न राहिल्याने भाषेत पोकळी निर्माण होते? पण नवनव्या शब्दांनी अशी पोकळी पण भरली जातच असेल ना?
‘उडालपूल’ (उड्डाणपूल) सारखा नवा शब्द तयार होतो तेव्हा आपण काही गमावतो का कमावतो? आणि जे काही आजवर गमावलं ते नव्याने येतंय त्यापेक्षा जास्त आहे का कमी? स्मिता विचारते.
बंगाली भाषेतला एक जुना शब्द तिला आठवतो. छताच्या खाली घरात हवा आणि उजेड येण्यासाठी एक झरोका असायचा, घुलघुली. “आजकाल ही तुम्हाला दिसणारच नाही,” स्मिता सांगते. “दहा शतकांपूर्वी खोना नावाच्या एका जाणत्या स्त्रीने, ‘खोनार बोचोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन-दोन ओळींच्या काव्यात अनेक विषयांवर लिहून ठेवलं आहे. शेती, आरोग्य आणि औषधं, हवमानाचे वेध, घरबांधणी... आणि हे सगळं लिखाण इतकं थेट आणि खरं आहे.”
आलो
हावा
बेंधो
ना
रोगे
भोगे
मोरो
ना
हवा आणि उजेडाशिवाय बांधू नका घर
आजाराने येईल मरण, व्हाल जराजर
पिऱ्हे
उंचु
मेझे
खोल
तार
दुःखो
शोर्बोकाल
बाहेरच्या जमिनीहून फरशी खोल केली
घरामध्ये सर्वकाळ दुःख, पीडा आली
“आमच्या पूर्वजांचा खोनाच्या हुशारीवर, जाणतेपणावर विश्वास होता आणि त्यामुळेच घरांमध्ये घुलघुलीला जागा ठेवलेली असायची,” स्मिता सांगते. “पण सध्याच्या आवास योजनांमध्ये लोकांना जी घरं देण्यात येतात त्या आताच्या एकसाची खोल्यांमध्ये अशा पारंपरिक जाणतेपणाला जागाच नाहीये. कोनाडे आणि देवळ्या असलेल्या भिंती, कुलुंगी म्हणायचे अशी भिंतीतलीच छोटीशी जागा, मोकळे व्हरांडे, चाटाल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागा आता पार मागे पडल्या. घुलघुली दिसेनाशी झाली आणि तिच्यासोबत भाषेत रुळून गेलेला हा शब्दही.”
दुःख केवळ शब्द लोपल्याचं नाही. आज घरं म्हणजे कबुतरांची खुराडी बनून गेली आहेत. पूर्वी झरोके, कोनाडे, छतांमध्ये घरटी करणाऱ्या पक्ष्यांशीही आपलं नाजूक असं नातं होतं. निसर्गातले किती तरी जीवजंतू माणसाच्या घरांमध्ये राहत होते. चिमण्या घरटी करत होत्या. घुलघुली गेली आणि हे सगळंही हरवून गेलं.
*****
“मोबाइल नेटवर्कच्या मनोऱ्यांनी तर उच्छाद मांडलाय. त्यात सध्याची पक्कं बांधकाम केलेली घरं, बाहेरून पूर्ण बंद. आणि आता स्वयंपाकघरंही घराच्या आत, बंदच,” कमलजीत सांगते. “शेतीतही कीटकनाशकं आणि तणनाशकांचा फार जास्त वापर केला जातोय. या सगळ्या कारणांमुळे आता आपल्या घरातून, अंगणातून आणि तितकंच नाही आपल्या गाण्यांमधूनसुद्धा चिमण्या हद्दपार झाल्या आहेत.”
भाषेचं आणि म्हणूनच परिस्थितिकीचं वैविध्य आणि समृद्धी एकमेकांशी कशी जोडलेली आहे हेच तर ती सांगतीये. पंजाबी कवी वारिश शाह यांच्या कवितेतल्या दोन ओळी
“चिडी चूकदी नाल जा तुरे पांधी
पैय्या दुध दे विच मदाणियां नी"
पक्ष्यांची किलबिल ऐकताच पांथस्थ आपला प्रवास सुरू करतात
तेव्हाच गावातल्या स्त्रिया दूध घुसळून लोणी काढतात
एक काळ असा होता जेव्हा चिमण्यांची चिवचिव ऐकून शेतकऱ्याचा दिवस आणि पांथस्थाचा पुढचा प्रवास सुरू व्हायचा. आपल्यासाठी निसर्गाने तयार केलेला गजर होता म्हणा ना. आजकाल मी माझ्या फोनवरच्या कृत्रिम चिवचिवाटाच्या आवाजाने उठते. पक्ष्यांचं वर्तन पाहून शेतकरी ऋतुचक्राचे अंदाज बांधायचे, पिकं, पेरण्यांचं नियोजन आखायचे. पक्ष्यांच्या पंखांची हालचालही शुभ मानली जायची – किसानी का शगुन म्हणायचे तिला.
