“एइ गाछ, एइ घोर, एइ माटीर जे माया, शेइ माया लिये आमरा कुथाय जाबो?” [हे झाड...हे घर...इथल्या मातीची माया...ही माया सोबत घेऊन आम्ही कुठं जावं?]
आपोनकुरी हेम्बरॉम दुःखी आहेत आणि क्रोधितही. “हे सगळं काही माझं आहे,” आपल्या सभोवताली नजर टाकत संथाल आदिवासी असलेल्या ४० वर्षीय अपानकुरी म्हणतात. “इथे माझी स्वतःची जमीन आहे,” जमिनीवरच्या दोन खुणांकडे निर्देश करत त्या म्हणतात. त्यांच्या ५-६ बिघा जमिनीत (अंदाजे दीड एकर) भातशेती होते.
“इतक्या साऱ्या वर्षांत आम्ही जे काही इथे उभारलं, ते सगळं आम्हाला सरकार देऊ शकणारे का?” राज्य सरकारच्या देवचा पाचामी (देउचा पाचमी असंही लिहिलं जातं) कोळसा प्रकल्पात पश्चिम बंगालच्या बिरभूम जिल्ह्यातली १० गावं नष्ट होणार आहेत. त्यात आपोनकुरींचं गावही आहे.
“हे सगळं मागे सोडून आम्ही कुठे जावं? आम्ही कुठेही जाणार नाही,” आपोनकुरी ठामपणे सांगतात. त्या खाणीच्या विरोधात लढणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. त्यांच्यासारख्याच अनेक बाया मोर्चे काढतायत, बैठका बोलावतायत. पोलिस आणि सत्ताधाऱ्यांच्या मुजोरीविरोधात त्या टाच रोवून उभ्या आहेत, हातात काठ्या-लाठ्या, झाडू, विळे आणि काटारी घेऊन.
होरिनशिंगा गावामध्ये हिवाळ्यातली एक दुपार. निरभ्र आकाश आणि चमकतं ऊन. आपोनकुरी आमच्याशी त्यांची शेजारीण लोबुशा हेम्बरॉमच्या अंगणात उभ्या राहून बोलत होत्या. गावात शिरता शिरताच लोबुशांचं विटामातीचं, कौलं घातलेलं घर आहे.
“आमची जमीन घेण्याआधी आमचे जीव घ्या म्हणावं,” लोबुशा म्हणतात. आमच्याशी बोलता बोलता त्या पटकन जेवण उरकून घेतात. भातात थोडं पाणी आणि काल रात्रीची कालवणं. चाळिशीच्या लोबुशा खडी केंद्रावर काम करतात. तिथे २०० ते ५०० रुपये रोज मिळतो.








