सायकल चालवणं आणि एक सामाजिक चळवळ? कदाचित थोडी अतिश्योक्ती वाटेल, पण हे खरंच घडतंय – तामिळनाडूच्या पुडुकोट्टई जिल्ह्यातल्या हजारो निम-साक्षर महिलांना यात काहीही आश्चर्य वाटत नाही. मागासपणातून बाहेर पडण्याचा काही तरी मार्ग लोक शोधतातच, काही वेळा ते फार अचंबित करणारेही असतात, जो त्यांचा परिस्थितीवर प्रहारही असतो, आणि त्याद्वारे ते आपले पाशही तोडत असतात.
भारतातल्या सर्वात गरीब जिल्ह्यातल्या महिलांनी निवडलेला मार्ग म्हणजे सायकल चालवणे. गेल्या १८ महिन्यात एक लाख ग्रामीण महिलांनी, ज्यातील बहुतेक निम-साक्षर आहेत, त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतिक आणि दळणवळणाचा पर्याय म्हणून सायकल निवडली आहे. जर आपण १० वर्षाखालील मुली वगळल्या तर जिल्ह्यातील एक चतुर्थांश महिला सायकलिंग शिकल्या आहेत. आणि ७०,००० पेक्षा जास्त महिलांनी सार्वजनिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपले नव्याने आत्मसात केलेले कौशल्य जगासमोर सादर केले आहे. आणि तरीही प्रशिक्षण शिबिरे आणि नवीन शिकण्याची इच्छा अजूनही तशीच आहे.
पुडुकोट्टईच्या ग्रामीण भागात अगदी पारंपरिक मुस्लिम समाजातल्या तरूण महिलाही सायकलवर स्वार होऊन फिरताना दिसतात. यासाठी त्यातील काही जणींनी त्यांचा बुरखाही बाजूला ठेवला आहे. जमीला बिबी, एक तरूण मुस्लिम मुलगी म्हणते, “हा माझा अधिकार आहे. आम्ही कुठेही जाऊ शकतो. आता मला बसची वाट बघायची गरज नाही. मी जेव्हा सायकल वापरायला सुरूवात केली तेव्हा लोकांनी वाईट साईट भाषेत टीका केली पण मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं.”
सायकलिंगचे वेड लागलेली माध्यमिक शिक्षिका फातिमा दर रोज संध्याकाळी अर्ध्यातासाकरिता सायकल भाड्यावर घेते (तिला सायकल विकत घेणं परवडू शकत नाही – साधारण एका सायकलची किंमत रू.१,२०० असते). “सायकल चालवण्यात एक स्वातंत्र्य आहे. आम्ही आता कोणावरही विसंबून नाही. मी हे कधीही सोडू शकत नाही,” असं ती सांगत होती. जमीला, फातिमा आणि तिची मैत्रिण विशी पार केलेली अवाकन्नी यांनी त्यांच्या आजूबाजूच्या अनेक महिलांना सायकल चालवायला शिकवले आहे.