चिडियां
खंब
खिलेरे
वस्सण
मीहं
बहुतेरे
चिमणीचे ते पंख
पसरले
बहुवृष्टी! संकेत मिळाले
अनेकानेक प्राणी, पक्षी आणि झाडांच्या प्रजाती नष्ट होतायत आणि त्याच वेळी भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्यही कमी होत जातंय हा काही निव्वळ योगायोग नाही. २०१० साली करण्यात आलेल्या पीपल्स लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियामध्ये डॉ. गणेश देवी मांडतात की भाषा अत्यंत वेगाने अस्तंगत होत चालल्या आहेत. गेल्या ६० वर्षांत २५० हून भाषा विरून गेल्या आहेत.
पक्षीतज्ज्ञ पंजाबमधल्या चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल वाटणारी चिंता सातत्याने बोलवून दाखवतायत. कमलजीतला मात्र लग्नांमध्ये गायलं जाणारं एक गाणं आठवतं.
सडा चिडिया दा चंबा वे
बाबुल असां उड जाणा
चिमण्यांसारख्याच आम्ही देखील
एक दिवस उडून जाणार
“आमच्या लोकगीतांमध्ये चिमण्यांचा सतत उल्लेख असायचा. पण आता नाही,” ती म्हणते.
*****
नाहीशा होत चाललेल्या उपजीविका देखील भाषेशी संबंधित आहेत, पंकज सांगतो. वातावरण बदलांचं अरिष्ट आणि स्थलांतराइतकंच हेही गंभीर आहे. “आजकाल रोंगिया, गोरेस्वर आणि सगळीकडेच स्वस्त आणि मशीनवर विणलेले गामचा आणि चादोर-मेखेला मिळतात. तेही बाहेरच्या राज्यातून आलेले. आसाममधल्या पारंपरिक विणकाम उद्योगाला घरघर लागलीये आणि त्यासोबतच विणकामाशी, वस्त्र विणण्याशी संबंधित असलेले शब्दही अडगळीत गेले आहेत.”
“७२ वर्षीय अक्षय दास आणि त्यांच्या घरचे लोक आजही हातमागावर कापड विणतात. आसामच्या बेहबारी गावाचे रहिवासी असणारे दास सांगतात की ही कला आता संपत चालली आहे. तरुण मुलं कामाच्या शोधात इथून ६० किलोमीटरवर असलेल्या गुवाहाटीला जातात. विणण्याच्या परंपरेपासून ते इतके दूर गेलेत की सेरेकी सारखे शब्द त्यांनी ऐकले देखील नसतील.” दास यांच्या बोलण्यात आलेली सेरेकी म्हणजे बांबूपासून तयार केलेली एक फिरकी. जोतोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकाच्या मदतीने मोहुरावर सूत गुंडाळलं जातं. त्यासाठी बांबूचू ही फिरकी – सेरेकी कामी येते.
“मला एक बिहू गाणं आठवतंय,” पंकज सांगतो. “सेरेकी घुराडी नास (फिरकी फिरते तसं नाच). ज्याला हा संदर्भच माहित नाही त्याला या ओळीचा काय अर्थ लागणार?” पंकज विचारतो. अक्षय दास यांची वहिनी, ६७ वर्षीय बिलाती दास दुसरं एक गाणं गात होत्या.
तेतेलिर
तोलोते
,
कपूर
बोइ
आसिलो
,
सोराइये
सिगिले
सुता
(मी चिंचेच्या झाडाखाली पसून
सूत कातत होते, पक्ष्यांनी येऊन सगळा धागा तोडून टाकला)
त्या मला ताणाबाणा कसा विणला जातो ती सगळी प्रक्रिया समजावून सांगतात. बाजारात नवी यंत्रं आणि तंत्रं आलीयेत त्यामुळे स्थानिक साहित्यं, उपकरणं आणि तंत्र सगळं अडगळीत चाललं आहे.”
