“इथे लग्न करून आले त्याचाच पस्तावा होतोय.”
२९ वर्षांची रोझी आपल्या मनातली खंत बोलून दाखवतीये. आणि असं वाटणारी ती एकटी नाही. श्रीनगरच्या दल लेकमधले रहिवासी सांगतात की मुलींना इथे राहणाऱ्या मुलांशी लग्नच करायचं नाहीये आजकाल. “तीन ठिकाणहून नकार आलाय,” गुलशन नझीर आपल्या धाकट्या मुलाबद्दल सांगतायत. “आजकाल तर लग्न जुळवणारे मध्यस्थी इथे येतही नाहीयेत.”
बारू मोहल्लात राहणाऱ्या गुलशन सांगतायत त्यामागचं कारण तरी काय? पाण्याची तीव्र टंचाई. राज्यातल्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरामध्ये राहणाऱ्यांची आज ही गत आहे.
“नऊ वर्षांपूर्वी अशी स्थिती होती की आम्ही आमच्या नावा घेऊन बाहेर पडायचो आणि दलमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणी घेऊन यायचो,” मुश्ताक अहमद सांगतात. ते सुतारकाम करतात. “पाण्याचा टँकर आम्हाला माहित नव्हता.”
पण दहा वर्षांपासून चित्र बदलून गेलंय. मुश्ताक रोज सकाळी ठीक ९ वाजता रस्त्यावर सरकारी टँकरची वाट पाहत उभे असतात. गुडू मोहल्लात राहणाऱ्या आपल्या १० जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. पाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी २०-२५,००० खर्च करून टाक्या बांधल्या आहेत, पाइपलाइन केलीये. “पण हे सगळं फक्त वीज असली तरच उपयोगी पडतं. आणि हिवाळ्यात काश्मीरमध्ये विजेची मोठीच समस्या असते,” ते सांगतात. मार्च महिन्यात ट्रान्सफॉर्मर बिघडल्यामुळे त्यांना बादल्यांनी पाणी भरावं लागलं होतं.






