*****
“सध्या आपण फक्त सर्वनाश तंत्रज्ञान वापरतोय,” निर्मल कुमार साहूंचं हे वाक्य आम्हाला बुचकळ्यात टाकतं.
“अलिकडे एकदा मी छत्तीसगडच्या माझ्या पातनदादर गावात जरा फेरफटका मारत होतो,” निर्मल भाऊ सांगू लागतात. “घरी पूजेसाठी दुर्वा हव्या होत्या. आधी परसात गेलो तिथे दुर्वांचा पत्ता नाही म्हणून मी शेतात गेलो.”
“पिकं काढणीला काही महिने होते. याच काळात भाताच्या कोवळ्या ओंब्यांमध्ये गोड चीक भरायला सुरुवात होते. सगळे शेतकरी रानात जाऊन पूजा करतात. त्यांनाही दुर्वा लागतात. मी शेतातून पलिकडे चाललो होतो तर एरवी अगदी लोण्यासारखी असणारी माती आणि दवाने भिजलेलं गवत – सगळं काही कोरडं ठाक दिसत होतं. हरळ, साधं गवत कांडी (चारा) काही म्हणजे काहीही नव्हतं. सगळंच करपून कोळसा झालेलं होतं!”
“शेतातल्या कुणाला तरी विचारल्यावर तो म्हणाला, “‘सर्वनाश डाला गया है, इसलिये’.” तो कुठल्या तरी कंपनीच्या तणनाशकाबद्दल बोलतोय हे समजायला देखील मला काही क्षण लागले. त्याने छत्तीसगडीत म्हणतात तसा निंदानाशक किंवा ओडियामध्ये म्हणतात तसं घास मारा हे शब्द वापरले नाहीत. हिंदी पट्ट्यात याला खरपतवार नाशक किंवा चारामार म्हणतात. या सगळ्यांच्या जागी एकच शब्द आलाय – सर्वनाश!”
एक न् एक इंच जमीन वाहितीखाली आणण्याच्या चढाओढीमुळे रासायनिक खतं, काटकनाशकं आणि यंत्र-तंत्रांनी शेतीचा पुरता कब्जा केला आहे. अगदी एकरभर शेती असणारा शेतकरीसुद्धा पारंपरिक अवजारं न वापरता ट्रॅक्टरने नांगरून घेतोय असं चित्र आहे, निर्मल भाऊ सांगतात.
“दिवसरात्र ट्यूबवेल पाणी उपसतायत. माटी महतारीला (मातीमाय) दर सहा महिन्यांनी फळावं लागतंय,” ते अगदी खंतावून म्हणतात. “सर्वनाशसारखी विषारी रसायनं ती किती काळ सहन करू शकेल? असं विष मारलेली पिकं माणसाच्या आहारात येऊन तेच विष रक्तात भिनणार. आपलाच ‘सर्वनाश’ जवळ आल्याचं मला जाणवू लागलंय!”
“भाषेचं विचाराल तर एकदा एक पन्नाशीच्या आसपास असलेला शेतकरी मला म्हणाला होता की नागर (नांगर), बाखर (खुरपं), कोपर (ढेकळं फोडण्यासाठीचा लाकडी ठोंब्या) – आता ही नावंसुद्धा कुणाला माहित नाहीत. आणि दाउंरी बेलन (बैल जुंपून खळं करण्यासाठी वापरण्यात येणारं अवजार) तर दुसऱ्या कुठल्या तरी जगातलं असावं अशी गत आहे.”
“मेटीकम्बाचंही अगदी तेच तर झालंय,” शंकर म्हणतो.
“मला अजून आठवतंय, उडुपीच्या वंडसे गावी आमच्या घराच्या अंगणात हा मेटीकम्बा रोवलेला असायचा,” शंकर जुन्या आठवणींमध्ये रमून सांगू लागतो. “त्याचा अर्थ शेतीसाठीचा खांब. त्यालाच एक फळी – हाडिमांचा बांधायची आणि त्यावर साळी झोडायच्या. त्यानंतर उरलेल्या साळीचं खळं करण्यासाठी याच खांबाला बैल बांधून भातपीक तुडवून खळं व्हायचं. आता तो खांबही नाही आणि आधुनिक मळणी यंत्रांमुळे सगळीच प्रक्रिया सोपी सहज होऊन गेलीये,” शंकर म्हणतो.
“आपल्या दारात मेटीकम्बा असणं ही अभिमानाची बाब होती. वर्षातून एकदा आम्ही त्याची पूजा करायचो आणि काही तरी गोडाधोडाचं करायचो. तो खांब, ती पूजा, ते गोडधोड, ते सगळे शब्द – अख्खं जगच निसटून गेलंय हातातून.”
*****
“भोजपुरीमध्ये एक गाणं आहे,” स्वर्ण कांता सांगू लागते. “हरदी हरदपूर जइहा ए बाबा, सोने के कुदाली हरदी कोरीहा ए बाबा (बाबा, मला हरदपूरचीच हळद आणा आणि तीसुद्धा सोन्याच्या कुदळीने खणून आणा).” हे गाणं लग्नात गायलं जातं. भोजपुरी बोलली जाते त्या सर्वच प्रांतात तुम्हाला असं गाणं ऐकायला मिळेल. पूर्वी लोक लग्नघरी जाऊन जात्यावर हळद दळायचे. आता घरातली जाती गेली आणि त्याबरोबर हा विधीसुद्धा.
“त्या दिवशी मी आणि माझी एक लांबची वहिनी बोलत होतो. आणि आमच्या लक्षात आलं की उबटनगीताशी जोडलेले किती तरी भोजपुरी शब्द आता वापरातून नाहीसे झाले आहेत – कोदाल (कुदळ), कोरना (खणणे), उबटन (उटणं) सिनहोरा (कुंकवाचा करंडा) दूभ (दुर्वा) – हे शब्द आता फारसे ऐकिवात नाहीत. सिलौट (पाटा), लोढा (एक प्रकारचा वरवंटा), खल-मूसल (उखळ-मुसळ) आता आधुनिक स्वयंपाकघरातून नाहीसे झाले आणि यातले बरेचसे शब्द बोलीतून.” शहरी भागांमध्ये संस्कृतीचा ऱ्हास कसा जाणवत राहतो ते स्वर्ण कांताच्या बोलण्यातून पुढे येतं.
*****
आमची सगळ्यांची संस्कृती, भाषा, आर्थिक स्तर आणि प्रांत वेगवेगळे. तरीही आपापल्या भाषांमधून विरत चाललेले शब्द, त्यांचे संपत चाललेले अर्थ आणि आपल्याच मुळांपासून, , गावपाडे, जंगलं, निसर्ग आणि भवतालापासूनचं तुटलेपण हे सगळं हातात हात घालून घडत असतं. हा सगळा विकास किंवा प्रगतीचा खेळ आहे.
खेळ. पूर्वीचे अनेक खेळही आता राहिलेले नाहीत. सुधामयी आणि देवेश अशा अनेक खेळांच्या आठवणींमध्ये रमून जातात. “आजकालच्या मुलांना किती तरी खेळ माहितच नाहीयेत,” सुधामयी म्हणते. “गच्चकायलु किंवा वल्लंची म्हणजे मराठीतले सागरगोटे किंवा गजगे. बारके दगड हवेत फेकून मळहातावर झेलायचे. ओमनगुंटुलुसाठी कवड्या किंवा चिंचोके लागायचे. टेबलावर दोन ओळींमध्ये १४ खड्डे केलेले असायचे. असा खेळ होता. कल्लगंटुलु म्हणजे आंधळी कोशिंबिर, किती तरी असे खेळ होते,” ती सांगते.
“खेळांच्या अशा किती तरी आठवणी आहेत माझ्याकडे. सतीलो त्यातलाच एक,” देवेश सांगतो. सतीलो म्हणजे लगोरी. दोन टीम आणि सात दगडांची लगोरी. एका टीमने चेंडूने लगोरी फोडायची आणि दुसऱ्या टीमने बाद न होता ती परत रचायची. काही खेळ खेळून कंटाळा आल्यावर आम्ही एक खेळ शोधून काढला, देवेश सांगतो. त्याचं नाव ‘गेना भडभड’. यात टीम नाही, काहीच पार करायचं नाही. सगळे जण एकमेकांना नेम धरून चेंडू मारणार. हा खेळ खेळताना हमखास लागणार. त्यामुळे तो फक्त ‘मुलग्यां’चा खेळ होता. मुली काही गेना भडभड खेळायच्या नाहीत.
“मी सांगतीये त्यातले कुठलेच खेळ मी खेळले नाहीये,” सुधामयी सांगते. “माझी आजी, आईची आई मला या खेळांबद्दल काय काय सांगायची. तिचं ना गजुलावर्ती सत्य वेदम. ती चिनगदेलवर्रूला रहायची. आमच्या कोलकालुरु गावापासून तिचं गाव १७ किलोमीटर अंतरावर होतं. तिच्या बाकी काही आठवणी माझ्यापाशी नाहीत. पण मला खाणं भरवताना किंवा झोपी घालताना ती या खेळांबद्दल मला काय काय सांगायची आणि ते मात्र माझ्या नीट लक्षात आहे. मला खेळायला वेळच नसायचा. शाळेत जावं लागायचं!”
“आमच्या शेजारच्या मुली गुट्टे किंवा टिकरी खेळायच्या,” देवेश सांगतो “किंवा विषामृत. समोरच्या टीमला वाचवायचं किंवा मारायचं. लंगडी टांग नावाचाही खेळ मला आठवतो. जमिनीवर नऊ घरं आखायची आणि एका पायावर लंगडी घालत ती पार करत जायचं.”
“मुलांच्या हातात लहानपणापासून डिजिटल उपकरणं नव्हती. ही यंत्रं त्यांचं बालपणच नाही त्यांची भाषासुद्धा हिरावून घेतायत. आज बाखिराला राहणारा माझा ५ वर्षांचा भाचा हर्षित किंवा गोरखपूरमध्ये राहणारी माझी भाची भैरवी, वय ६ या दोघांना असले खेळ माहितही नाहीयेत,” देवेश म्हणतो.
*****
काही शब्द किंवा शब्दप्रयोग तर लोप पावणारच ना? प्रणती तिच्या मनातला प्रश्न विचारते. काही क्षेत्रांमध्ये बरीच प्रगती होते आणि त्यासंबंधीची भाषा देखील बदलून जाते. उदा. किती तरी आजार, ते टाळण्याचे किंवा झाल्यावर करायचे उपाय या सगळ्या गोष्टींबद्दल लोकांमध्ये जागरुकता आल्यानंतर पूर्वीचे शब्द, उल्लेख बदलले. त्यामुळे ओडिशाच्या अनेक भाषांमधले आधीचे वापरातले शब्द जाऊन त्या जागी वैज्ञानिक शब्दांचा वापर सुरू झाला आहे.
“पूर्वी गावांमध्ये अनेक आजार वेगळ्याच नावांनी ओळखले जायचे,” प्रणती सांगते. “आजारांसाठी वेगळीच नावं होती. देवीचा रोग म्हणजे बडी मा, कांजिण्या म्हणजे छोटी मा, जुलाब म्हणजे बडी, हैजा किंवा आमाशय, विषमज्वराला आंत्रिका ज्वर. मधुमेहाला – बहुमूत्र म्हटलं जायच. संधीवाताला – गांठीबात आणि कुष्ठरोगाला बडा रोग. पण हळू हळू लोकांनी या शब्दांचा वापर थांबवून त्या जागी इंग्रजी शब्द वापरायला सुरुवात केली आहे. आता याबद्दल हळहळ व्यक्त करत बसायची खरंच गरज आहे का? मला नाही वाटत.”
प्रत्येक भाषा नदीसारखी असते. काळ, समूह, वेळानुसार ती बदलत असते. तिचा प्रसार होतो, इतर भाषांशी मिलाप होतो, काही भाग विटून जातात आणि काही नव्याने निर्माणही होतात. मग जे काही मागे पडतंय किंवा गळून जातंय त्याबद्दल आपण टिपं का गाळायची? काही गोष्टी विस्मृतीत गेल्या तर चांगलंच आहे की.
*****
“आपल्या भाषांच्या गाभ्याशी असलेले सामाजिक भेद मला बोचतात. आता हाच शब्द घ्या. मुर्दाड मटण,” मेधा सांगते. “एखादा कुणी फारच आडमुठा असेल, त्याच्यावर कसलाच काहीच परिणाम होत नसेल तर त्याला मुर्दाड म्हटलं जातं. मुर्दाड म्हणजेच मेलेल्या जनावराच्या मटणासारखा. दलितांना हे असलं मटण खायला लागायचं. मेलेल्या जनावराचं. मुर्दाड शब्दाचा उगम तिथे आहे.”
राजीव मल्याळमचा विचार करू लागले. “कधी काळी खालच्या मानल्या गेलेल्या जातीतल्या लोकांच्या घरांना केरळमध्ये चेट्टा म्हणत. गवताने शाकारलेलं घर. अशा घरांमध्ये राहणारे लोक खालच्या जातीचे असल्याने पुढे हा शब्द शिवीसारखा वापरला जाऊ लागला,” राजीव सांगतात. “त्यांना आपल्या घरांना पुर किंवा वीडु म्हणण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या नवजात बाळांना इतर लोक म्हणतात तसं उन्नी नाही म्हणायचं. हे शब्द केवळ वरच्या जातीच्या लोकांनी वापरायचे. खालच्या जातीत जन्माला आलेली मुलं म्हणजे चेक्कन – म्हणजे कार्टी. वरच्या जातीचे कुणी असतील तर त्यांच्यासमोर त्यांना स्वतःचा उल्लेख अडियन असा करावा लागायचा. त्याचा अर्थ होतो, ‘आपला नम्र सेवक’. आजकाल हे शब्द वापरले जात नाहीत,” ते सांगतात.
“काही शब्द आणि शब्दप्रयोग कायमचेच हद्दपार व्हावेत,” मेधा म्हणते. “ॲड. एकनाथ आवाड आपल्या आत्मचरित्रात लिहितात (जग बदल घालुनी घाव, शब्दांकन प्रशांत खुंटे) की त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी एक गुपित भाषा तयार केली होती. सगळी पोरं मातंग किंवा इतर दलित जातीची. अतोनात गरिबीमुळे त्यांना खाण्यासाठी चोरी करावी लागायची. कुणाच्या हाती सापडू नये, कुणी आलंच तर इतरांना इशारा करता यावा आणि वेळेत पळून जाता यावं यासाठी ही भाषा तयार झाली होती. एकनाथभाऊ, म्हणजेच जिजा लिहितात, ‘ही भाषा विस्मृतीतच गेली पाहिजे. कुणालाच ती माहित असण्याची गरज नाही. आणि कुणाला तिचा यापुढे कधीच वापर करावा लागू नये’.”
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याची दीपाली भुसनर आणि ॲड. नितीन वाघमारे अशा अनेक शब्दांची आणि शब्दप्रयोगांची यादीच करतात. ‘काय मांग गारुड्यासारखा राहतुय?’ एखाद्याच्या राहण्यावरून हमखास असं बोललं जायचं. मांग किंवा गारुडी समाजाची हलाखी आणि त्यातून वैयक्तिक स्वच्छतेची आबाळ एकीकडे पण एखाद्याला नावं ठेवण्यासाठी त्याची तुलना मांग, पारधी किंवा महार व्यक्तीशी करायची हा सगळी जातीभेदाचा परिणाम होता. सर्वात जास्त अपमान या जातीवाचक शब्द, शिव्यांमधून केला जायचा. “हे शब्द आपल्या भाषांमधून काढून फेकून द्यायला पाहिजेत,” मेधा म्हणते.
*****
काही तरी असेलच ना जे वाचवणं गरजेचं आहे? भाषांवर आलेलं हे अरिष्ट म्हणजे कल्पनेचे खेळ नाहीयेत. पेगी मोहन म्हणतात त्याप्रमाणे खाणीत विषारी वायू नाही ना हे पाहण्यासाठी सोडलेल्या पहिल्या छोट्या पक्ष्यासारखी असते भाषा. आक्रिताची सुरुवात भाषांपासूनच होते का? आणि संकट सरलं असं नक्की कधी म्हणायचं?
“मला विचाराल तर इथे आपल्या भाषांमध्येच तुम्हाला ते सापडेल,” जयंत परमार म्हणतात. ६९ वर्षीय परमार दलित आहेत. ते गुजराती कवी असून आपली कविता ऊर्दूत लिहितात.
“माझी मा गुजराती बोलायची, त्यात किती तरी ऊर्दू शब्द असायचे,” ते सांगतात आणि या भाषेशी असलेलं आपलं आणि आपल्या आईचं, दाहीबेन परमार यांचं नातं उलगडून सांगतात. “एका विशिष्ट भांड्याचा उल्लेख करत ती म्हणायची, ‘ जा, कडो लइ आव खावा काढु. ’ आता ती तशी भांडी तरी अस्तित्वात आहेत का हा प्रश्न आहे. आम्ही त्यात भात खायचो. गालिब़ वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की हा शब्द होता कडा,” ते सांगतात.
“अशी किती तरी वाक्यं मी सांगू शकतो ‘तारा दीदार तो जो’ (कसा दिसतोयस जरा पहा), ‘तारु खमीस धोवा आप’ (आण तुझा सदरा धुवून टाकते), ‘मोणमती एक हरफ काढतो नथी (तोंडातून एक शब्द तरी निघेल का तुझ्या?)’. किंवा मग ती सांगायची, ‘मुल्लाने त्यांती गोश लइ आव (जा, मुल्लाच्या घरून जरा मटण घेऊन ये).’ खरा शब्द आहे गोश्त पण बोलीभाषेत तो झालाय गोश. आमच्या जिभेवर हे शब्द होते पण ते आता विस्मृतीत गेले आहेत. ऊर्दू कवितांमध्ये कुठेही हे शब्द दिसले की आईचा चेहरा डोळ्यासमोर येतो.”
आता सगळंच बदललंय. शहराचा भूगोल आणि शहराचं वातावरणसुद्धा. “त्या काळी सगळ्या जाती-धर्माचे लोक अहमदाबादमध्ये, तटबंदीच्या आत राहत असत. इथल्या संस्कृतीत धार्मिक तेढ नव्हती. दिवाळीत आमच्या मुस्लिम मित्रमंडळींना फराळ आणि मिठाई मिळायची. एकमेकांची गळाभेट घेत आम्ही सण साजरे करायचो. मोहरममध्ये सगळे मिळून एकत्र ताजियांची मिरवणूक पहायला जायचो. इतके सुंदर ताबूत असायचे. पऱ्यांसाठी अतिशय नाजूक नक्षीकाम केलेले मनोरेच असायचे ते. बालबच्चे त्या ताबुतांच्या खालून जायचे आणि सुखात ठेव अशी दुआ मागायचे.”
सगळ्याच बाबतीत आदान-प्रदान होत असे. कसली अपेक्षा नाही. मोकळ्या मनाने देवाण-घेवाण होत होती. “पण आता तो माहोलच नाही. आणि अर्थातच आमच्या भाषांमध्येही तेच घडतंय,” ते म्हणतात. “पण आशा असतेच. मला मराठी, पंजाबी आणि बंगाली या भाषा येतात. मग मी त्यातले शब्द ऊर्दूमध्ये आणतो. मला तर वाटतं कविताच हे नुकसान भरून काढू शकेल.”
अखेर, शब्द कसे
असतात? तुकोबांची माफी मागत – अणुरेणिया थोकडा, ‘शब्द’ आकाशाएवढा.
देशाच्या विविध भागातून वार्तांकन झालेला हा लेख पारीभाषा टीमच्या अनेक सदस्यांमुळे या रुपात येऊ शकला आहे – कमलजीत कौर (पंजाबी), जोशुआ बोधिनेत्र (बांग्ला), देवेश (हिंदी), निर्मल कुमार साहू (छत्तीसगडी), पंकज दास (आसामी), प्रणती परिदा (ओडिया), मेधा काळे (मराठी), मोहम्मद कमार तबरेज (ऊर्दू), राजासंगीतन (तमिळ), राजीव चेलनट (मल्याळम), स्मिता खटोर (बांग्ला), स्वर्ण कांता (भोजपुरी), सुधामयी सत्तेनपल्ली (तेलुगु) आणि शंकर एन. केंचनुरू (कन्नडा)
लेखातील चित्रे व छायाचित्रेः जयंत परमार, आकांक्षा, अंतरा रामन, मंजुळा मस्तिकट्टे, पी. साईनाथ, पुरुषोत्तम ठाकूर, रितायन मुखर्जी आणि संकेत जैन
हा लेख
प्रतिष्ठा पांड्या यांनी संपादित केला असून या कामी त्यांना पी. साईनाथ, प्रीती
डेव्हिड, स्मिता खटोर आणि मेधा काळे यांचं सहाय्य मिळालं आहे. भाषांतर सहाय्यः
जोशुआ बोधिनेत्र. छायाचित्र संपादन आणि मांडणीः बिनायफर भरुचा